चारा छावण्या त्वरित सुरू करा

14 Dec 2018 10:57:47

पाचोरा शेतकरी सेनेतर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

 
 
पाचोरा : 
 
पाचोरा-भडगाव तालुक्यात या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने खरीप हंगाम वाया गेला. थोडेफार पाणी विहिरींमध्ये शिल्लक होते, ते देखील आटले. धरणे, पाझर तलाव कोरडेठाक झाले आहेेत.
 
 
चारा व पाण्याअभावी पशुधन धोक्यात आले आहे. पशुधन कसे सांभाळावे, असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांना निर्माण झाला आहे. त्यासाठी त्वरित चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.
 
 
धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आलेल्या आहेत. आजपासून गावोगावी दहा ते पंधरा दिवसांनी पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे.
 
 
त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहे. म्हणून पशुधन वाचविण्यासाठी तातडीने पाणी व चारा छावण्या उभारण्यात याव्या, अन्यथा पाचोरा-भडगाव तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
 
 
होणार्‍या परिणामाला आपण जबाबदार राहाल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, अ‍ॅड. दिनकरराव देवरे, नाना वाघ, विशाल राजपूत, विजय भोई आदी उपस्थित होते.
 
 
शासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी शेतकर्‍यांनी व्यक्त केले.
बिकट परिस्थिती
 
 
पाणी व चार्‍यासाठी शेतकरी व नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. खूप बिकट समस्या निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासनाने जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, हे शासनाचे कर्तव्यच आहे.
Powered By Sangraha 9.0