स्त्री कर्तृत्वाचे मापदंड काय?

    दिनांक  14-Dec-2018   
 
 
वयाच्या २३व्या वर्षी फुटबॉलमधील सगळ्यात प्रतिष्ठित बैलन डिओर पुरस्कार मिळवणारी एडा. एडाने ३०० गोल केले. तिची कामगिरी अभिमानास्पदच आहे. खेळाप्रती निष्ठापूर्वक सराव या तिच्या गुणांनी तिला क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च पद बहाल केले, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.  
 

तुझ्या सुंदर रेशमी केसांच्या आड बुद्धी असलेला मेंदू आहे का? कमनीय बांध्याच्या आकर्षितेपलीकडे मानवी मूल्य जपणारे सुंदर मन आहे का?,” असा प्रश्न आजतागायत कुणी कुणा स्त्रीला विचारला असेल की नाही हा प्रश्नच आहे. पण, खूप स्त्रियांशी, मुलींशी चर्चा केल्यावर त्यांचे मत होते, ”नाही, असा प्रश्न आजतागायत आम्हाला कुणीही विचारला नाही.” या गोष्टीला सन्माननीय अपवाद असूच शकतो. मात्र, कडू असले तरी हे सत्यच आहे की, आपल्याकडे नाहीतर जगाच्या पाठीवरही पुरुषांचे शस्त्र त्यांचे कर्तृत्व, तर महिलांचे शस्त्र त्यांचे सौंदर्य, असे मानण्याची र्‍या अर्थाने लिंगभेद जपणारी प्रवृत्ती आहे. सौंदर्याचे मापदंड भले जगाच्या पाठीवर सर्वत्र एकसारखे नसतील. पण, ते आहेत हे मात्र नक्की. आता कुणी म्हणेल की, सौंदर्य पाहणार्‍याच्या नजरेत असते. पण, ती सौंदर्यवृत्ती निष्पाप नसेल तर? लिंगभेदपूर्वक तसेच समोरच्या स्त्री-पुरुषाची गुणवत्ता डावलून केवळ आणि केवळ देहिक भौतिक लालसेची असेल तर?

 

असो, तर मुद्दा असा आहे की, स्त्रियांबाबत लिंगभेद करू नये. स्त्री-पुरुष भेद मानता समानतेच्या मुद्द्यावर दोहोंची तुलना व्हावी, असे सकारात्मक विचार सर्वत्र व्यक्त केले जातात. पण, जगभरात या विचारांनी दर्शवलेल्या समानतेच्या भावनेचे वास्तव काय आहे? याचा जर मागोवा घेतला तर वाटते की, स्त्रियांचा जन्मपुरुषया महामानवाच्या मनोरंजनासाठीच झाला आहे, असा कित्येकांचा समज अजूनही आहे. या समजाच्या बळी साध्या भोळ्या स्त्रियाच ठरतात असे नाही, तर कर्तृत्व सिद्ध करणार्‍या स्त्रियांनाही या समजुतीचा फटका बसतो.

 

याचे उत्तम उदाहरण म्हणजे नॉर्वेची व्यावसायिक आणि अत्यंत यशस्वी महिला फुटबॉलपटू एडा हेगरबर्ग. वयाच्या २३व्या वर्षी फुटबॉलमधील सगळ्यात प्रतिष्ठित बैलन डिओर पुरस्कार मिळवणारी एडा. एडाने ३०० गोल केले. तिची कामगिरी अभिमानास्पदच आहे. खेळाप्रती निष्ठापूर्वक सराव या तिच्या गुणांनी तिला क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च पद बहाल केले, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. हे स्थान मिळवण्यासाठी तिने रक्ताचे पाणी केले असेल, मेहनत केली असेल, कितीतरी संघर्ष केला असेल. हे सारे स्त्री-पुरुष या लिंगजाणिवेच्या पलीकडचे आहे. तिचा संघर्ष, तिची मेहनत, लक्ष्याप्रती असलेल्या स्त्रीची नव्हे तर एका माणसाची जिद्द होती.

 

या ऐतिहासिक विजयासाठी डिसेंबर रोजी पॅरिसमध्ये एक मोठा समारंभ आयोजित केला गेला. या समारंभात एडाने अर्थातच अत्यंत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. तिच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये रममाण झालेले तिचे चाहते तिथे उपस्थित होतेच. त्यांच्या दृष्टीनेही एडा ही महान फुटबॉलपटू आहेच. फुटबॉल आणि एडा हाच त्या समारंभाचा विषय होता. त्या कार्यक्रमाचे संचलन फे्रंच डिजे मार्टिन सॉलवेज करत होता. फ्रेंच म्हणजे समानता, उदारमतवादी दृष्टिकोन वगैरे वगैरे आपल्याला वाटते. पण, या कार्यक्रमात डिजे मार्टिन सॉलवेज यांनी हेगरबर्गला प्रश्न विचारला की, “तुम्हाला ट्वर्क (म्हणजे एक तडकभडक नृत्यप्रकार) करता येतो का?” मात्र, एडा या प्रश्नाला, ‘’नाहीअसे उत्तर देत तत्काळ निघून गेली. आता फुटबॉलपटूचा या नृत्यप्रकाराशी काय बरं संबंध? काहींना या प्रश्नाबाबत काही वाटणार नाही. मात्र, कर्तृत्ववान एडाला या प्रश्नाचे वैषम्य वाटले. खेळ हे कार्यक्षेत्र पुरुषांचेच. महिलांनी कसे साध्या सोप्या, पण पुरुषांचे मनोरंजन करणार्‍या गोष्टी कराव्यात. ते तिला जमले नाही तर मग ती स्त्री कसली? हा छुपा संदेश मार्टिनच्या प्रश्नात होता, असे एडाला आणि जगभरच्या निर्भेळ मानवतावाद्यांना वाटले.

 

तसे वाटणेही म्हणा अगदी स्वाभाविक आहे. कारण, कोणत्याही पुरुष खेळाडूला आजही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळते ती त्याच्या शैलीदार खेळामुळे. पण, जरा आठवून पाहिले तर कळेल की, जगभरात तर सोडाच, आपल्या भारतातही महिला खेळाडूंना कशासाठी प्रसिद्धी दिली गेली? टेनिस, फुटबॉल, हॉकी वगैरे खेळणार्‍या जगप्रसिद्ध महिला खेळाडूंना त्यांच्या खेळापेक्षा त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या वैयक्तिक जीवनावरून त्यातही त्यांचे कुणाशी प्रेमसंबंध वगैरे आहेत, त्यावरून प्रसिद्धी दिली गेली. तसेच प्रत्यक्ष क्रीडांगणात खेळताना त्यांच्या हालचाली कशा स्त्रीदेहवाचक बोली बोलणार्‍या आहेत, यावरही भर दिला गेला. हे सगळे का? कशासाठी? जगाच्या पटलावर स्त्रीदेहाच्या पलीकडे जाऊन तिच्या कर्तृत्वाचे मोजमाप कधी होणार? गुणवत्तेला पर्याय नसतो, हे सगळे ठीकआहे, पण वंचित समाजातही वंचितच आयुष्य जगणार्‍या स्त्रीच्या गुणवत्तेचे निकष काय असावेत, हे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा तपासायला हवे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/