समाजजाणिवा जपणारी व्यापाऱ्यांची संघटना

    दिनांक  13-Dec-2018   

 


 
 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर

 

नाशिक शहर व परिसरातील उद्योगांना जागतिक व्यासपीठ प्राप्त व्हावे, तसेच, जगातील उद्योगांना नाशिकची बाजारपेठ खुली व्हावी यासाठी नुकतेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर संस्थेच्या माध्यमातून जगातील तब्बल २१ देशांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यासाठी चेंबरच्या माध्यमातून नुकतीच विश्वभ्रमंती करण्यात आली. या भेटीवेळी चेंबरच्या विविध सदस्यांनी त्या त्या देशातील चेंबर ऑफ कॉमर्ससमवेत सामंजस्य करार केले आहेत. यात तुर्की, ग्रीस, दक्षिण कोरिया, चीन यांसारख्या देशांचा समावेश आहे. या देशांतील आधुनिक तंत्रज्ञान नाशिककर उद्योजकांना उपलब्ध व्हावे, तसेच तेथील उद्योगजगताचे भावविश्व नाशिकमधील उद्योजकांना समजावे, या २१ देशांतील उद्योगजगताचे नाशिकशी नाते वृद्धिंगत व्हावे यासाठी चेंबरने पुढाकार घेतला आहे.

 

नुकतीच चेंबरच्या शिष्टमंडळाने नागालँड येथे आपला दौरा केला. या दौऱ्यामागे हेतू हा की, भारताच्या अगदी कोपऱ्याला असणाऱ्या नागालँडमधील उद्योगविश्वाला चालना मिळावी. याकामी नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅग्रीकल्चर, नाशिक शाखेचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. या दौऱ्यादरम्यान चेंबरच्या सदस्यांनी तेथील कोहिमा आणि दिमापूर चेंबर ऑफ कॉमर्सला मुंबईतील चेंबर ऑफ कॉमर्स हे हक्काचे ठिकाण आहे, असा विश्वास चेंबरच्या नाशिक शाखेने दिला आहे. तसेच, केवळ व्यापारवृद्धीवर लक्ष केंद्रित न करता तेथील अनाथ आश्रमालाही चेंबरच्या नाशिक शाखेच्या वतीने मदत करण्यात आली. तेथील अनाथ मुलांना बाहेरील विश्व समजावे, तसेच, त्यांच्याही जीवनात आनंदाचे काही क्षण फुलावे यासाठी चेंबरच्या वतीने खास मुंबई सहलीचे आयोजनदेखील करण्यात येणार आहे. याबद्दल अधिक माहिती देताना मंडालेचा म्हणाले की, “नागा नागरिकांकडे कौशल्य आहे. त्यांच्यातील बांबू कलाकुसरीची कला ही अत्यंत सुरेख आहे. मात्र, त्या उत्पादित वस्तू दळणवळणाच्या गैरसोयीमुळे येथे उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत,” भारताच्या ईशान्य भागाला शेष भारताशी संलग्न करण्यासाठी तेथील दळणवळण सुविधा या अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. जरी, नागा नागरिकांना नाशिकचे व्यासपीठ या समस्येमुळे उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्या तरी, चेंबरच्या नाशिक शाखेच्या वतीने तेथील रोटरी क्लब व विविध बिगर शासकीय संस्था यांच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. त्यासाठी विविध सेमिनार, प्रशिक्षण आणि विद्यार्थी संवाद यांवर भर देण्यात आला आहे.

 

१९२७ साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅग्रीकल्चर या संस्थेची स्थापना शेठ लालचंद हिराचंद यांनी केली. गेल्या ४४ वर्षांपासून कार्यरत असलेली याच संस्थेची नाशिक शाखा ‘पद्मश्री’ बाबूभाई राठी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती, कोयना धरण, कोकण रेल्वे अशा अनेकविध कार्यात सहभाग नोंदविला गेला आहे. नाशिककर व्यापाऱ्यांना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई बाजारपेठेची सहज उपलब्धता निर्माण व्हावी यासाठी पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस सुरू होण्यासाठी चेंबरच्या नाशिक शाखेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. जकात व एलबीटी धोरणाविरोधातही शाखेने लढा दिला होता. नाशिक, औरंगाबाद आणि कोकण येथे पर्यटनवृद्धीसाठी विविध परिषदा आयोजित करून तेथील पर्यटनास चालना देण्यासाठी आणि त्यातून उद्योग व्यवसायवाढीसाठी कार्य करण्यात आले आहे. असे मंडलेचा यांनी सांगितले. नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनात आणि जागतिक पटलावर नाशिकचे नाव पोहोचावे यासाठी चेंबरच्या नाशिक शाखेने केलेले कार्य हे निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. जीएसटीची घोषणा झाल्यावर त्याबाबत असणारे सर्व संभ्रम दूर व्हावे यासाठीदेखील चेंबरच्या नाशिक शाखेच्या वतीने मेळावे, परिषदा यांच्या माध्यमातून मोठी जनजागृती केली होती. यात संमत झालेल्या ठरावांची दखल शासनानेदेखील घेतली होती. तसेच, कृषिक्षेत्रातही संस्थेच्या माध्यमातून भरीव कार्य केले जात आहे. प्लास्टिक बंदीबाबत व्यापारी वर्गात जनजागृती करण्यातही संस्थेचा मोठा पुढाकार होतानाशिकमधील उद्योगांना गतिमान स्वरूप प्राप्त व्हावे, उद्योगांचा विकास व्हावा आणि देशातील उद्योग नाशिक केंद्रित व्हावे यासाठी येथील भूखंडांचे दर कमी होण्याची आवश्यकता असल्याचे मंडलेचा यांनी सांगितले. व्यापार आणि अर्थकारण यावरच आपले कार्य विसंबून न ठेवता क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा होईल, यावर चेंबरचा भर आहे. त्यामुळे ही संस्था खऱ्या अर्थाने सामाजिक भान जपणारी संस्था आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/