महाराष्ट्रातील अब्दुल्ले

    दिनांक  13-Dec-2018   

 

 
 
 
 
पोर शेजाऱ्याचे, मात्र पेढे मीच वाटणार,’ अशा प्रवृत्तीची माणसं जगात सगळीकडेच असतात. पण, ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ म्हणत नाचणारे काही राजकारणी हे तद्दन स्वार्थी, ढोंगी आणि सत्तेसाठी लाचारच असतात, असेच म्हणावे लागेल. सध्या आपल्या महाराष्ट्रातही असे बरेच ‘अब्दुल्ला’ दिवाने झाले आहेत. सध्या तीन राज्यात काँग्रेस जिंकली आहे. याचा आनंद प्रत्यक्ष राजकुमार राहुल गांधींना आणि त्यांच्या राजमाता सोनियाजींना झाला नसेल, तितका आनंद महाराष्ट्रातल्या अब्दुल्लांना झाला आहे. काय तो त्यांचा उत्साह, आनंद. बरं, या सर्व अब्दुल्लांनी आपआपला राजकीय पक्ष काढून किंवा सांभाळून आपल्या सात पिढ्यांची बेगमी करून ठेवली आहे. ते देवाघरी गेले की, त्यांचे सुपुत्र, सुकन्या त्यांची गादी सांभाळायला तयारही आहेत, तर अशी ही घराणेबाज नेतेमंडळी काँग्रेसी नसूनही काँग्रेसच्या विजयाला स्वर्ग गवसला, असा आनंद मानत आहेत. अर्थात ते आनंदी आहेत म्हणून दुःख नाही, पण ‘जनतेच्या सेवेसाठी आम्ही राजकारणात,’ ‘२० टक्के राजकारण, ८० टक्के समाजकारणासाठी आम्ही राजकारणात’ म्हणणारे हे नेते जेव्हा देशाच्या समस्येवर काही एक निर्णय घेत नाहीत. केवळ ‘भाजप आणि मोदी हटाव’साठी आपले तन-मन-धन खर्ची करतात, त्यावेळी प्रश्न पडतो की, या नेत्यांना ‘भाजप, मोदी हटाव’ असे का वाटते? उत्तर सोपं आहे, आजपर्यंत जनतेच्या प्रत्येक समस्येला न सोडवता त्या प्रत्येक समस्येला उद्यावर ढकलत देशातील आणि महाराष्ट्रातीलही सत्ताकारण गेली कित्येक दशके चालले होते. पण, २०१४ साली सरकार बदलले आणि समाज, देश आपला आहे, या विचारांनी झपाटून सरकार कामाला लागले. हे निवडून देणारे मतदार केवळ मतदार नाहीत तर ते या भारतभूवर जन्मलेले बंधू आहेत, त्यांचा विकास व्हायलाच हवा, या बंधुत्वाच्या समरस भूमिकेत सरकारने निर्णय घेतले. त्याची अंमलबजावणीही झाली. जनता सक्षमतेकडे चालू लागली. जनता सक्षम झाली तर जनतेच्या लाचारीचा फायदा घेऊन सत्ता मिळवता येणारच नाही. यासाठी सरकार कसेही रोखलेच पाहिजे, या न्यायाने सगळे हौशे गवशे नवशे एकवटले आणि काँग्रेसच्या बेगान्या विजयामध्ये हे अब्दुल्ला बेभान झाले. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या आनंदाची गुणवत्ताही अशीच आहे. महाराष्ट्रातले अब्दुल्ले बेभान झाले आहेत. दुसरे काय?
 

त्यांना भान येवो..

 

महाराष्ट्र शूरांची भूमी, विरांची भूमी आणि हो, ज्ञानी विचारवंतांचीही भूमी. महाराष्ट्राची जनता तशी सारासार विचार करणारी. पण, स्वतःला मराठी लोकांचा पक्ष, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणणाऱ्या राजकीय पक्षाचा महाराष्ट्राची जनता विचार करू शकते, यावरचा विश्वास उडालेला दिसतो आहे. हो ना, तसे नसते तर या पक्षाने भाजपशी सत्तेत हातमिळवणी करून सत्तेचे फायदे लुटून वर केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार कसे चांगले नाही, हे सांगण्यात उरलेली हयात घालवली नसती. अर्थात शिवसेनेला यात वावगे वाटत नाही. पण महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतेच! महाराष्ट्र पुढारलेला आहे. लोक वर्तमानपत्र वाचतात, राजकीय घडामोडींचा परामर्श घेतात. त्यामुळे जनता म्हणते की, शिवसेना पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना जर भाजपइतकाच नकोसा आहे, तर मग खिशातले राजीनामे बाहेर का येत नाहीत? असो, कदाचित आपण राजीनामे खिशात ठेवले होते, हे नेते विसरले असतील. मुळात हिंदुत्ववादी विचारसरणीने एका व्यासपीठावर आलेले भाजप-शिवसेना पक्ष. तसे भाजप आणि शिवसेनेने जनतेसमोर अनेकदा दर्शवलेही आहे. मात्र, सत्तेच्या वाट्यात आपले पारडे जड राहावे म्हणून शिवसनेने सध्या विलाप चालवला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचा झालेला विजय. भाजपने त्यांचा गड असलेल्या तीन राज्यांतली सत्ता गमावली. भाजपचे मित्रपक्ष आणि केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षाला यावर काय वाटायला हवे? अर्थात हे राजकारण आहे. इथे कोणी कुणाचे मित्र नाही नि शत्रूही नाहीत, हे मान्य. तरीही भाजपच्या पराभवात खारीचा वाटा आमचाच हे भूषवण्याची अहमिका सत्तेतल्या भागीदार मित्रपक्षाने केली तर काय म्हणावे? इथे संविधानाचे राज्य आहे आणि न्यायालय ठरवेल तेच होईल. तरीही अयोध्येला जाऊन आरती करून त्याचे ‘मार्केटिंग’ करण्याचे कामही केले गेले. सगळ्यांनाच माहिती आहे की, असे करून काही होत नसते. आपण जे हे करतोय ते करून फक्त फुकटची शो शायनिंग करतो. हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, हेसुद्धा समजण्याची सारासार बुद्धी जर यांच्यात राहिली नसेल, तर मग बोलण्यात काही अर्थच नाही. मात्र, तरीही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो, याचे भान त्यांना येवो हीच इच्छा!

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/