खरी कसोटी पर्थमध्ये

    दिनांक  12-Dec-2018   

 


 
 
 
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाला खरं तर निसटत्या पराभवाची आणि विजयाची अशा दोन्हींची सवय झाली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत भारताचाच विजय होईल, असं ठामपणे कोणीच सांगत नाही. तरी अॅडलेड कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात करून ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मात्र, हा सामना अपेक्षेपेक्षा जास्तच अटीतटीचा झाला. या मालिकेतला दुसरा सामना १४ डिसेंबरपासून पर्थच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. पण, अॅडलेडमध्ये भारताला विजयाची चव चाखता आली, याचा अर्थ त्यांनी आता निर्धास्त राहावे, असा अजिबात नाही. कारण, भारताची खरी कसोटी ही पर्थमध्ये लागणार आहे. अॅडलेड सामन्याचे विश्लेषण केल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे भारतीय फलंदाजांची मधली फळी. केवळ एकट्या चेतेश्वर पुजारावर संघ जिंकू शकत नाही, हे आता विराट कोहलीलाही कळले असेलच. कारण, अॅडलेडच्या मैदानावर ना कोहली चालला, ना त्याचे शिलेदार; फक्त उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या दुसऱ्या सत्रातील ७० धावांमुळे तो फ्रंटफूटवर आल्याचे समाधान कोहलीला असेल. कारण, पहिल्या सामन्यात ३५ टक्के धावा या केवळ पुजारानेच केल्या. अगदी ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर द्रविडच खेळत असावा, अशी पुजाराची खेळी होती. त्यामुळे पर्थमध्ये भारताला विजय मिळवायचा असेल, तर सुरुवातीपासून फलंदाज आणि गोलंदाजांनी जम बसवणे गरजेचे आहे. पण, पहिल्या कसोटीत भारताचे खरे शिलेदार ठरले ते भारताचे ‘फॅन्टास्टिक फोर’ इशांत शर्मा, मोहम्मद शमी, बुमराह आणि अश्विन. या चौघांनी आपले काम चोख बजावले. नाही तरी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आधीच स्पष्ट केले आहे की, पर्थच्या मैदानात भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अधिक चांगली कामगिरी करतील. त्यामुळे भारताला हे आव्हानच असलं तरी, दुसरीकडे मात्र ऑस्ट्रेलियाला सर्वोत्तम कामगिरी करण्याचं प्रेशर नक्कीच असेल. पण, ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू ठरला तो नॅथन लियोन. शेवटच्या क्षणापर्यंत भारताच्या विजयाचा दोर त्याने आपल्या हातात ठेवला होता तर, दुसरीकडे पर्थचे मैदान हे वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कसाठी पर्वणीच ठरणार आहे. त्यातच भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतीमुळे पर्थचा सामनाही खेळू शकणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भारताला पर्थमध्ये जिंकायचे झाल्यास सांघिक गुणवत्ता दाखवणे गरजेचे असेल.
 

अब खाली हाथ ना आना...

 

४३ वर्षांचे शल्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला यावर्षी हॉकी विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आणि या शल्यासोबत मैदानात उतरलेले भारतीय युवा खेळाडू अगदी मंतरल्यासारखे खेळले. आपल्या गटातील सगळे सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली. पण, यापुढचा प्रवास हा भारतासाठी आणखी खडतर होणार आहे, कारण उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ बलाढ्य नेदरलँडशी होणार असून या सामन्यात चुकीला कोणताही वाव नाही. कारण, तीनवेळा विश्वविजेत्या नेदरलँडने आतापर्यंत एकाही सामन्यात पराभवाची चव चाखलेली नाही. त्यामुळे भारताला आक्रमक होणे बंधनकारक असणार आहे. भारताने आपल्या गटातील प्रत्येक संघाला धूळ चाखत खेचून आणलेल्या यशश्रीची सध्या प्रसारमाध्यमांवर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे, ‘अब खाली मत आना.’ कारण, भारताने १९७५ नंतर उपांत्य फेरी कधीही गाठली नाही आणि १९७५ सालीच भारताने एकमेव हॉकी विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे ही उपांत्यपूर्व फेरी भारतासाठी अंतिम सामन्यासारखीच असणार आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला भारताने ५-० ने पराभूत केल्यानंतर आता फक्त नेदरलँडवर भारताला लक्ष केंद्रित करायचे आहे. आतापर्यंत भारताचा जिंकण्याचा क्रम पाहिला तर भारताने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणण्यासाठी आक्रमक खेळण्याचे तंत्र वापरले आहे. मात्र, कॅनडा, बेल्जियमविरोधात भारताने बचावात्मक पवित्रा घेतला आणि तो सामना बरोबरीत सुटला, तर दुसरीकडे नेदरलँडचा संघ हा सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबतो, याचा प्रत्यय कॅनडा विरुद्धच्या सामन्यात आला. हा सामना एकतर्फी झाला असला, तरी भारताला या सामन्यातून धडा घेण्यासारखे बरेच प्रसंग होते. कॅनडाने सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून स्वीकारलेले बचावात्मक धोरणच धोकदायक ठरले आणि बेल्जियमने हा सामना ५-० असा एकतर्फी जिंकला. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला संघाच्या आक्रमक खेळीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण, या मिळालेल्या संधीचा फायदा उठवणे उपांत्यपूर्व फेरीत महत्त्वाचे ठरेल. ही खडतर लढत असली तरी, जो संघ मिळालेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करेल, तोच विजयी ठरेल हे मात्र नक्की. त्यामुळे ४३ वर्षांनंतर त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का, हे गुरुवारी कळेल...

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/