नियम पाळू, अपघात टाळू

    दिनांक  11-Dec-2018   


 

गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्याच रोजच्या वापरातल्या गोष्टीबाबत धक्कादायक टिप्पणी केली. देशभरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये गेल्या पाच वर्षांत १४ हजार, ९२६ जणांचा बळी गेला. विशेष म्हणजे, ही आकडेवारी सीमारेषेवर आणि दहशतवादी हल्ल्यांत जीव गमावणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मानवाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या लोकांशी, व्यावसायिकांशी, उद्योगधंद्यांशी वैयक्तिक वा व्यापारी तत्त्वावरील संबंध सुरळीत ठेवण्यासाठी बांधलेला रस्ता ही पूर्वापार चालत आलेली अत्यावश्यक गरज. पण, गेल्या काही काळापासून हे रस्ते मानवाचे भूतलावरचे संबंध तोडून दुसऱ्याच कुठल्यातरी जगात पोहोचविणारे सापळे बनल्याचे समोर आले.

 

रस्त्यांची बांधणी, उभारणी करण्याची जबाबदारी केंद्रासह, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्ताधाऱ्यांची. आपली जबाबदारी ही मंडळी कधीकधी व्यवस्थितपणे निभावतातही. मात्र, सर्वोच्च न्यायालयासमोर आलेल्या आकडेवारीतून या मंडळींनी रस्ता म्हणजे मृत्युमार्ग केल्याचे दिसते. देशातले, राज्यातले इतकेच काय छोट्या-मोठ्या शहरातले कोणतेही रस्ते घ्या, त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. हे खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अशा अपघातात शेकडो, हजारो लोक मरण पावतात, पण सत्ताधारी आणि प्रशासनाला कधी त्याचे सोयरसुतक पडल्याचे दिसले नाही. उलट सरकारमधील या दोन्ही घटकांनी आपापली जबाबदारी एक-दुसऱ्यावर ढकलण्यातच धन्यता मानली. म्हणजे एखादी व्यक्ती जीवानिशी जाते, कोणी पोरके होते, कोणाचा आधार जातो, तर कोणाचे आयुष्यच अधूपणाच्या जखमा घेऊन राहते. हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्नही उपस्थित होतो.

 

जोपर्यंत जनतेला रस्त्याचा प्रश्न गांभीर्याचा, जिव्हाळ्याचा वाटत नाही, तोपर्यंत हे सुरूच राहील. आज जातीच्या वा धर्माच्या नावावर कोणी चिथावणी दिली तर त्यामागे धावणारे हजारो, लाखो लोक एकाएकी गोळा होतात. तेच रस्त्यांच्या वा अन्य प्रश्नांच्या बाबतीत कोणी कितीही अभ्यासपूर्ण आणि कळकळीने बोलले तरी लोकांच्या हृदयाला लागत नाही, भेदत नाही. म्हणजेच याला काही अंशी जनतेची मानसिकताही जबाबदार असल्याचे म्हणता येते. यावर उपाय जनतेनेच योजायचा आहे, मतदानाच्या माध्यमातूनही आणि वाहतुकीचे, सुरक्षेचे नियम पाळूनही!

 

शिक्षकविरोधी विद्यार्थी

 

आपल्या संस्कृतीत शिक्षकाचे स्थान नेहमीच आदरणीय आणि वंदनीय मानले गेले. माता-पित्यानंतर माणसाला जीवनमार्ग दाखवतो तो, शिक्षक म्हणून आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षक वा गुरूला हे थोरपण प्राप्त झाले. पण, गेल्या काही काळापासून शिक्षकांप्रति असलेली आदराची भावना लोपते की काय, असाही प्रश्न उपस्थित झाला. कारण चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका वा नाटक वगैरेंतून शिक्षकांची उभी केलेली प्रतिमा. याच्या जोडीला शिक्षकांमधील राजकारणाने, आंदोलनानेही जनतेच्या मनात असलेल्या त्यांच्या स्थानाला चांगलाच धक्का बसला.

 

नुकतीच अमेरिकेतल्या कालहाऊन काऊंटी माध्यमिक विद्यालयातील एक घटना उघडकीस आली. लिनेरिया लिन ग्रोवर नावाच्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांनाच लाथा आणि थपडा हाणल्या. शिक्षक वर्गात आल्या आल्या ही घटना घडली आणि यावेळी वर्गातील इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या सहकारी विद्यार्थिनीला न रोखता कुत्सितपणे, खिजवण्याच्या आविर्भावात मोठमोठ्याने हसण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर या पीडित शिक्षकाने विद्यार्थिनीला कोणताही विरोध न करता बाहेर जाणे पसंत केले, तर या विद्यार्थिनीने आणखी एक कमाल केली. शिक्षक बाजूला होताच ती शिक्षकांच्या खुर्चीवर बसली आणि समोरील टेबलावर पाय ठेऊन रुबाब दाखवू लागली. नंतर मात्र या विद्यार्थिनीवर कारवाई करण्यात आली. तिला आता शिक्षाही होईल. पण यामुळे अमेरिकेतील उथळपणा जगाच्या चव्हाट्यावर आला. या घटनेच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओखाली कित्येकांनी याविरोधात मत मांडले. शिवाय सदर विद्यार्थिनीला कठोर शिक्षा देण्याचीही मागणी केली. पण केवळ शिक्षा देऊन हे असे प्रकार थांबतील का?

 

मुळात ही अशी परिस्थिती का उद्भवली, याचा विचार करता, संस्कारांचा नि संस्कृतीचा मुद्दा येतो. पाश्चात्त्य संस्कृती नेहमीच चंगळवादी राहिली. भारतीय संस्कृती आणि संस्कारांशी तुलना करता तिथे एखाद्या सवंगतेचे, स्वैराचाराचे स्तोम माजल्याचेही दिसते. तरीही शिक्षकाची भूमिका आताआतापर्यंत महत्त्वाची राहिली. मात्र, जसजशी विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता आणि मानसिकता बदलत गेली, आपण काहीही केले तरी आपल्याला कोणी अडवू शकत नाही, ही भावना वाढीस लागली, तसतशी शिक्षकांबद्दलची कृतज्ञता लोप पावू लागली. कालहाऊ काउंटीमधील घटना त्याचेच निदर्शक आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांनी या गोष्टीचे अनुकरण करू नये, एवढेच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/