अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, वानवडी पुणे

    दिनांक  11-Dec-2018

 


 
 
अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट,’ पुणे येथील एक सक्षम ट्रस्ट. जो दिव्यांगांसाठी काम करतो. मूकबधिर व्यक्तींचे दु:ख, त्यांच्या समस्या जाणून, त्यावर शक्य होईल त्या मार्गाने काम करणारी ‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था आणि तिच्या उपक्रमांची माहिती समजून घ्यायलाच हवी...
 

एकदा मी गाडीने जात असताना एक माणूस माझ्या गाडीसमोर चालत होता. मी मागून हॉर्न वाजवत होतो पण, तो रटेलसारखा तसाच पुढे चालत राहिला. मला खूपच राग आला. समोर जाऊन त्याला म्हटले,“इतका वेळ मी हॉर्न वाजवत आहे, तुला ऐकू येत नाही का?” तो काही न बोलता माझ्याकडे बघत राहिला. माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रीत रागाचे भाव आले. काही वेळाने त्याच्या एकूण हावभावावरून तो मूकबधिर असल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या रागाची जागा करूणेने घेतली. घरी येईपर्यंत मी त्या घटनेचा विचार करत होतो. मला स्वत:लाच राहून राहून अपराधी वाटायला लागले. हातापायाने अपंग असलेल्या व्यक्ती समाजात ओळखू येतात. त्यामुळे त्यांना समाजाची सहनुभूती आणि साहाय्य लगेच मिळते पण, मूकबधिर मुलांची खरंच समाजात किती कुचंबणा होत असेल, हे मला त्या दिवशी कळले. कारण, ही मुले दिसायला एकदम सर्वसामान्यांसारखीच असतात. त्यामुळे त्यांना समाजाची सहानुभूती वा साहाय्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असणार, याची चांगलीच जाणीव मला आता होत होती. ही मुले कसं स्वत:ला समाजात वावरताना सिद्ध करत असतील, कोण-कोणत्या आव्हानांना त्यांना तोंड द्यायला लागत असेल, कुणीतरी त्यांच्या समस्यांवर विचार करत असेल का? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या मनात काहुर निर्माण केले. ते काहुर मला स्वस्थ बसू देईना. अनेक सामाजिक संस्थांशी सतत निगडित असलेले माझे एक मित्र किशोर बालीगर यांच्याजवळ मी मूकबधिरांच्या सामाजिक प्रश्नांवर सहज विषय काढला. तेव्हा ते मला म्हणाले,“कर्णबधिर मुलांसाठी अतिशय उत्तम काम करणारी एक सामाजिक संस्था मला माहीत आहे. ती ‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट.’ आपण त्यांच्याकडूनच तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे घेऊ.” आम्ही त्या संस्थेचे संचालक लक्ष्मण कागणे यांची वेळ घेऊन संस्थेला भेट देण्यासाठी गेलो. अतिशय आदरपूर्वक आमचे स्वागत करत लक्ष्मण कागणे हे आम्हाला त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. त्यांनी सांगायला सुरुवात केली.

 

अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टपुण्यात १९७७ पासून कर्णबधिर मुलांसाठी काम करत आहे. आरोग्य सुविधा, समाज कल्याण, विशेष शिक्षण, पुनर्वसन व प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये ही संस्था कार्य करते. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतही ही संस्था विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सेवाकार्य करत आहे. कर्णबधिर मुलांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यांच्या समस्या जगासमोर मांडून त्यावर मूलगामी संशोधन व्हावे आणि या माध्यमातून या मुलांसाठी काहीतरी सेवाकार्य करता यावे, या उदात्त हेतूने डॉ. एस. एस. भुतडा यांनी ‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. डॉ. भुतडा हे स्वत: सिनिअर ई.एन.टी अ‍ॅण्ड जनरल सर्जन आणि ऑक्युपेशनल हेल्थ स्पेशालिस्ट असल्यामुळे त्यांनी समाजातल्या दिव्यांगांसाठी विविध वैद्यकीय प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला आणि त्यातूनच ‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून अनेक मोठे प्रकल्प साकार झाले.

 

आयोध्या जनरल हॉस्पिटल :

संस्थेने १९९२ पासून वनवडी येथे जनरल हॉस्पिटल सुरू केलेले आहे. रुग्णालयात दिव्यांगांबरोबरच इतर सामान्य गरीब रुग्णांवरदेखील नाममात्र दरात उपचार केले जातात. तसेच दरवर्षी ३०० ते ४०० रुग्णांच्या कान-नाक-घसा तसेच कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

 

अपंग मदत केंद्र व राष्ट्रीय बहिरेपणा निर्मूलन प्रकल्प :

या प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत ७१७ शिबिरे घेण्यात आली असून या शिबिरांमधून जवळ जवळ दोन लाखांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि आवश्यकतेनुसार ३७ हजार, ८७७ रुग्णांना कृत्रिम साधनांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये श्रवणयंत्रे, व्हीलचेअर, तीन चाकी सायकल, कॅलिपर, क्रचेस, चश्मे इ. साधनांचा समावेश होता. दरवर्षी साधारणपणे १० ते १५ लाख रुपयांची साधने संस्थेमार्फत वाटली जातात.

 

मनुष्यबळ निर्मिती :

विशेष शिक्षण व पुनर्वसन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी योग्य व प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासते. ती कमतरता भरून काढण्याचे कार्य संस्था गेली १७ वर्षे करत आहे. भारतीय पुनर्वसन परिषद, नवी दिल्ली मान्यताप्राप्त ८ ते १० प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेमार्फत चालवले जातात. आजपर्यंत या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून चार हजार, ९१५ पेक्षा जास्त मनुष्यबळाची निर्मिती झाली. संस्थेचे विशेष प्रशिक्षण महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्याशी संलग्न आहे.

 

ग्रामीण आरोग्य प्रकल्प :

ग्रामीण भागात आरोग्य विषयक सेवा पुरवण्याच्या उद्देशातून संस्था २००६ पासून ग्रामीण आरोग्य प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संस्थेने पुरंदर तालुक्यातील २० गावे दत्तक घेतली असून या गावांमधे विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातात.

 

निवासी कर्णबधिर विद्यालय:

सन २००० मध्ये संस्थेने कर्णबधिर विद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी फक्त पाच विद्यार्थ्यांनी या विद्यालयात प्रवेश घेतला होता. आज संस्थेमध्ये ७५ कर्णबधिर विद्यार्थी विशेष शिक्षण, निवास व भोजन याचा फायदा घेत आहेत. यापैकी ४० विद्यार्थ्यांसाठी शासन अनुदान देते. बाकी ३५ विद्यार्थ्यांचा खर्च संस्था करते. संस्थेला यामध्ये समाजातील दानशूर व्यक्तींकडून देणगी दिली जाते आणि त्यातून हा खर्च भागवला जातो. आजपर्यंत २९७ कर्णबधिर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

 

सर्व शिक्षा अभियान प्रकल्प :

सर्व शिक्षा अभियानप्रकल्पांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या मुलांना संस्थेमार्फत सेवा पुरवल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, ऑडिओमेट्री तपासणी, बेरा चाचणी, वाचा बोध, तसेच शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचप्रमाणे विशेष व सामान्य शिक्षकांसाठी लघु व दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांची मान्यता आहे.

 

संस्थेच्या भावी योजना:

एक अद्ययावत सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे धर्मादाय रुग्णालय सुरू करण्याची संस्थेची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. तसेच सध्या कार्यरत असलेला प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार तसेच स्वायत्त संस्थांनीदेखील केला आहे. संस्थेस आतापर्यंत तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत,

. १९९२ - फिकी नवी दिल्ली यांचा अपंग सेवेबद्दल उत्कृष्ट कार्य पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते.

. १९९९ - सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत अपंगांची सेवा व पुनर्वसन कार्यासाठी उत्कृष्ट कार्य पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते.

. २००४ - प्रशिक्षण कार्यासाठी भारतीय पुनर्वसन परिषद, नवी दिल्लीमार्फत उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून मान्यता

. २००६ - ए. आय. बी. एस. फाऊंडेशन नवी दिल्लीमार्फत आरोग्य व सामाजिक सेवेबद्दल पुरस्कार राज्यपाल यांचे हस्ते

हे सर्व सेवाकार्य संस्था गेली अनेक वर्षे अविरत यशस्वीपणे राबवत आली आहे, याचा संस्थेला अभिमान आहेच; पण याची जाणीवदेखील आहे की, यामध्ये सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय पुनर्वसन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र प्राथमिक परिषद, सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सर्व देणगीदार यांचा मोठा सहभाग आहे.

भारत सरकारने अपंगांसाठी विविध कायदे केलेले आहेत, ज्यामध्ये अपंगव्यक्ती अधिनियम २०१६ अन्वये २१ अपंगत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे, या कायद्यान्वये अपंगांना सर्व क्षेत्रांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अपंगांसाठी चार टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. तसेच अपंगांसाठी चार टक्के निधी राखीव ठेवणे हे बंधनकारक आहे. सदर माहिती सर्व अपंग व गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवणे हे तूर्त मला आपले सर्वांचे आद्य कर्तव्य वाटते आहे.

 
- काशिमनाथ पवार
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/