जोखीमभरली कामे

    दिनांक  10-Dec-2018   जगाच्या पाठीवर अशी धोकादायक कामे करणे, त्यातला रोमांच अनुभवणे अनेकांना आवडते, पण बऱ्याच लोकांना अशी कामे करण्याची भीतीही वाटत असते. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या मंडळींचे नक्कीच कौतुक करायला हवे.

 

महाविद्यालयीन शिक्षण झाले, पदवी वा पदव्युत्तर पदवी मिळवली की, तरुणांना वेध लागतात ते नोकरीचे. मनासारखी नोकरी आणि सर्वोत्तम ऑफर मिळाली की, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात नोकरी करण्याची त्यांची तयारी असते. काही काही कंपन्यांत नोकरी मिळवणे तर तरुणांसाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखेच ठरते. परंतु, जगामध्ये काही अशाही नोकऱ्या आहेत, ज्या देणाऱ्या आस्थापनांत आणि ती नोकरी प्रत्यक्ष करण्यात जीवाला धोका हा नेहमीच उद्भवतो. काही लोक रोमांचक अनुभवांसाठी अशा नोकऱ्या निवडतात तर काही लोक अशा नोकऱ्यांना स्वतःची जबाबदारी समजतात. जाणून घेऊया अशा नोकऱ्यांबाबत.

 

बॉम्ब निष्क्रिय करणारे विशेषज्ञ. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी दहशतवादी वा समाजविघातक शक्ती सर्वसामान्य लोकांना लक्ष्य करण्यासाठी बॉम्ब ठेवतात, त्यावेळी त्याची माहिती बॉम्ब निष्क्रिय करणाऱ्या विशेषज्ज्ञांना दिली जाते. माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब निष्क्रिय करण्यात तज्ज्ञ असलेल्यांचा चमू संबंधित ठिकाणी पोहोचतो. जिथे कुठे बॉम्ब ठेवल्याचे आढळते, त्यावेळी बॉम्ब निष्क्रिय करणारे विशेषज्ज्ञ आपल्या अंगावर वजनदार पोषाख घालून बॉम्ब निष्क्रिय करतात. पण हे काम फारच जोखमीचे असते. कारण थोडीशी जरी चूक झाली, बेजबाबदारीने वागले तर त्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो. दुसरीकडे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांचे जीवनही काही कमी धोकादायक नसते. जेव्हा केव्हा कुठे आग लागल्याचे समजते, तेव्हा त्याची पहिली सूचना अग्निशमन दलाला दिली जाते. आग लागलेल्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना, पीडितांना आपल्या जीवनाची जोखीम घेणारे अग्निशमन दलातील जवान देवदूतासारखेच भासतात. कधी-कधी आगीपासून घरात, इमारतीत, संबंधित परिसरात अडकलेल्या लोकांचा, प्राण्यांचा बळी जाऊ नये म्हणून संपूर्ण प्रशिक्षित जवान स्वतःच आगीच्या लोळात होरपळतात, जखमी होतात, जीवही गमावतात. चकमकतज्ज्ञ हादेखील असा जीवावर उदार होऊन केला जाणारा पेशा. पोलीस पथकातील हे सदस्य कुख्यात गुंडांशी, गुन्हेगारांशी होणाऱ्या चकमकीवेळी हल्ला आणि स्वतःचा बचाव करण्यात कुशल असतात. तथापि, कितीतरीवेळा गुन्हेगारांशी होणाऱ्या चकमकीवेळी या पथकातील सदस्यही गोळ्यांना बळी पडतात, पण शेवटी सद्रक्षणाचा वसा घेतलेला असल्यामुळे ते हुतात्माही ठरतातच.

 

तेल, गॅस वा वीज कर्मचारीदेखील वरील जोखीमधारकांच्या श्रेणीतच येतात. तेल, गॅस वा वीज कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांची एखादी छोटीशी चूकदेखील त्यांना जीवानिशी घेऊन जाऊ शकते. म्हणजेच त्याचा धोका त्यांच्यासोबत कायमच असतो. काही काही वेळा आपल्या वाचनात वा ऐकण्यात येते की, तेल वा गॅस डेपोमध्ये एका छोट्याशा ठिणगीमुळे लागलेल्या आगीने तांडव माजवले, लोक मृत्युमुखी पडले. शिवाय त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीही कित्येक तासांचा कालावधी लागतो. अशा प्रत्येकक्षणी त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा जीव टांगणीलाच लागलेला असतो. पर्वतीय प्रदेशात गाईडचे काम करणाऱ्यांचा व्यवसायदेखील कमी आव्हानांनी भरलेला नसतो. या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी हे काम अतिशय रोमांचकारी अनुभव देणारे असते, पण यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणाचीही गरज असते. पर्वतारोहण करणाऱ्यांना त्यांच्या इच्छितस्थळी कशाप्रकारे पोहोचवायचे, हिमस्खलन, भूस्खलन, बर्फाच्या वादळातून वा मुसळधार पावसापासून कसे वाचवायचे, हा त्यांच्या प्रशिक्षणाचाच भाग असतो. मोठमोठ्या पहाडांवर, पर्वताच्या, डोंगरांच्या सुळक्यांवर गिर्यारोहणावेळी कित्येकदा हे गाईड जीव धोक्यात घालून पर्वतारोहण करणाऱ्यांची मदत करतात. अशावेळी त्यांच्या स्वतःच्या प्राणांची बाजी मात्र लागलेलीच असते.

 

मनोरंजन करणाऱ्या चित्रपट क्षेत्रातही अशी कामे आहेतच. चित्रपटांमध्ये आपण नायकाला निरनिराळे विस्मयकारक कारनामे करताना पाहतो आणि टाळ्या, शिट्या वाजवतो. बहुतांशवेळा या सगळ्या करामती नायकांसाठी स्टंटमॅनच करत असतात. पण या कामामुळे ना त्यांना कधी ओळख मिळते ना कधी त्यांचे नाव चमकते. या करामती करताना सुरक्षाविषयक नियम आणि निकष पाळले जातातच, तरीही जराशी चूकदेखील त्यांना अधू करू शकते किंवा जीवही घेऊ शकते. जगाच्या पाठीवर अशी धोकादायक कामे करणे, त्यातला रोमांच अनुभवणे अनेकांना आवडते, पण बऱ्याच लोकांना अशी कामे करण्याची भीतीही वाटत असते. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या मंडळींचे नक्कीच कौतुक करायला हवे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/