आयुष्य थांबत नाही, चालत राहा...

    दिनांक  10-Dec-2018   


 


इच्छा हा एक भाव आहे. इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आयुष्य संपत नसतं. आयुष्याला सातत्याने गती देणे हेच यश आहे, हे सांगणारी काशिनाथ पवार यांची जीवनकथा...

 

पुणे शहरात सामाजिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नाव असलेले काशिनाथ पवार हे मूळ श्रीरामपूर, अहमदनगरचे. घरी वारकरी पंथाचे धार्मिक संस्कार. त्यामुळे पाप-पुण्य, नीतिमत्ता यांचे धडे नकळत मिळत गेले. काशिनाथ यांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. नववीच्या परीक्षेनंतर अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. उपचारादरम्यान समजलं की, त्यांच्या श्वासनलिकेमागे मांसाची मोठी गाठ तयार झाली होती. गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना दोन-तीन महिने रुग्णालयात राहावे लागले. दहावीचे वर्ष होते. शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरीही त्यांना उपचारासाठी रुग्णालयात राहावे लागले. मोठ्या जिद्दीने ते त्या आजारातून उठले आणि पुन्हा शाळेत जाऊ लागले. पण त्या उपचारानंतर त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला. ते प्रत्येक गोष्ट विसरू लागले. दहा पावलांवर दुकान असले आणि त्या दुकानामधून एखादी वस्तू आणायची असली तरी, त्या वस्तूचे नाव रस्त्यावरून घोकत गेले तरी, दुकानात जाईपर्यंत त्या वस्तूचे नाव ते विसरायचे. इतके विस्मरण झाले होते. त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरही झाला. सातत्याने पाठांतर करूनही, प्रयत्न करूनही त्यांच्या लक्षात काहीच राहत नसे. तसेही डॉक्टरांनी सांगितले होतेच की, शस्त्रक्रियेच्या आणि औषधांच्या परिणामामुळे त्यांची स्मरणशक्ती क्षीण होईल. मात्र, जिद्द आणि प्रयत्न ठेवले, सकारात्मक आशावाद ठेवला, तर काही वर्षांनी स्मरणशक्ती सामान्य होईल.

 

डॉक्टरांचे म्हणणे मनावर कोरून काशिनाथ यांनी सातत्यपूर्वक प्रयत्न केले. दहावीची परीक्षा दिली. त्यात एक विषय राहिलाच. काशिनाथ यांना तर विज्ञानाची आवड होती. विज्ञान विषय घेऊन त्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे होते. नापास झालेल्या आणि स्मरणशक्ती विस्कळीत असलेल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश कसा मिळणार? पण त्यांनी जिद्द सोडली नाही. दुसर्‍यांदा दहावीच्या परीक्षेला बसले. कसेबसे उत्तीर्ण झाले. तोपर्यंत त्यांची स्मरणशक्ती मूळपदावर येऊ लागली होती. त्यानंतर खूप प्रयत्नांनी त्यांनी कोपरगावच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण त्यावेळी घरच्यांनी, जवळच्या मित्रांनी सोडून बाकीच्या सगळ्यांनी काशिनाथ यांना आगंतुक सल्ला दिलाच की, “वेड्या, तू सायन्स घेतलंस. दहावी तुला एका दमात सुटली नाही. स्वत:च्या हातांनी पायावर कुर्‍हाड मारून घेतलीस.” पण काशिनाथ यांचा विश्वास पक्का होता. त्यांनी विषय बदलला नाही. पुढे पदवी, त्यानंतर कामगार कायदा पदविका, व्यवस्थापन पदविका पूर्ण केली. उच्च शिक्षण प्राप्त केले. त्यानंतर ते उद्योगाकडे वळले. प्रत्येक उद्योगात अपयशच आले. एकदा सर्व योग जुळून आले आणि दुग्धव्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. बँकेने कर्ज दिले. सगळ्या अटींची त्यांनी पूर्तता केली. त्यासाठी प्रशिक्षणही घेतले. पण उद्योग सुरू करायचा, तर कंपनी आणि भागधारक दाखवायचे होते. काही नातेवाईकांना विचारले, तर ते म्हणाले, “नावापुरता तू आम्हाला घे. पण आम्हाला वेळ नाही.” काशिनाथ यांनी एकट्याने तो उद्योग उभा केला. सुरुवातीला तोट्यात चाललेल्या उद्योगाला कुणीही मदत केली नाही. नंतर नफा मिळू लागला. त्यावेळी इतर सगळे भागधारक एकवटले. त्यांनी काशिनाथ यांना बैठकीत सांगितले की, “आम्ही पण भागीदार आहोत. दरवर्षी आपल्यापैकी एकजण व्यवसाय पूर्णत: सांभाळेल, असा सगळ्याचा क्रम असेल.” सगळ्यांनी ठरवल्यावर काशिनाथ यांना काही उपायच उरला नाही. जिद्दीने आणि मेहनतीने उभारलेला व्यवसाय इतर भागधारकांनी इर्षेपोटी आणि स्वार्थापोटी वाटून घेतला. कायद्याने ते योग्य असेलही पण, त्या उद्योगात या भागधारकांचे योगदान शून्य होते. काशिनाथ त्या व्यवसायातून त्या वर्षी बाजूला झाले. अर्थातच, इतरांना त्या व्यवसायाचे ओ का ठो माहिती नव्हते. वर्षा दोन वर्षातच त्या उद्योगाचे तीनतेरा वाजले. उद्योग बंद झाला. त्या भागीदारांना आपली चूक उमजली.

 

त्यानंतर काशिनाथ यांनी ठरवले की, घरच्या जबाबदाऱ्या आहेत. आपण आयुष्याला पूरक असे लक्षवेधी जगणे जगायला हवे. ते औरंगाबादमध्ये एका स्वयंसेवी संस्थेमध्ये उसतोड मजुरांच्या मुलांसाठी उपक्रम राबवू लागले. संपर्क, कार्यक्षेत्र व अनुभव वाढत होता. त्यातूनच मग ते अनिल भस्मे यांच्या संपर्कातून समरसता साहित्य परिषदेकडे वळले. पुण्यात स्थायिक झाले. एका बहुराष्ट्रीय कंपनीचे मोठे अधिकारी झाले. आयुष्य स्थिरावल्यावरही ते शांत बसले नाहीत. पुणे हे सामाजिक चळवळीचे केंद्रस्थान. काशिनाथ यांनी पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीमधील होतकरू युवकांना केंद्रित केले. त्यांच्यामध्ये सकारात्मक साहित्यवृत्ती वाढीस येण्यासाठी प्रयत्न केले. २०१९ भीमा-कोरेगावच्या निमित्ताने समाजामध्ये सकारात्मक विचार पेरावेत, यासाठी ते सध्या कार्यरत आहेत. ते म्हणतात, “जिद्द असेल, आत्मविश्वास असेल, तर इच्छित साध्य होतेच होते. एक वाट तुटली, तर दुसरी वाट सुरू करा पण करा. अशक्य असे काही नाहीच.”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/