हिटलर, फाशी वगैरे...

    दिनांक  09-Nov-2018   


तुका म्हणे ऐसा नरा मोजुनी माराव्या पैजारा’ या अभंगपंक्ती ज्यांच्यासाठी एकदम चपखल बसतात, अशांच्या मनात नेहमी विचार सुरू असतो

 

मना दुर्जना नित्य बडबडत जावे।

जातीपाती स्वार्थाचे राजकारण करावे॥

निवडणुकीत मूर्खांना भुलवीत जावे।

मतांच्या लालसेपोटी सर्व काही करावे॥

असे हे सत्तापिपासू लोक स्वार्थासाठी वाट्टेल ते बरळतात. अर्थात, अशा लोकांमुळे जनतेचे निखळ, निर्भेळ आणि विनाशुल्क मनोरंजन होते. मला माहिती आहे की, हे वाचल्याबरोबर राज ठाकरे, गेला बाजार प्रकाश आंबेडकर, ओवेसी बंधू, जितेंद्र आव्हाड, मल्लिकार्जुन खरगे ते अगदी ‘संजय’ हे सारे आठवतील.(इथे ‘संजय’चा अर्थ निरूपम आणि राऊत असा दोन्ही घ्यायला हरकत नाही.) असो. तर ही मंडळी सातत्याने आपल्या बोलण्याने लोकांचे मनोरंजन करीत असतात. अर्थात, ते मनोरंजन करत असल्याने त्यांच्या बोलण्याला कुणीही गंभीरपणे घेत नाही. त्यामुळेच ओवेसी कोणताही संदर्भ न देता म्हणाले की, “अमित शाहंना देश मुस्लीममुक्त करायचा आहे.” काल-परवा मल्लिकार्जुन खरगे हे नरेंद्र मोदींना ‘हिटलर’ म्हणाले. सगळ्यांना माहिती आहे की, ‘हिटलर’ त्याच्या विरोधकांना गॅस चेंबरमध्ये मरण्यासाठी टाकायचा. मोदींनी असे काही केले आहे? नाहीच... पण खरगे तरीही मोदींना ‘हिटलर’ म्हणाले. कारण, खरगेंना माहिती आहे की, आपल बोलणं कुणी गंभीरपणे घेतच नाही. मग बोला काहीही. मल्लिकार्जुन जर इतकं मनोरंजन करतात मग, संजय निरूपम कसे मागे राहतील? ते म्हणाले, “येत्या निवडणुकीनंतर जनता मोदींना फासावर चढवेल.” संजय यांच्या विधानावर काय बोलावे? वैऱ्यालाही फासावर चढवण्याचा विचार भारतीय संस्कृती आणि मानसिकतेमध्ये होत नाही. या संजयाचे आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचे भाजप आणि भाजप नेतृत्वाबरोबर मतभेद असतीलही. पण, त्यासाठी संजयने पंतप्रधानांच्या मृत्यूची अभद्र कामना देशभर दिवाळी साजरी होत असताना करणे अमानवीय आहे. संजय निरूपम यांना म्हणूनच एवढेच विचारावेसे वाटते की, फासावर देणे-बिणे पाकिस्तानात असते, इथे नाही. तुम्ही भारताला पाकिस्तान समजता का? तसेही घोडा मैदान जवळ आहे. येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला फासावर नाही, पण कायमचेच नक्की घरी बसवेल यात शंका नाही. बाकी चालू द्या तुमचे, हिटलर, फाशी वगैरे...

 
 
 

‘फुल्या फुल्यां’ची धनी रेणुका

 
 
 

सगळ्यांनाच आपला वैभवशाली सकारात्मक इतिहास आवडतो. अशावेळी कुणी आपल्या गुलाम असलेल्या, अत्याचाराने त्रस्त असलेल्या इतिहासाला उराशी कवटाळून ठेवले तर? तर अशा व्यक्तींना कोणती विशेषणे वापरावी? मनात आणि डोळ्यांसमोरही या व्यक्तींबाबत अनेक ‘फुल्या फुल्या’ असलेली विशेषणे तरळतील. सभ्य भाषेत म्हणू नाही हो, असे कोणी मूर्ख असेल का की, ज्याला आपली ओळख वाईट आणि कलंकित इतिहासाशी जोडले जावे असे वाटत असेल? पण तसे नाही बरं. अशीही माणसं असतात, नव्हे आहेत. दूर कशाला जा, काँग्रेसच्या ‘विकटहास्य फेम’ रेणुका चौधरी यांनाच पाहा. त्या अशा ‘फुल्या फुल्यां’च्या लोकांच्या प्रतिनिधी शोभतात. त्याचे झाले असे की, भाजप आ. राजा सिंग यांनी वक्तव्य केले की, “प्राधान्य विकासाला असेल, तर दुसरं प्राधान्य हे शहरांची नावं बदलण्याला असेल.” ज्यांनी राष्ट्रासाठी, तेलंगणसाठी व समाजासाठी कार्य केलं, अशा थोरांची नावं शहरांना द्यायला हवीत. हैद्राबादचे नाव ‘भाग्यनगरी’ करण्याचा विचार आहे. आता यात राजा सिंग काय वाईट बोलले का? कारण, या शहराचे नाव पुरातनकाळी ‘भाग्यनगर’ असेच होते. १५९२ साली परकीय आक्रमक कुली कुतूब शहाने आक्रमण करून या शहराचे नाव ‘हैद्राबाद’ ठेवले. ‘भाग्यनगर’ अस्सल भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा वारसा असणारे नाव चांगले की, परदेशी आक्रमणकर्त्यांनी आपल्या उन्मादात अत्याचाराची निशाणी म्हणून ठेवलेले हैद्राबाद चांगले? कुणीही उत्तर देईल की, अर्थात ‘भाग्यनगर’ चांगलेच. पण, यावर रेणुका चौधरींनी अकलेचे तारे तोडले. “मी स्वत: हैद्राबादी आहे आणि आम्हाला स्वत:ला ‘हैद्राबादी’ म्हणून घेण्यात गर्व वाटतो. राजा सिंग कोण आहे? त्यांनी हैद्राबादच्या नामांतरणाचा प्रयत्न केल्यास त्यांच्या अडचणी वाढतील.” रेणुका असं म्हणाल्या, त्याचं कारण स्पष्ट आहे. त्या वरील ‘फुल्या फुल्या’ विशेषण असलेल्यांचे प्रतिनिधीत्व करतात. तसेच त्या नुसत्या विकट हसतच नाहीत, तर विकट विचारही करतात. हैद्राबादमध्ये अजूनही आपल्याला नजामाचे हस्तक, वंशज समजणार्‍यांचा मोठा गट आहे. या गटाचे लांगूलचालन करण्यासाठी रेणुकांचा हैद्राबाद शहराच्या नामांतराला विरोध. पण, हैद्राबादचे ‘भाग्य’ बदलो आणि ते ‘भाग्यनगरी’ म्हणून नावारुपास येवो, हीच मनोकामना. बाकी ‘फुल्या फुल्या’ विशेषणांच्या रेणुका चौधरी काहीही बोलोत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/