पाच दशकांच्या कलाप्रवासाचा अंत...

    दिनांक  09-Nov-2018   
 
 

पाच दशकं रंगमंचावर वावरणाऱ्या कलाप्रवासाला काल पूर्णविराम मिळाला. कारण, लालन सारंग या रंगभूमीवरच्या बंडखोर अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्याविषयी...

 


विश्वात कलेच्या रडावे, हसावे,

मोकळ्या श्वासास बंधन नसावे,

जगुनी कलेत, कलेतच मरावे,

अजरामर होऊनी कीर्तीपरी उरावे...

 

भारतीय कलाक्षेत्राला अनेक दिग्गज कलाकार आजवर लाभले. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर रंगभूमीवर स्वतंत्र ठसा उमटवला. अशाच कलेशी निष्ठा राखणाऱ्या एक व्यक्तिमत्त्वाचा काल अंत झाला. लालन सारंग यांचे शुक्रवारी वयाच्या ७९व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर, १९४१ रोजी गोव्यात झाला. मध्यम वर्गात वाढलेल्या लालन सारंग यांना खरं तर अभिनयाची मुळीच आवड नव्हती. शिक्षण, नोकरी, लग्न आणि संसार यातच रमण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण, म्हणतात ना नशिबात काय लिहून ठेवलंय हे कोणालाच माहीत नसतं. तसंच काहीसं त्यांच्या बाबतीतही झालं. अचानक त्या रंगभूमीकडे ओढल्या गेल्या आणि रंगभूमीनेही त्यांना आपलंस केलं. एक भाऊ, सहा बहिणी आणि आई-वडील अशा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या लालन सारंग यांच्या घरातील कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हते. गिरगावातील ‘राममोहन’ शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. यानंतर त्यांनी खासगी कंपनीत काम करता करता सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात त्यांनी काही काळ मुंबई कामगार आयुक्त कार्यालयातही नोकरी केली. यानंतर त्यांनी एका महाविद्यालयीन नाटकात भूमिका साकारली. याचवेळी त्यांचा कमलाकर सारंग यांच्याशी परिचय झाला आणि पुढे हाच परिचय प्रेमविवाहातही बदलला.

 

लालन सारंग यांच्या एकंदरीत प्रवासातसखाराम बाईंडर’ या नाटकाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. या नाटकात त्यांनी साकारलेली ‘चंपा’ ही व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने आव्हानात्मक होती. गावंढळ, बिनधास्त असलेल्या चंपाची व्यक्तिरेखा त्यांनी यशस्वीपणे साकारली. खरं तर ही व्यक्तिरेखा त्यांना मिळण्यामागची कहाणीही तशी वेगळीच. नाटकातील ‘चंपा’ या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्रीसाठी शोध सुरू असताना त्यांच्या परिचयाच्या एका व्यक्तीने त्यांचे नाव नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर आणि लालन सारंग यांच्या पतींना सुचवले होते. परंतु, या भूमिकेत त्या शोभणारच नाहीत, अशी दोघांचीही पहिली प्रतिक्रिया होती. पण, अखेरीस ही भूमिका साकारण्यासाठी सारंग यांच्याच नावाची निवड झाली आणि ‘चंपा’ भरपूर गाजली. अशातच काही नाटकांमुळे लालन सारंग यांची एक बंडखोर अभिनेत्री अशी ओळख नाट्यसृष्टीत निर्माण झाली. ‘मी मंत्री झालो,’ ‘बुवा तेथे बाया,’ ‘मोरूची मावशी,’ उद्याचा संसार’ आदी नाटकांमध्ये सारंग यांनी साकारलेल्या भूमिकाही संस्मरणीय अशाच. पण, पुढे त्यांच्या ‘सखाराम बाईंडर’ने तर इतिहासच घडवला. त्यानंतर ‘रथचक्र,’ ‘कमला,’ ‘गिधाडे,’ ‘जंगली कबुतर,’ ‘खोल खोल पाणी,’ ‘घरटे आपुले छान,’ ‘बेबी,’ ‘सूर्यास्त,’ ‘कालचक्र’ अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. ‘सामना,’ ‘हा खेळ सावल्यांचा’ या त्यांच्या चित्रपटांनीही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तसेच त्यांनी ‘रथचक्र’ ही हिंदी मालिकाही केली. परंतु, रंगभूमीकडे ओढ असलेल्या लालन सारंग यांनी चित्रपट आणि मालिका करत असतानाही नाट्यक्षेत्राची साथ काही सोडली नाही. कालांतराने त्या मुंबईकडून पुण्याकडे वळल्या आणि स्थायिक झाल्या. त्यानंतरही त्यांनी दोन नाटकं केली.

 

अभिनयापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास लेखिका, एकपात्री कार्यक्रम सादरकर्त्या ते हॉटेल व्यावसायिक, उद्योजिका असा झाला. लालन यांना स्वयंपाकाबरोबरच दुसर्‍यांना चांगले खाऊ-पिऊ घालण्याचीही पहिल्यापासूनच आवड. त्यांची हिच आवड त्यांना हॉटेल व्यावसायिक बनण्यापर्यंत घेऊन गेली. त्यांच्या मुलाने त्यांना हॉटेल सुरू करण्याची कल्पना सुचवली आणि सारंग यांनी पुण्यात हॉटेल सुरू करून ती कल्पना प्रत्यक्षात आकारास आणली. सुरुवातीला हॉटेल व्यवसायात त्या स्वत: लक्ष घालत होत्या. परंतु, वयपरत्वे त्यांनी त्यांची जबाबदारी कमी केली. ‘नाटकांमागील नाट्य,’ ‘मी आणि माझ्या भूमिका,’ ‘जगले जशी,’ ‘बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती’ आदी पुस्तकेही लालन यांनी लिहिली. तसेच ‘मी आणि माझ्या भूमिका’ हा एकपात्री कार्यक्रमही त्यांनी सादर केला. ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकर स्मृती ‘गृहिणी सखी सचिव,’ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेच्या ‘जीवनगौरव’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. २००६ मध्ये कणकवली येथे झालेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना देण्यात आला होता. अखेर पाच दशकं रंगभूमीवर चमकणारा तारा शांत झाला. त्यांच्या एकूण रंगभूमीवरील योगदानाला मानाचा मुजरा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/