विंचू नाही, नंदी

    दिनांक  07-Nov-2018   
 
 

शंकराच्या पिंडीवरील विंचू मोदी...” या वक्तव्यात थरुर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढले आहे. संघाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, असे त्यांनी सूचित केले. संघ आणि भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा आणि भांडणे लावण्याचा हा उपद्व्याप आहे. शशी थरुर अशा प्रकारचे राजकारण करणारे नेते कालपर्यंत नव्हते, आज ते झाले आहेत. परंतु संघ आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध बिघडण्याचे कोणतेही कारण नाही.

 

मोदी म्हणजे शंकराच्या पिंडीवरचे विंचू असून त्यांना तुम्ही हाताने काढू शकत नाही आणि चपलेने मारू शकत नाही,” असे म्हणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका खास सूत्राच्या हवाल्याने शशी थरुर यांनी हे म्हटले. थरुर यांच्या वक्तव्याची ही बातमी सर्वच वर्तमानपत्रांतून आली. यापूर्वी ते एकदा म्हणाले होते की, ”भाजप पुन्हा निवडून आल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल.” थरुर यांचे हे वक्तव्य वाचल्यानंतर मला एका संस्कृत सुभाषिताची आठवण झाली. सुभाषित असे आहे.

 

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभारोहणम्।

येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥

 

श्लोकाचा अर्थ असा आहे - ‘नित्य प्रसिद्धी मिळविण्यासाठी पाहिजे, तर मडकी फोडत राहा, तेवढ्याने प्रसिद्धी नाही झाल्यास गाढवावर बसून फेरफटका मारा आणि त्यानेही काम भागल्यास अंगावरील वस्त्रे फाडा.’ शशी थरुर हेच काम करीत आहेत.

खरे म्हटले, तर शशी थरुर यांनी मडकी फोडणे, गाढवावर बसून फेरफटका मारणे, वस्त्रे फाडण्याचे काम करू नये. सध्या भारतात अध्ययन करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या, ग्रंथलेखन करणाऱ्या राजकारण्यांचे दुर्भिक्ष्य आहे. शशी थरुर त्याला अपवाद आहेत. राजकारणात उतरण्यापूर्वी त्यांचे युनोमधील करिअर अभिमान वाटावा, असे आहे. त्यांच्या नावावर व्हाय आय एम हिंदू, ॅन इरा ऑफ डार्कनेस, नेहरु, इंडिया शास्त्र इत्यादी महत्त्वाची पुस्तके आहेत आणि ती गंभीरपणे वाचावी अशी आहेत. गचाळ आणि फालतू लेखन करणारे आपल्याकडे विचारवंत म्हणून मिरवितात. शशी थरुर त्या पंगतीत बसणारे आहेत. त्यांनी आपली शान राखणे फार आवश्यक आहे. परंतु, ‘राजनिती की मजबूरी हैविरोधी पक्षात बसल्यानंतर सत्ताधारी पक्षाविषयी फारसे चांगले बोलायचे नसते. टीका करण्यासाठी सतत विषय शोधत बसावे लागते. खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करावे लागते, भन्नाट आरोप करावे लागतात. आरोप करताना काळजी घ्यावी लागते की, ते मोघम असावेत, कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू नये आणि कोणी काही बोललेच तर सांगायचे की, हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ते मला घटनेने दिलेले आहे, तो माझा घटनादत्त अधिकार आहे. संसदीय राजकारण असेच चालते. सगळेच राजकीय पक्ष हेच धंदे करीत असतात. त्यामुळे कोणत्याही एका राजकीय पक्षाला लक्ष्य करून टीका करण्यात काही अर्थ नाही. सत्तेत राहून जर उद्धव ठाकरे आपल्याच सहकारी पक्षावर सतत टीका करू शकतात, तर सत्तेत नसलेले शशी थरुर यांना टीका करण्याचा तर त्याहून मोठा अधिकार आहे. असे असले तरी शशी थरुर यांच्या मोदी आणि भाजपविरोधामध्ये सातत्य नाही. कधी ते सनसनाटी टीका करतील, तर मध्येच त्यांची सद्सदविवेकबुद्धी जागी होऊन ते मोदींची स्तुतीही करतील. जून २०१४ला त्यांनी भाषण केले, “मोदी यांनी स्वतःची द्वेषाची प्रतिमा बदलून आधुनिकता आणि प्रगतीच्या अवताराची प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या मार्गाचा काँग्रेसने विचार केला पाहिजे. त्यांनी ज्याप्रमाणे स्वतःचीप्रतिमा बदलली त्याप्रमाणे पक्षाची हिंदू अहंकारवादी पक्षाकडून राज्यकारभार करणारा नैसर्गिक पक्ष अशी प्रतिमा बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे भाषा आणि प्रतिपादनात बदल होत जाणार आहेत,” अशा प्रकारे मोदींची स्तुती करण्याची हिम्मत काँग्रेसमध्ये कोणातही नाही. राहुल गांधी मोदींविषयी चार चांगले शब्द बोलले, असे आपण कधी ऐकले आहे काय? शशी थरुर येथेच थांबले नाहीत, तर जुलै २०१५ साली ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील ज्या ज्या देशात गेले आहेत, त्या त्या ठिकाणी त्यांनी भारताची सकारात्मक प्रतिमा उभी केली आहे आणि हे योग्य प्रकारचे काम झाले आहे.” नरेंद्र मोदी यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्ताने थरुर यांनी मोदी यांना संदेश पाठविला, ’‘नरेंद्र मोदीजी हॅप्पी बर्थ डे. भारताची सेवा करण्याची शक्ती आणि बांधिलकी तुम्हाला प्राप्त होवो, आम्ही तुमच्या राजकारणाशी असहमत जरूर असू पण, ही असहमती आदरयुक्त असेल.” मोदींनी त्याला तात्काळ उत्तर पाठविले की, ”डॉ. थरुर मी आभारी आहे. सकारात्मक टीकेशिवाय आपल्या लोकशाहीला काही अर्थ नाही. वाद-चर्चा आपल्याला सशक्त बनवितात.” शशी थरुर यांनी मोदींच्या तात्काळ उत्तराचे कौतुक केले.

 

सत्ताधारी पक्षाविषयी आणि तेही त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याविषयी अशा प्रकारे स्तुतीपर बोलणे त्या व्यक्तीला अडचणीत आणणारे ठरते. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी शशी थरुर यांना धमकावले की, तुमच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्यातून वाचण्यासाठी थरुर यांनी, “मोदी पिंडीवरील विंचू आहेत...” असे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीला आता चार महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत शशी थरुर मोदी यांची स्तुती करण्याचे धाडस करतील, असे वाटत नाही. आपल्या पक्षातील नेत्यांना बरे वाटावे म्हणून त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले की, ”नरेंद्र मोदी यांना पूर्वांचलातील नागा लोकांचे विचित्र शिरस्त्राण घालण्यात (डोक्यावरची विशिष्ट प्रादेशिक टोपी) काही वाटत नाही. परंतु, मुसलमानांनी दिलेली गोल टोपी मात्र ते डोक्यावर घालीत नाहीत.” नेहमीप्रमाणे शशी थरुर यांच्या या वक्तव्यावरदेखील खूप टीका झाली. नागा लोकांचे डोक्यावरील आवरण विचित्र आहे, असे शशी थरुर म्हणाले. त्याबद्दल त्या लोकांनी थरुर यांचा जबरदस्त निषेध केला आहेथरुर यांच्या मोदी टीकेचा समाचार भाजपतील ज्येष्ठ मंडळी आपापल्या परिने घेतात. एकाने म्हटले की, ”मोदींना पिंडीवरील विंचू म्हणून थरुर यांनी शंकराचा अपमान केला आहे. राहुल गांधी स्वतःलाशिवभक्त म्हणतात, त्यांना हे चालेल का?” कोणताही विषय कुठेही जोडण्याचे राजकारण्यांचे कसब असते, त्यातला हा एक प्रकार आहे. दुसरा नेता आणखी पुढे गेला आणि तो म्हणाला, ’‘असे जर वक्तव्य पाकिस्तानी पंतप्रधानाविरुद्ध केले असते, तर त्यांचे तोंड बंद झाले असते.” पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा आणि शंकराच्या पिंडीचा काही संबंध नाही, हेसुद्धा भाजपच्या नेत्यांनी विचारात घेतले नाही.

 
 

शंकराच्या पिंडीवरील विंचू मोदी...” या वक्तव्यात थरुर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढले आहे. संघाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, असे त्यांनी सूचित केले. संघ आणि भाजप यांच्यामध्ये दरी आणि भांडणे लावण्याचा हा उपद्य्वाप आहे. शशी थरुर अशा प्रकारचे राजकारण करणारे नेते कालपर्यंत नव्हते, आज ते झाले आहेत. संघ आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध बिघडण्याचे कोणतेही कारण नाही. नरेंद्र मोदी संघस्वयंसेवक आहेत. भाजपत जाण्यापूर्वी ते संघ प्रचारक होते. भाजपत त्यांची पाठवणी तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी केलेली आहे. जेव्हा सरसंघचालक एखादे दायित्त्व देऊन कार्यकर्त्यांला काम सांगतात तेव्हा तो कार्यकर्ता सरसंघचालकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, हे जन्मभर बघतो आणि आपली सर्व शक्ती पणाला लावून दिलेले काम करतो. मोदी त्याचा आदर्श आहेत. ते ज्या क्षेत्रात आहेत, ते राजकीय क्षेत्र अत्यंत विवादास्पद क्षेत्र आहे. तेथे धोरणे ठरवावी लागतात, निर्णय घ्यावे लागतात आणि हे काम२४ बाय करावे लागते. सर्व निर्णय सर्वांना मान्य होतील असे नसतात, धोरणे सर्वांना मान्य होतील असेही नसते. परंतु त्यावरुन त्या कार्यकर्त्याची समीक्षा संघात केली जात नाही. त्या त्या क्षेत्राच्या ज्या मर्यादा आहेत, त्या लक्षात घ्याव्या लागतात.

 
 

कार्यकर्त्याची समीक्षा करण्याचे चार मापदंड आहेत. ) तो विचारावर पक्का आहे की विचारवरून दूर चालला आहे. ) तो राष्ट्रहितार्थ काम करतो की स्वहितार्थ काम करतो. ) तो सर्वांना बरोबर घेऊन काम करतो की स्वतःचे व्यक्तिमहात्म्य वाढविण्याचे काम करतो. ) त्याचे राष्ट्रीय चारित्र्य शुद्ध आहे की भ्रष्ट आहे. या चार कसोट्यांवर मोदींना सकारात्मक गुण द्यावे लागतात. एकाही बाबतीत ते नकारात्मक नाहीत. त्यामुळे संघ स्वयंसेवकाच्या दृष्टीने ते पिंडीवरील विंचू नसून पिंडीसमोरील नंदी आहेत. शंकराचे आज्ञाधारक सेवक म्हणजे संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. त्यांच्याविषयी अनाम संघ अधिकाऱ्याने व्यक्त केलेले मत (शशी थरुर यांचे म्हणणे खरे मानल्यास) ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. संघ म्हणजे सामूहिक मानस. या सामूहिक मानसाचा त्या मताशी काहीही संबंध नाही. त्यांना मोदी हवे आहेत आणि ते पुन्हा निवडून यावेत, हीच त्यांची इच्छा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/