पोपटांचा विचार व्हावा!

    दिनांक  07-Nov-2018   


काही लोकांना नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती वाटते. या सहानुभूतीसाठी ते कारण देतात की, ‘नक्षलीही माणसेच आहेत.’ यावर मग प्रश्न निर्माण होतो, हिंसेमध्ये मरणारी माणसं नाहीत का? गेल्या आठवड्यात छत्तीसगढमधील दंतेवाडामध्ये दूरदर्शन डीडी वाहिनीची टीम या क्षेत्रामधील वार्तांकन, दृष्यांकन करण्यास गेली होती. त्यावेळी या टीमवर नक्षल्यांनी हल्ला केला. त्यात दूरदर्शन डीडी वाहिनीचे कॅमेरामन अच्युतानंद साही यांचा मृत्यू झाला, तर दोन जवान हुतात्मा झाले. त्याचबरोबर दोन जवान गंभीर जखमीही झाले. पण नेहमीप्रमाणे या पत्रकारासाठी किंवा मृत जवानांसाठी कोणीही मानवाधिकारचे कार्यकर्ते, निधर्मी की अधर्मी विचारवंत कोणीही पुढे आले नाही. माओवाद्यांच्या असहिष्णूतेचे ढोल बडवत ‘पुरस्कारवापसी गँग’चे कोणीही पुढे आले नाही. नक्षल्यांवर कारवाई केल्यानंतर नेहमीच मानवधिकाराचे उल्लंघन, मानवधिकार मानवधिकार असे उर बडवणारे ढोंगी मानवतावादी मात्र नक्षलांनी केलेल्या तिघांच्या हत्येबाबत मात्र मूग गिळून गप्प आहेत. यापूर्वीही नक्षली नावाच्या नराधमांनी हल्ले करून निष्पापांची हत्या केल्या आहेतच. काही दिवसांपूर्वीच नक्षलींनी छत्तीसगढ येथील बिजापूर येथे चार जवानांवर हल्ला केला होता. त्यात हे चार जवान हुतात्मा झाले होते. पोलिसांवर, प्रसारमाध्यमांवर हल्ला का केला जातो? कारण, देशभरात कायदा सुव्यवस्था मजबूत होत आहे. नक्षल्यांचे घृणास्पद साम्राज्य खिळखिळे होत आहे. लोकांवरची दहशत कमी होत आहे, अशा परिस्थितीत लोकांना बळ देणार्‍या व्यवस्थांवर हल्ले केले, तर लोकांचा आत्मविश्वास तुटेल. लोक घाबरून नक्षलींच्या दहशतवादापुढे मान तुकवतील. हे सगळे पाहून वाटते नक्षल्यांचा राक्षसी आत्मविश्वास कसा तुटेल? लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की, राक्षसाचा जीव पोपटात होता. आता वाटते की, या नक्षल्यांचा जीव, ताकद जंगलाबाहेर राहून नक्षल्यांसाठी मदत तयार करणार्‍या तथाकथित विचारवंत पोपटांमध्ये आहे. जे कधी कायदा सुव्यवस्था तर कधी मानवाधिकार, तर कधी नक्षल्यांना हक्कासाठी लढणारे आहेत, असे म्हणत नक्षल्यांना समर्थन करतात. नक्षली राक्षसाला जेरबंद करण्यासाठी कायदा, समाजसेवा, मानवाधिकार यांची पोपटपंची करणार्‍यांवर पोपटांचाही विचार केला जावा. तसा तो होत आहे, याबद्दल सरकारचे अभिनंदन. तरीही आता आणखी काही पोपटांचा विचार व्हावा...

 
 

माओवाद्यांना मिळाला प्रसाद

 

दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाची मात, अन्यायावर न्यायाची गाज असे म्हटले जाते. दिवाळीला नरकासुराचा खात्मा झाला होता. आता ‘खात्मा’ शब्द दिवाळीला शोभत नसेल पण, नरकासुरासारखाच या दिवाळीला माओवाद्यांचा खात्मा झाला आहे. तब्बल ६२ माओवाद्यांनी हत्यारांसकट छत्तीसगढमध्ये शरणागती पत्करली आहे. माओवादी की नक्षली? खरे तर हा प्रश्न सध्या एक वैचारिक खेळी आहे. नक्षली आणि माओवादी वेगळे नाहीतच मुळी. हे दोघेही एकच. ते माओवादीच आहेत. याच आठवड्यात ओडिशामधील मल्कानगिरी जिल्ह्यातील पापलूर भागातील जंगलात चकमक झाली. विशेष तपास पथक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीमध्ये पाच माओवादी ठार झाले. यामध्ये एक महिलाही होती. मोहिमेनंतर सुरक्षा रक्षकांनी दोन इन्सास रायफल्स, एक एसएलआर, एक ३०३ रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. थोडा विचार केला तर जाणवते की, माओवाद्यांनी त्यांच्या देशविघातक कारवायांचा पोत बदललेला आहे. मात्र, त्याची फळे कायदा-सुव्यवस्था आणि देशासाठी घातकच होती. कुठे शोषित, वंचितांचा पुळका आणत त्यांना देशाविरुद्ध भडकवण्याचे कारस्थान कर, कुठे संविधानाच्या कलमांचा चुकीचा आणि घातक अर्थ लावत पत्थलगढीच्या नावाने देशद्रोह कर, कुठे लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत भीमा-कोरेगावसारख्या घटना घडव, एक ना अनेक कारस्थान सुरूच होती. या सर्व कारस्थांनामध्ये या लबाड लोकांनी समाजातील काही गटांना ढालीसारखे पुढे केले. एका दगडात अनेक पक्षी मारले. समजा, ही कारस्थाने यशस्वी झाली, तर नक्षलींचे समाजदेश अस्थिर करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार. समजा, या कारस्थानांबाबत सरकारने कारवाई केली, तर ही कारवाई होणार नक्षल्यांनी ढालीसारख्या पुढे केलेल्या समजागटांवर. समाजगटांवर कारवाई झाली की, माओवाद्यांचे बोलवते धनी अर्थात ‘विचारवंत पोपट’ इथे शहरात समाजावर कारवाई केली, अशी आवई उठवत रडारड करायला तयार. मोठे षडयंत्र. हे सगळे षडयंत्र उलथून पाडत, समाजालासोबत घेऊन भारत सरकार आणि प्रशासन कायदा सुव्यवस्थेंतर्गत या माओवाद्यांची घृणास्पद खेळी उलथून टाकीत आहेत. माओवादाच्या नावाने देशाला आवाहन देणार्‍यांना या दिवाळीमध्ये चांगलाच प्रसाद मिळाला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/