दुसऱ्यांचे माणूसपण जपताना...

    दिनांक  05-Nov-2018   पुण्यात साहित्यिक, उद्योगपती, समाजसेवक यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी राजेंद्र सगर यांनी उल्लेखनीय काम केले आहे. गुणिजनांना एकत्र करण्यात राजेंद्र यांचे कसब आहे. त्यांच्याविषयी...


अलीकडच्या काळात समस्या संपण्याचे नावचं घेत नाही आहेत. दिवसेंदिवस अनेक प्रश्न, समस्यांचे जाळे विस्तारत चालले आहे. दिवस-भाषा, प्रांत आणि जातीच्या सीमा लंघून देशभरातील पाच हजार कविमित्रांना जोडणे ही काही सोपी गोष्ट नाही. कारण, कवितेची भाषा जरी भाषेच्या पलीकडील आणि मनातील गुज ओळखणारी असली तरी, ती कविता लिहिणाऱ्या कवीचे भाव ओळखून त्याच्याशी मनापासून दोस्ती जडवून घेणे हे तसे कठीणच. पण, हे कठीण काम मनापासून अगदी तन-मन-धन अर्पून करणारी एक आगळीवेगळी व्यक्ती म्हणजे राजेंद्र सगर. राजेंद्र सगर हे संवेदनशील कविमनाचे व्यक्तिमत्त्व. पण, चौकटीपलीकडे जाऊन विचार करणे आणि त्यावर कार्यवाही करणे ही त्यांची खासियत. त्यांच्या ‘काव्यमित्र’ संस्थेतर्फे त्यांनी आजतागायत ६८ काव्यपुस्तकांचे प्रकाशन केले आहे. या काव्यसंग्रहांचे कवी कोण? तर जे समाजाच्या अत्यंज स्तरावर आहेत, ज्यांचा आवाज दबलेला आहे, ज्यांना काळ्यावर पांढरे होणे हीच मोठी अप्रुपता आहे. अशा कवींच्या कविता राजेंद्र सगरांनी पुस्तकरूपात छापून आणल्या. ‘उदंड झाले कवी आणि अमाप झाले कवितेचे पीकया पार्श्वभूमीवर राजेंद्रंना या कवींच्या कविता पुस्तकरूपात छापाव्याशा का वाटल्या? त्याही स्वत:ची पदरमोड करून. काही वेळेस समाजातील आर्थिकबाबतीत उदार मंडळींना सोबत घेऊनही या पुस्तकांची छपाई केली आहे. का? यावर राजेंद्र यांचे उत्तर त्यांचे मन उलगडून दाखवते. ते म्हणतात की, “कवी म्हणून प्रस्थापित होणे, सगळ्यांच्या नशिबी नसते. पण, प्रत्येक कवीला वाटत असते की, त्याच्या कविता छापून याव्यात, पुस्तक व्हावे, त्यावर चर्चा व्हावी, लोकांनी कविता वाचावी. पण, आर्थिक तंगीमुळे सामान्य घरातील कवींना पुस्तक छापणे शक्य नसते. मान्यवर प्रकाशकमंडळी नवोदित होतकरू कवींच्या कविता सहसा छापतच नाहीत. या सगळ्या उमेदीच्या नवोदित होतकरू तरुणांचा हिरमोड होऊ नये, त्यांनाही हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून मी त्यातील त्यात दर्जेदार कविता लिहिणाऱ्या कवींची पुस्तक छापतो.” त्यांनी आजवर मोजून शेकडो कार्यक्रम यासाठी केले आहेत. पुणे शहरातील समाजसेवक, साहित्यिक सर्वच वैचारिक चळवळीचे कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे सुमधूर नाते.

 

राजेंद्र यांचा प्रवास कसा असेल? तर राजेंद्र मूळचे उस्मानाबादच्या व्हंताळ गावचे. श्रीमंत आणि विमला सगर या दाम्पत्याला आठ मुले. चार मुली आणि चार मुलगे. त्यापैकी एक राजेंद्र. मराठवाड्यामध्ये गवंडी नावाचा एक समाजच आहे. राजेंद्र त्या गवंडी समाजाचे. राजेंद्र यांचे वडील श्रीमंत हे गवंडी काम करीत. अर्थातच, त्यामुळे घरात दारिद्—याचे राज्य. हे गावही गावाचा बाज राखून... म्हणजे गावात नव्वदीच्या दशकातही चौथीपर्यंतची एकमेव सरकारी शाळा होती. पाचवीला शिक्षणासाठी त्यांना सात किलोमीटर लांबच्या गावी दररोज चालत जावे लागे. मात्र, कच्च्या रस्त्यावरून न जाता गावच्या शेतवाटेतून गेले की, हे अंतर कमी होऊन पाच किलोमीटर होई. तरी ते कष्ट करत शिकत होते. घरची ओढाताण, आईवडिलांचे पै-पैंसाठीचे कष्ट त्यांना पाहावत नव्हते. त्यांनी पुण्याला जायचे ठरवले, पण, पुण्याला जायला पैसे कुठे होते? त्यामुळे सलग दोन महिने राजेंद्र यांनी मोलमजुरीची, कष्टाची कामे केली. १२०० रुपये जमले. ९०० रुपये घरी देऊन ३०० रुपये घेऊन ते पुण्याला निघाले. पुण्याला गावच्या मित्राकडे आले. तिथे त्याच्यासोबत आणखीन दहाजण असेच. त्यांनी त्यांना सांगितले, “जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत तू इथे राहा, खा पण, त्यासाठी तुला दहाजणांसाठी बनत असलेल्या पोळ्यांचे पीठ मळून देणे, फरशी झाडलोट, धुणे आणि सकाळ-संध्याकाळ सगळ्यांची भांडी घासावी लागतील.” त्यांनी दोन महिने हे काम केले. पुढे पुण्याच्या एका रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करू लागले.

 

पुण्याच्या वातावरणात जवळचे कुणीच नव्हते. आईवडिलांचे दु:ख डोळ्यांसमोरून जात नव्हते. त्यांनी ठरवले एकहाती एक लाख रुपये जमवून ते आईवडिलांच्या हातात देऊ तेव्हाच त्यांना तोंड दाखवू. राजेंद्र १६-१६ तास काम करू लागले. दोन वर्षांत एक लाख रुपये जमले. आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरच्या विटा-माती बांधणाऱ्या आईबाबांच्या हाती त्यांनी एक लाख रुपये टेकवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे त्यांनी पुण्यातच पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. हे सगळे करत असताना त्यांचे कार्यक्षेत्रही रूंदावत होते. वॉर्डबॉयची नोकरी सोडून ते पुण्यातील एका नामांकित शाळेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत झाले. या सगळ्या घडामोडीत त्यांनी आपल्यातील कवी मरू दिला नाही. आपल्याला संधी मिळाली नाही, मात्र आपण होतकरू कवींना संधी द्यायलाच हवी, यासाठी त्यांनी काम सुरू केले. सध्या भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवर दुभंगलेल्या समाजाला एकत्र करता येण्यासाठी होतकरू कवींच्या साहाय्याने काहीतरी ठोस कार्य करावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांचे माणूसपण एक वेगळ्याच पातळीवरचे आहे. शोषित-वंचित आयुष्य जगताना भाराभर कष्ट उपसतानाही त्यांचे माणूसपण दुसऱ्यांचे माणूसपण जपत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/