'८ ते १०' शिवाय फटाके उडवल्यास होऊ शकते 'ही' शिक्षा

04 Nov 2018 17:58:56



नाशिक: दिवाळीत फटाके उडविण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० असे दोनच तास परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त इतर वेळेस फटाके उडवल्यास ८ दिवस कारावास होऊ शकते. शिवाय १२५० रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो, अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली. नाशिक शहरातील पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी २ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरसाठी काही अधिसूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार फटाक्यांच्या आवाजावर १२५ डेसिबलपर्यंतच मर्यादा ठेवण्यात आली आहे.

 

पोलिसांनी फटाके विक्रेत्यांनाही काही नियम आखून दिले आहेत. प्रत्येक फटाक्यांच्या दुकानात १०० किलो ते ५०० किलोपेक्षा जास्तीचा साठा नसावा. दुकानात मेणबत्ती किंवा तेलाचा दिवा लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत. फटाके हाताळण्यासाठी दुकानांमध्ये पुरेशी जागा असावी. अतिआवाज होतील अशा फटाक्यांची विक्री करू नये. यामध्ये अॅटमबॉम्ब, बटरफ्लाय अशा प्रकारच्या फटाक्यांचा समावेश होतो. चिनी किंवा परदेशी फटाके वापरू नये किंवा विकू नये. शांतता प्रभाग क्षेत्रात फटाक्यांचा वापर टाळावा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0