धनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

30 Nov 2018 12:43:22



विरोधी पक्ष नेत्यांची सभागृहात मागणी


मुंबई : धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी यावरून आक्रमक भूमिका घेत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. यावरून विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

 

धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे विखे पाटील यावेळी म्हणाले. तसेच पुढच्या अधिवेशनसाठी न थांबता विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. तसेच सदर प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी यावेळी केली. तसेच मुस्लिमांना ओबीसी ऐवजी एसईबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

 

विधान परिषदेतही गदारोळ

 

मुस्लिम, धनगर आरक्षणावरुन विधानपरिषदेतही विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सुरुवातीला काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

मुस्लिम आरक्षण देण्यास तयार - तावडे

 

घटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येणे शक्य नाही. परंतु मुस्लिम समाजात जो मागासवर्ग आहे त्याला आरक्षण देण्यास सरकार तयार असल्याचे उत्तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात दिले. मुस्लीम धर्मात कुरेशी आणि अन्य समाज येतात. यातील मागास समाजाला आरक्षण देण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0