
अर्जेंटिना : "योगासन ही भारताने जगाला दिलेली एक खास भेट आहे. यामुळे अर्जेंटिना आणि भारतामध्ये मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले आहे. तसेच योग आपल्याला चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य देते. आपला मेंदू आणि शरीर शांत ठेवण्याची ताकद या योगामध्ये आहे." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अर्जेंटिनामधील ब्यूनस आर्यस येथे ‘शांततेसाठी योग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस ते बोलत होते. "या कार्यक्रमाला ‘शांततेसाठी योग’ (पीस फॉर योग) हे अत्यंत योग्य नाव दिले असून यापेक्षा दुसरे कुठलेच नाव योग्य ठरले नसते." असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
योगासनाबद्दल त्यांनी सांगितले की, "जेव्हा व्यक्तिचा मेंदू शांत असेल तेव्हा कुटुंब, समाज, देश आणि जगातही शांतता कायम राहते. आरोग्य, कल्याण आणि शांततेसाठी जगाला भारताने दिलेली ही एक खास भेट आहे." पुढे ते म्हणाले की "जी-२० शिखर परिषदेत जागतिक मुद्दे, निरंतर विकास, जलवायू परिवर्तन, फरार आर्थिक घोटाळ्यातील आरोपींसारख्या मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. हे फक्त भारत किंवा अर्जेंटिनाच्या फायद्याचे नाही तर यात जगाचे हित आहे." यावेळी पंतप्रधानांची सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली. तत्पूर्वी त्यांनी ओडिशा येथे आयोजित हॉकी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानिमित्त अर्जेंटिना संघाचे अभिनंदन केले आणि भारतीय हॉकी संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/