पर्यावरण जागृतीसाठी वाराणसी येथे पर्यावरण कुंभ

29 Nov 2018 20:59:46



 
 
 
मुंबई : पुढील वर्षी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर येत्या दि. १ व २ डिसेंबर रोजी वाराणसी येथे दोन दिवसीय पर्यावरण कुंभ आयोजित करण्यात आला आहे. युवा पिढीला पर्यावरणाप्रती जागृत करण्यासाठी महात्मा गांधी काशी विश्वविद्यापीठाच्या माध्यमातून या कुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि संपूर्णानंद संस्कृत विद्यालय या संस्था सहआयोजक असतील. जगभरातून १७६ देशांचे साडेतीन हजार प्रतिनिधी या पर्यावरण कुंभाला उपस्थित राहणार आहेत.
 

पर्यावरण कुंभाला नॅशनल म्युझियम फॉर नॅच्युराल हिस्ट्रीच्या संचालक नाज रिझवी, शास्त्रज्ञ शक्तीकुमार आणि सी.आर. मंगेश उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्राला उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांची विशेष उपस्थिती असणार आहे. महात्मा गांधी काशी विद्यापीठातील तयारी पूर्णत्वास आली असून तीन मोठे मंडप उपस्थितांसाठी बांधले गेले आहेत. तसेच दोन मोठे मंडप प्रदर्शनासाठी बांधण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त एक प्लेटोनियम डोम उपस्थितांचे आकर्षण ठरणार आहे, ज्यात पर्यावरणाशी संबंधित चित्रफिती दाखवण्यात येणार आहेत. पर्यावरण कुंभासाठी पर्यावरणवादी तसेच पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या सद्यस्थितीवर यावेळी चर्चा केली जाणार असून प्लास्टिकमुक्ती, कागदाचा कमी वापर, पाण्याची स्वच्छता, जैविक खतांचा वापर असे विविध संकल्प केले जाणार आहेत.

 

दरम्यान, प्रयागराज येथील महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण कुंभ(वाराणसी), मातृ कुंभ(वृंदावन), युवा कुंभ(लखनौ), सामाजिक समरसता कुंभ(अयोध्या) आणि संस्कृती कुंभ(मुंबई) अशा पाच कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. पैकी संस्कृती कुंभ ऑक्टोबर महिन्यात मुंबईत पार पडला. मातृ कुंभ, सामाजिक समरसता कुंभ आणि युवा कुंभ अनुक्रमे ९, १५-१६ आणि २३ डिसेंबरला होणार आहेत. महाकुंभाच्या वेळी नेत्र कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0