नरेंद्र मोदींची जहागिरी

    दिनांक  29-Nov-2018    
 
 
तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे म्हणणे आहे की, तेलंगणमध्ये मुस्लीम आणि आदिवासी अत्यंत मागास आहेत. त्यांच्या आरक्षणाचा कोटा वाढवायला हवा. त्यासाठी म्हणे त्यांनी पंतप्रधान मोदींना तीस पत्रे लिहिली. त्याचे उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही. त्यानंतर यासंबंधीचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटले, तर मोदींनी म्हणे चंद्रशेखर राव यांना उत्तर दिले की, “मी आरक्षणाचा कोटा वाढवणार नाही आणि कोणाला वाढवू देणारही नाही.” आता चंद्रशेखर रावांकडे या विधानाचा लिखित पुरावा आहे की नाही माहिती नाही. पण, यावर चंद्रशेखर राव मोदींना म्हणाले, “मोदीजी, भारत हा काही तुमच्या वडिलांची किंवा आजोबांची जहागीर नाही.” चंद्रशेखर राव यांच्या या विधानावरून खूप वादंग उठले. तसे पाहिले तर चंद्रशेखरना काहीही म्हणायचे असले तरी त्यांनी आपल्या विधानातून एक सत्य अधोरेखित केले आहे ते म्हणजे, मोदीजींना भारत देश हा वडील आणि आजोबा यांची जहागिरी वाटतो. हे मात्र योग्य आहे. मोदींना तसे वाटलेच पाहिजे. हा देश, देशासाठी सर्वस्व अर्पण करू पाहाणाऱ्यांचा आणि त्यांच्या पूर्वजांचाच असणार. मोदींची पार्श्वभूमी ही निखळ आणि निखळ देशाचे कल्याण इच्छिणाऱ्या सुपुत्राच्या कर्तृत्वाची आहे. त्यामुळे मोदीजींना हा देश आपला वाटणारच! मोदींच्या पूर्वजांनी किंवा मोदींनी स्वतःचे घर भरण्यासाठी किंवा सात पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी या देशाची लूट केली नाही. त्यामुळे मोदी या देशाचे सुपुत्रच आहेत. हा देश कुणाचा आहे? या देशाचे या ना त्या कारणाने तुकडे पाडणाऱ्या लोकांचा, या देशामध्ये विघातक प्रवृत्ती माजतील अशाप्रकारे विधान किंवा योजना कृती करणाऱ्यांचा की काहीच न करता जे या देशाच्या कल्याणासाठी राबतात त्यांना त्रास देणाऱ्यांचा? हा देश नक्की कुणाचा? हा देश त्यांचाच आहे, जो या देशाला आपल्या बापजाद्यांची वारसा संपत्ती मानून त्याचा आदर करतो. सच्च्या भारतीयाला सांगावे लागत नाही की, “बाबा रे तुझ्या बापजाद्यांनी, त्यांच्या वंशजांनी या देशाला अनेक संकटातून संक्रमित होताना पाहिले आहे. हा देश तुझा आहे, तुझ्या बापजाद्यांचा आहे. हा देश तुझ्या पूर्वजांच्या स्वाभिमानाची, सांस्कृतिक वारशाची मोठी जहागिरी आहे. असो, तर देशाची ही जहागिरी पंतप्रधान मोदीही मानतात, यात शंकाच नाही. मात्र, मोदींची ही जहागिरी समजायला चंद्रशेखर रावांकडे तितकी श्रीमंती नाही.
 

तेलंगणातले खानदानी आरक्षण

 

चंद्रशेखर राव तेलंगणचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना शासन, प्रशासन, घटना याबाबत थोडे ज्ञान असलेच पाहिजे, असे गृहीत धरूया. गृहीत यासाठी की, या माजी मुख्यमंत्र्याला आरक्षण, आरक्षणाचा कोटा याबाबत निर्णय कुठे होतात? कोण घेते? आरक्षणाबाबत काही कायदे, काही घटनात्मक तरतुदी आहेत की नाही? याबाबतचे ज्ञान शून्य आहे असे वाटते. तसे नसते तर तेलंगणमधील मुस्लीम आणि आदिवासींच्या आरक्षणाचा कोटा पंतप्रधान मोदींना पत्र लिहून वाढवतो, असे त्यांना वाटले नसते. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणमधील आदिवासी आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा कोटा वाढावा म्हणून तीस पत्रे लिहिली. ही पत्रे लिहिण्याऐवजी त्यांनी आरक्षणाच्या घटनात्मक चौकटीचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. दुसरे असे की, तेलंगणमधील मुस्लीम आणि आदिवासी मागासलेले आहेत, असे चंद्रशेखर राव यांचे म्हणणे आहे. मागासलेपणाचा काळोख आरक्षणाने उजळतो का? आरक्षण हा मागासलेपणाला खोडून टाकण्यासाठीचा कागदोपत्री पुरावा आहे. पण, वास्तव जीवनात आरक्षणाचा प्रकाश मिळूनही जगण्याच्या वाटेवर काटेच असतात. ते काटे काढण्यासाठी कोणताही समाज वैचारिक- सामाजिकदृष्ट्या सक्षम असलाच पाहिजे. त्या तशा सक्षमपणाचा विचार चंद्रशेखर राव यांनी केला आहे का? आजकाल राजकारणात झटपट प्रसिद्धीची एक टूम निघाली आहे. कोणत्याही समाजाची अस्मिता चेतवायची. त्यांच्या मनात अक्षरशः भरवून द्यायचे की, तुम्हीच काय ते मागास, आरक्षण मिळाले की काही न करता तुमच्या आयुष्याचे कोटकल्याण होणार आहे. अर्थात, गरीब-भोळ्या समाजाला हे लबाड नेत्यांचे म्हणणे खरे वाटते. मग सुरू होतो ‘आरक्षण बचाव, हटाव’चा खेळ. तेलंगणमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनाही असाच आरक्षणाच्या नावाने खेळ करायचा आहे. चंद्रशेखर राव यांना आरक्षणाची ओढ आहे, कारण राजकारणाच्या जहागिरीमध्ये चंद्रशेखर राव यांनी आपल्या खानदानाला सत्ताकेंद्री आरक्षण दिले आहे. चंद्रशेखर राव यांचा मुलगा केटी राम राव, मुलगी कलककुंटला कविता, पुतण्या हरीश राव हे तेलंगणच्या राजकारणात चंद्रशेखर रावांची जहागिरी सांभाळत आहेत. तेलंगणचे राजकारण ‘सबकुछ चंद्रशेखर खानदान’ असे आहे. चंद्रशेखर रावांना आपल्या या जहागीरदारांबाबत विसर पडलेला दिसतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/