अजित पवारांच्या अडचणी वाढणार

28 Nov 2018 12:28:50
 


मुंबई : राज्यातील सिंचन घोटाळ्यासाठी आघाडी सरकारचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार आहेत, असे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले आहे. त्यामुळे पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याची सद्यस्थितीत चिन्हे आहेत. या प्रकरणी प्रतिक्रीया देताना अजित पवार यांनी न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही म्हटले.

 

मंगळवारी सकाळी अधिवेशनासाठी विधानसभेत पोहोचण्यापूर्वी अजित पवार यांना प्रसिद्धीमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सिंचन घोटाळ्याचे प्रकरण सद्यस्थितीत नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे या अन्य प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी नकार दिला. चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

मराठा आरक्षणावर आडकाठी नाही

मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारे आडकाठी करण्यात येत नाही. केवळ अहवाल सभागृहासमोर सादर करावा अशी आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले. अधिवेशनाचे अखेरचे तीन दिवस शिल्लक असून मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागावा अशी सर्वांची इच्छा असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वांना व्हिप जारी करण्यात आला आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी देखील आपली चर्चा झाली असून काँग्रेसने देखील व्हिप जारी केल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे ते म्हणाले.

काय आहे प्रकरण

विदर्भ कोकणातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहारास संबंधित खात्याचे मंत्री म्हणून तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार ठरतात, असे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी सादर केले. शासन व्यवहार नियमावलीतील नियम १० नुसार संबंधित खात्याचे मंत्री त्या विभागातील सर्व बाबींसाठी जबाबदार असतात. पवार यांनी मोबिलायझेशन ॅडव्हान्स अन्य काही वादग्रस्त मंजुरींच्या नोटशीट्सवर पवार यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हंटले आहे. तसेच विदर्भातील प्रकल्पांवर तत्परतेने निर्णय होणे आवश्यक असल्यामुळे कार्यकारी संचालकांनी सदरच्या धारिका अध्यक्ष यांच्या कार्यालयाकडे सरळ पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, हे नियमाचे उल्लंघन करणारे आणि बेकायदेशीर असल्याने यासाठी पवार जबाबदार ठरत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0