पूजन संविधानाचे, जागर संविधानाचा... जागर भारतीयत्वाचा...

    दिनांक  28-Nov-2018   संविधान कसे दिसते? कसे असते? तर ते असे दिसते असे असते हे पाहा, असे म्हणून भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष आणि शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी संविधानाची प्रत प्रेक्षागृहातील उपस्थित शेकडो श्रोत्यांना दाखवली. त्याबरोबर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. २५ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पुर्वसंध्येला स्वयम महिला मंडळाने संविधान जागरसंबंधी व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी उपस्थितांना संविधानाची वैशिष्ट्ये समजावून सांगताना डॉ. हावरे यांनी विविध पैलू उलगडले. ‘संविधान बचाव, संविधान हटाव’ ‘संविधानामध्ये बदल होणार,’ ‘संविधान कोणीही बदलू शकत नाही’ या आणि अशा कित्येक विधानांमुळे ‘संविधान’ सध्या चांगलेच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर संविधानाविषयीचे विशेष व्याख्यान ऐकण्यासाठी विक्रोळीकरांनी गर्दी केली होती. सर्वप्रथम डॉ. सुरेश हावरे, विठ्ठल कांबळे, अमित हावरे आणि स्वयम महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाचे पूजन केले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. सुरेश हावरे आणि विठ्ठल कांबळे यांचा स्वयम महिला मंडळाने मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच अखिल भारतीय भटके विमुक्त संघातर्फे भरतकुमार तांबिले आणि मच्छिंद्र चव्हाण यांनी पुणेरी पगडी घालून डॉ. सुरेश हावरे यांचा सत्कार केला, तर स्थानिक टागोर नगर मित्रमंडळानेही डॉ. सुरेश हावरे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला विक्रोळीतील ४५ समाजगटांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. या ४५ मान्यवरांचे रमेश पतंगे लिखित ‘आम्ही आणि आमचे संविधान’ हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. हे सर्व प्रतिनिधी आपापल्या समाजासाठी कार्यरत असतानाही त्यांचे विचार जातीपातीच्या चौकटीपलीकडले आहेत. आपल्या व्याख्यानामध्ये डॉ. सुरेश हावरे यांनी संविधानाबाबतचे ग्रह-पूर्वग्रह यांचा यथायोग्य समाचार घेतला. संविधानाच्या निर्मितीची पार्श्वभूमी, प्रत्यक्ष संविधान निर्मिती आणि त्यावेळची परिस्थिती विशद करताना डॉ. सुरेश हावरे यांनी अभ्यासपूर्ण दाखले दिले. देश आणि देशाबाहेरही आपल्या भारतीय संविधानाचे महत्त्व काय आहे, हे सांगताना त्यांनी स्वत: अनुभवलेले प्रसंग सांगितले. सध्याच्या परिस्थितीमध्ये संविधान हे समाजाला, देशाला तारणारे आहे हे सांगताना त्यांनी संविधानाचा मसुदा लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विशाल दृष्टिकोनही सहज भाषेत सांगितला.

 

संविधानाच्या नावाने आज काही लोक समाज तोडण्याची भाषा करीत आहेत. त्यातही भीमा-कोरेगावच्या नावाने १ जानेवारीला उसळलेल्या हिंसेमुळे विक्रोळीचे सामाजिक वातावरण तणावग्रस्त झाले होते. अशा वेळी डॉ. सुरेश हावरे यांनी संविधानाची सर्वसमावेशकता, संविधानाची सर्वव्याप्ती आणि जातीपातीपलीकडे जाऊन देशाला बांधणारा पवित्रधागा अशा स्वरूपात संविधानाचा जागर केला. यावेळी डॉ. हावरे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, “संविधानाची प्रत प्रत्येकाच्या घरी असायला हवी. संविधानाचे पूजन प्रत्येक घरात व्हायला हवे.” पूजन म्हणजे काय, हे सांगताना हावरे यांनी उपस्थितांना सांगितले की, “पूजन करायला सांगितले म्हणजे संविधानाच्या प्रतीला पवित्र कागदात, कापडात गुंडाळून तिला हळद-कुंकू वाहून तिचा नामजप करणे असा नाही बरं, तर संविधानाचे पूजन म्हणजे ते संविधान जगणे. त्या संविधानामध्ये असलेल्या कलमांचा अर्थ समजून घेणे. संविधानाने जो देश एकत्र बांधला आहे, त्या देशाच्या ऐक्याला जपणे.” डॉ. सुरेश हावरे यांनी संविधानाचे मानवतावादी केलेले विवेचन ऐकून उपस्थित काही ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ते म्हणाले, “विक्रोळी हे आंबेडकरी विचारांचे केंद्रबिंदू. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले हे ऐकण्यात आमची हयात गेली. मात्र, संविधान आज याची देही याची डोळा पाहिले. त्यातला शब्दनशब्द आज कळला.” कार्यक्रमाच्या पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत टाचणी पडली तरी, आवाज येईल इतकी शांतता आणि पवित्र वातावरण या कार्यक्रमामध्ये होते. हेच या कार्यक्रमाचे यश म्हणावे लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/