इथे ‘डिझाईन्ड’ मुलं मिळतील!

    दिनांक  28-Nov-2018   जियानकुई यांचे हे मनासारखे डिझाईन केलेले मूल जन्माला घालण्याचे संशोधन नक्कीच विज्ञानात क्रांती घडवून आणणारे असले तरी ही क्रांती चांगली असेल की वाईट याचे उत्तर येणारा काळच देऊ शकतो. कारण जगभरात मानवजात नेहमीच निरनिराळ्या आजारांना, अनुवंशिक विकारांना बळी पडत आली आहे. कितीतरी रोगांचे संक्रमण मानवी आयुष्यात पिढ्यान्पिढ्या होतानाही दिसते.

 

कराटे, बॉक्सिंग वा अन्य मोबाईल, कॉम्प्युटर गेम्समध्ये आपल्या खेळाडूचे व्यक्तिमत्त्व, रंग, डोळे, केस, शरीरयष्टी कशी असावी, हे निवडण्याचे वा संपादन करण्याचे पर्याय दिलेले असतात. आपला खेळाडू इतरांपेक्षा अधिक बलवान, तंदुरुस्त, चपळ असावा, या उद्देशाने मोबाईल वा कॉम्प्युटरवर गेम्स खेळणारे आपल्या खेळाडूची सगळीच रचना मनासारखी करून घेतात. ज्यामुळे हे असे डिझाईनर-एडिटेड-खेळाडू या गेम्समध्ये विजयीही होतात. अर्थात हा झाला मोबाईल वा कॉम्प्युटर गेम्समधील भाग, पण सध्या केवळ मोबाईल वा कॉम्प्युटर गेम्सपुरती मर्यादित असणारी ही अनोखी घटना प्रत्यक्ष मानवी जीवनातच घडू लागली तर? माणसाला स्वतःची मुलं कशाप्रकारे हवीत, हे ‘डिझाईन’ करून जन्माला घालता येऊ लागली तर काय होईल? ते एकूणच मानवजातीच्या भल्याचे असेल की वाईटाचे? निसर्गनियमाच्या विरुद्ध असेल की बरोबर?

 

मुले ही देवाघरची फुले आणि ईश्वर सर्वांनाच एकसमान तयार करत नाही, ही वाक्ये तर आपण कित्येकदा ऐकली असतील. पण आता ईश्वराच्या या किमयेलाच आव्हान देण्याचे काम माणसाने हाती घेतल्याचे दिसते. चीनमधील हे जियानकुई या संशोधकाने या दिशेने यशस्वी प्रयोग केला असून त्यांनी गर्भावस्थेदरम्यानच भ्रूणाच्या डीएनएमध्ये परिवर्तन घडवून आणले आणि ‘डिझाईन्ड’ जुळ्या मुलींना जन्माला आणले. हे जियानकुई यांचे हे संशोधन कोणत्याही विज्ञानविषयक मासिकात प्रकाशित झालेले नाही किंवा त्याची पुष्टी करणारा कोणताही प्रबंध छापून आलेला नाही. तर ही गोष्ट जियानकुई यांनी स्वतःच ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून जगासमोर आणली. शिवाय अशाप्रकारे जन्माला आलेल्या जुळ्या मुलींची (लुलू आणि नाना ही त्यांची नावे) व त्यांच्या मातेची ओळख गोपनीय ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. जियानकुई यांनी हा दावा करताच त्यांच्यावर अनेकानेक शास्त्रज्ञांनी टीकेची झोड उठवली आणि जियानकुई निसर्गनियमांशी खेळत असल्याचा आरोपही करण्यात आला. मानवी मूल्यांच्या विरुद्ध असणारी ही घटना अनैतिक असल्याचेही कित्येक शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले व डीएनए-जनुकीय रचनेत बदल करणे हे नवजात जुळ्या मुली आणि संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक असल्याचेही ठासून सांगितले. दुसरीकडे जियानकुई यांनी आपल्या संशोधनाची पाठराखण करत मी केवळ भावी पिढीचा एचआयव्ही-एड्सच्या संक्रमणापासून बचाव व्हावा म्हणूनच भ्रूणाच्या डीएनए-जनुकीय रचनेत बदल केल्याचे म्हटले. सोबतच हे योग्य की अयोग्य, याचा निर्णय त्यांनी लोकांवरच सोडून दिला.

 

जियानकुई यांचे हे मनासारखे डिझाईन केलेले मूल जन्माला घालण्याचे संशोधन नक्कीच विज्ञानात क्रांती घडवून आणणारे असले तरी ही क्रांती चांगली असेल की वाईट याचे उत्तर येणारा काळच देऊ शकतो. कारण जगभरात मानवजात नेहमीच निरनिराळ्या आजारांना, अनुवंशिक विकारांना बळी पडत आली आहे. कितीतरी रोगांचे संक्रमण मानवी आयुष्यात पिढ्यान्पिढ्या होतानाही दिसते. पण, जर मानवाच्या डीएनएत-जनुकीय रचनेत बदल केला तर अशा संकटापासून नक्कीच वाचता येऊ शकते. पण, याचे वाईट परिणामही संभवतात. जी जनुके पृथ्वीवरील वातावरणात जगण्यासाठी बनलेलीच नाहीत, त्यांचेही रोपण भ्रूणाच्या शरीरात केले जाऊ शकते. ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांवर त्याचा विपरित परिणाम होईल. सोबतच मानवी आशा-आकांक्षा नेहमीच नवनव्या कल्पनांचे मनोरे उभारत असतात, त्यात जोडीला विज्ञानही असेल तर या मनोऱ्यांचे पर्वतातही रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे असे की, माझे मूल सर्वोत्कृष्ट असावे म्हणून पालकच असा काही हट्ट धरतील की, त्यातून सुपर बेबीजचा जन्म होईल. भ्रूण गर्भात असतानाच आता जसे क्रेडिट-डेबिट कार्ड, इंटरनेट ब्राऊझर, इन्शुरन्स पॉलिसी आदी क्षेत्रात अॅड ऑन गोष्टींचा लाभ दिला जातो, तसा लाभ जन्माला येणार्‍या शिशुलाही मिळावा म्हणून प्रयत्न केले जातील. यात सौंदर्य, ताकद, कृत्रिम बुद्धिमत्ता, इनबिल्ट जीपीएस सिस्टिम अशा गोष्टींचा अंतर्भाव केला जाऊ शकतो. या सगळ्याच सोयी-सुविधांनी युक्त शिशू हे नक्कीच सर्वसामान्य मानवी शिशुंपेक्षा निराळे असतील. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान वापरण्याची ऐपत प्रत्येकाचीच असेल असे नाही. त्यावेळी या ‘सुपर बेबीज’ आणि ‘नॉर्मल बेबीज’मध्ये वर्चस्वाच्या लढाईची शक्यता नाकारता येत नाही. या संघर्षात अर्थातच तो सर्वात शक्तीशाली, बुद्धिमान असेल तो जिंकेल आणि जो दुबळा असेल त्याचे अस्तित्वच संपुष्टात येईल. हॉलिवूडपटांमध्ये जसे मानवाने तयार केलेले रोबोटच मानवाचा नायनाट करतात, तसा हा भस्मासूर मानवावरच उलटू शकतो. त्यामुळे जियानकुई यांचे संशोधन कितीही चांगले वाटत असले तरी त्याचे समर्थन करणे शक्य नाही, असे वाटते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/