विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार

27 Nov 2018 15:23:12
 
 

मुंबई : लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृति संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्काराचे भव्य आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्ष असून यंदाचा लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पद्मश्री डॉ. अभय बंग, साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणारे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लोककलेतील प्रसिद्ध सौ. शकुंतलाताई नगरकर, लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन व अभिनयाद्वारे रसिकांना हसवणारे डॉ. निलेश साबळे आणि संगीतकार व गायक अमितराज यांचा “मृद्गंध” हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

 

लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे ८ वा स्मृति संगीत समारोहाचे आयोजन व मृदगंध पुरस्काराचे वितरण सोमवार दि. २६ नोव्हेंबर, २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, प्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिवर, जयराज साळगांवकर यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. हया मान्यवरांच्या हस्ते “मृदगंध” पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारोहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात शिवमणी (रिदमकिंग), पं. रवी चारी (सतार), संगीत हळदीपूर (कि बोर्ड), राहुल देशपांडे (शास्त्रीय गायन), कडूबाई खरात (लोकसंगीत गायन) यांनी भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

२६ नोव्हेंबर हा लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा स्मृतिदिन. हया स्मृतिदिनानिमित्त संगीत समारोहाबरोबरच कला, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांना “मृदगंध पुरस्कार” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. आतापर्यंत ज्येष्ठ साहित्यिक सौ. अरुणाताई ढेरे, शास्त्रीय नृत्य (कथ्थक) डॉ. सौ. मंजिरी देव, पत्रकार व लेखक जयंत पवार, अभिनेता सुबोध भावे, ढोलकी सम्राट राजाराम जामसंडेकर अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, पं. रोणू मजुमदार, मयुर वैद्य, आदिती भागवत, गणेश चंदनशीवे, पं. तौफिक कुरेशी, आरती अंकलीकर टिकेकर, पं. रविंद्र चारी, शर्वरी जमेनीस, पं. शौनक अभिषेकी,शकुंतलाबाई नगरकर यांचा संगीत समारोहामध्ये सहभाग लाभला आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सुपुत्र नंदेश उमप हे गेली सात वर्ष हा उपक्रम राबवित आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0