उद्या सागर पार्कवर रंगणार कुस्त्या, विजेत्यांना साडेपाच लाखांची बक्षिसे

27 Nov 2018 11:15:38

केशवस्मृती प्रतिष्ठान, श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सव समितीतर्फे आयोजन

 
जळगाव : 
 
येथील केशवस्मृती प्रतिष्ठान, श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सव समितीतर्फे बुधवारी 28 नोव्हेंबर रोजी दु. 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सागर पार्कवरील विशेष आखाड्यात कुस्त्यांची भव्य दंगल होत आहे.ज्यात साडेपाच लाखाच्या बक्षिसांची लयलूट असेल.
 
 
आज सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, समन्वयक व प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित संचालक दीपक गजानन जोशी यांनी ही माहिती दिली.
 
यावेळी कुस्तीक्षेत्रातील अनुभवी, जाणकार तसेच या दंगलीच्या आयोजित आखाडा प्रमुख सुनील जगन्नाथ शिंदे (सुपडू पहेलवान), राहुल रमेश वाघ (सदस्य जिल्हा कुस्तीसंघ), कुस्ती समितीचे अध्यक्ष बापू तथा दिलीप आनंदा पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र रामदास सपकाळे आणि माधवराव कुळकर्णी, भरत भोईटे उपस्थित होते. त्यांनीही संवादात स्वत:च्या द़ृष्टीकोनातून या दंगलीचे वेगळेपण अधोरेखित केले.
 
 
जळगावच्या सांस्कृतिक विश्वात श्रीराम रथोत्सवानंतर होणार्‍या कुस्त्यांच्या दंगलीचे अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावर खानदेशातील मल्लांची कामगिरी उंचवावी, त्या धाटणीचे मल्ल या मातीतून घडावे, नवीन पिढीही या कलेत निष्णात व्हावी, त्यातून देश व राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिकपर्यत मल्लांनी मैदान गाजवावे, जळगावचे,खान्देशचे व राष्ट्राचेही नाव उज्ज्वल करावे, या व्यापक उद्देशाने देखील या कुस्त्यांचे आयोजन प्रतिष्ठानने केलेले आहे.
कोण पटकावणार मनाचा ‘केशवकेशरी’ किताब आणि गदा ?
 
हरयाणाचा महान भारत केसरी प्रवीणसिंह सोनिपत पहेलवान आणि पंजाबचा प्रसिद्ध मल्ल गनी अली यांच्यातील लढत आकर्षण असेल. यंदाच्या या शेवटच्या मानाच्या कुस्तीतील विजेत्याला ‘केशवकेसरी’ हा किताब देवून ‘गदा’ बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे.
 
मागील तीन वर्षात महारष्ट्रातील जवळपास 500 नामवंत मल्लांना जळगावच्या मैदानात दोन हात करण्याची संधी मिळाली आहे. तर मागील वर्षी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा येथील नामवंत कुस्तीपटूंच्या दर्जेदार कुस्त्यांची मेजवानी शहरासह खान्देशवासियांना मिळाली होती. यावर्षी राज्य व देशभरातून लहान मोठे 350 वर मल्ल व महिला पहेलवान सहभागी होतील.
 
कोणत्याही गटातील कोणत्याही मल्लाला मैदान गाजविण्याची विनामूल्य संधी.
 
आखाडापूजनाला मान्यवर मंत्री व लोकप्रतिनिधींची उपस्थिती.
 
एकाच वेळी अनेक कुस्त्या रंगणार. हजारो शौकिनांची गर्दी होणार
 
दूरदर्शन केबल वाहिन्यांवरही लाईव्ह प्रसारण शक्य.
कल्पेश मराठे-नितीन गवळी यांची लढत
 
यंदा दिल्लीचा निर्मल देशवल पेहलवान, पंजाबचा हरिष डांगर यांच्यासह जळगावमधील कल्पेश मराठे आणि नितीन गवळी आदी पहेलवानांची लढत रंगतदार ठरणार आहे. यशस्वीतेसाठी जळगावातील नामांकित पहेलवान एकत्र आले व त्यांची केशवस्मृती प्रतिष्ठानच्या अंतर्गत कुस्ती समितीची स्थापना केली .
Powered By Sangraha 9.0