मौनीबाबांचे फुकाचे सल्ले

    दिनांक  27-Nov-2018   जगात सल्ला देण्यासारखी स्वस्त गोष्ट दुसरी कुठलीही नाही. हाताला काम आणि बुद्धीला दाम मिळाले नाही की, माणसे सल्ले देण्याचा तोंडी व्यायाम करू लागतात. जवळपास दहा वर्षे सोनियाजींच्या हाताखालचा कळसुत्री बाहुला म्हणून पंतप्रधानपदाचा आब आणि मान मातीमोल करणाऱ्या मनमोहन सिंगांना सत्ता गेल्यापासून हाच कामधंदा मिळाल्याचे दिसते. म्हणूनच ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनाहूत सल्ले देण्याचे काम इमानेइतबारे निभावताना दिसतात. नुकतीच त्यांनी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली. यावेळी मनमोहन सिंगांनी नरेंद्र मोदींना, “पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा,” असा न मागितलेला सल्ला दिला. मनमोहन सिंगांचे अर्थशास्त्रातले ज्ञान आणि अर्थमंत्री असतानाचे कर्तृत्व नक्कीच वादातीत आहे. पण, पंतप्रधानपदी येताच मनमोहन सिंगांनी आपले ज्ञान आणि कर्तृत्व सोनियांच्या पदरी गहाण टाकले. त्यामुळे आजचा मनमोहन सिंगांनी दिलेला सल्ला ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हज को,’ या उक्तीची आठवण करून देणाराच म्हटला पाहिजे. कारण, सोनियांनी सांगायचे आणि त्यापुढे मान तुकवत घराण्याची गुलामी शिरसावंद्य असल्याचे कृतीतून दाखवून द्यायचे, हा वस्तुपाठच मनमोहन सिंगांनी पंतप्रधानपदी असताना घालून दिला. आपल्या डोळ्यांदेखत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होत असताना हे महाशय डोळ्याला पट्टी आणि तोंडाला कुलूप लावून बसल्याचे अवघ्या देशाने पाहिले. राष्ट्रीय सल्लागार मंडळासारखी अवैध संस्था स्थापून सोनिया गांधी देशाचे नेतृत्व करत होत्या आणि मनमोहन सिंगांचा सन्मान गांधी घराण्याच्या पायाशी लोळण घेत होता. परकीय देशांतील शिष्टमंडळे भारतात आली की, सोनियांसमोर मनमोहन सिंगांना खड्यासारखे बाजूला केले जायचे आणि सगळीच सूत्रे सोनिया गांधी आपल्याच हाती घ्यायच्या. या सगळ्यांवर कळस म्हणजे राहुल गांधींसारख्या बालिश इसमाने सगळ्या जगासमोर टराटरा फाडलेला अध्यादेशाचा चिठोऱ्या! या प्रत्येक वेळी मनमोहन सिंगजी तुम्ही मौनीबाबाच्याच रुपात राहणे पसंत केले. सांगा मनमोहनजी, या प्रत्येक वेळी तुमच्या पदाची प्रतिष्ठा कुठे पेंड खात होती? त्यामुळे ज्यांना स्वत: पंतप्रधान असताना पदाची प्रतिष्ठा जपता आली नाही, त्यांनी नरेंद्र मोदींना सल्ला देण्याचा आगाऊपणा करणे, कसे योग्य ठरू शकते? अर्थात, घराण्याची गुलामगिरी करण्याचेच ज्यांनी प्रतिष्ठेचे करून ठेवले, त्यांच्याकडे याची उत्तरे नसतीलच. कारण, गुलामगिरी तर त्यांच्या धमन्याधमन्यांतून वाहतेय ना!

 

दप्तराचे ओझे कमी होता...

 

पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गृहपाठ न देण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्याचे निर्देश नुकतेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले. केंद्राचा हा निर्णय खरेतर स्वागतार्ह म्हटला पाहिजे. कारण, आज-काल मूल जन्मले नाही की, पालक त्याला शाळेत पाठवण्याची घाई करू लागतात. पूर्वी बालवाडी, अंगणवाडी हे उपक्रम होते, ज्यात बालकांसाठी खेळ, अभिनय, गाणी, गोष्टींची गंमत-जम्मत असायची. जगाची ओळख होऊ लागलेल्या बालकांसाठी या गोष्टी आनंददायक आणि आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत. पण, जसजसे ‘खाजाउ’ धोरणाचे परिणाम दिसू लागले, तसतसे मुलांना अडीच ते तिसऱ्या वर्षांपासूनच शाळेत पाठवण्याचे खूळ पालकांच्या डोक्यात शिरले. मग ज्ञान विकणाऱ्या संस्थाचालकांनीही यात आपले उखळ पांढरे करून घेतले. ठिकठिकाणी बालकांसाठीच्या कितीतरी शाळांचे पिंजरे उभारले गेले. पालकांनीही अशा ठिकाणी मुलांना पाठवण्याचीच जिद्द बाळगली. आपले मूल या स्पर्धेच्या युगात मागे राहू नये, म्हणून त्यांच्या बालपणाला चुरगळून टाकण्याचाच हा प्रकार होता, असे कोणी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. यातूनच बालकांवर अभ्यासासाठी दबाव वाढत गेला. त्यांच्या कोवळ्या वयात त्यांच्याकडून भरमसाठ अपेक्षाही बाळगल्या गेल्या. पण, आपल्या अपेक्षांमुळे बालकांचे बालपणच काळवंडते आहे, याचा कोणी विचारच केला नाही. केंद्राच्या आताच्या निर्णयामागची ही पार्श्वभूमी म्हणूनच लक्षात घ्यायला हवी. बालकांवर पहिली, दुसरीच्या वर्गात असतानाच गृहपाठ, भारंभर पुस्तके, निरनिराळ्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आल्याचेही आपल्याला दिसते. पण आताच्या या निर्णयाने बालकांच्या बालपणाला जाचणारा त्रास कमी होईल, असे वाटते. कदाचित गृहपाठासारख्या निरस गोष्टी करायला न लागल्याने बालके अधिकाधिक मुक्त वातावरणात जगतील आणि व्यक्तही होतील. सोबतच बालपणात जे आवश्यक असते, त्या खेळण्या-बागडण्याचाही आनंद लुटतील. कारण, हेच तर त्यांचं वय असतं. एकदा हे वय निघून गेलं की, पुन्हा त्यांना दुनियादारीत फिरायचे आहेच. दप्तराच्या ओझ्याने दुखावणारे खांदे आणि पाठ ताठपणे ते वागवू शकतात. विचार करा, मोठ्या माणसांना पाठीच्या दुखण्याने हैराण केले की, त्यांचे कसे हाल होतात... तसेच या मुलांचेही हाल दप्तराच्या ओझ्याने होत असतील. पण आता तो केवळ भूतकाळ ठरेल, हे नक्की.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/