वैचारिक बदलांचा सकारात्मक प्रवास

    दिनांक  26-Nov-2018   संवेदशील मन, घेतलेले काम निष्ठेने करणे आणि समतेचे मूल्य जपत समाजजागृती करण्याचा पण घेतलेल्या अशोक कांबळेंचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील देवडे हे अशोक कांबळे यांचे मूळ गाव. त्यांचे वडील जयराम कांबळे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये कामाठीपुरा परिसरात चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून कार्यरत होते. अशोक यांची आई उत्तमा. त्या आपल्या चार मुलांना घेऊन गावीच राहायच्या. कारण, मुंबईत जयराम जरी महानगरपालिकेत कामाला असले तरी, तिथे राहायला हक्काचे घर नव्हते. जयराम वर्षातून एकदा-दोनदा म्हणजे, साधारणत: बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गावी यायचे आणि अनियमितपणे अनियमित रकमेची मनीऑर्डर घरी पाठवायचे. त्याला काही कारणेही होती. एकतर जयराम यांचा अपुरा पगार आणि व्यसन. त्यामुळे गावी चार मुलांना सांभाळताना उत्तमा यांना अपार कष्ट करावे लागत. त्या कष्टांना अंत ना पार. आईचे कष्ट पाहत अशोक यांचे बालपण गेले. त्या बालपणाला दारिद्र्य आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच समस्यांची निर्दयी झालर होती. ते दिवस त्यांच्या मनावर खोलवर रूजले. याच दिवसांत भावकीच्या बैठकीत उपस्थित राहताना अशोक यांना कळले की, गावातील काही युवक मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. जे महाविद्यालय डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केले आहे. पोटाला भाकरी मिळणे हे एकमेव उद्दिष्ट असतानाही त्यावेळी अशोक यांनी ठरवले की, आपणही शिकावे. या एकाच इच्छेमुळे ते आठवीत शिक्षणासाठी मुंबईत आले. कामाठीपुरामधील इमारतीच्या जिन्याखालील कोपऱ्यामध्ये ते आणि त्यांचे वडील राहू लागले.

 

वडिलांचे व्यसन, पैशांची तंगी आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची व्यवस्था यामध्ये त्यांनी मनाचा तोल ढळू दिला नाही. घरातील काम करावे, जेवण बनवावे आणि शाळेला जावे हा दिनक्रम कायम ठेवला. कसेबसे ते दहावी पास झाले. ते खाजगी दवाखान्यात कंपाऊंडरचे काम करू लागले. पण, त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी इच्छेप्रमाणे सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या पाच वर्षांत होतकरू, मितभाषी पण नेहमी उत्साहाने सर्वांना मदत करणारा विद्यार्थी म्हणून ते लोकप्रिय होते. त्यामुळे दोन वर्षं ते महाविद्यालयात वर्ग प्रतिनिधी म्हणूनही निवडले गेले. ते सांगतात, “त्या काळात माझ्या मित्रमंडळींना कुणाला माहितीही नसायचे की, मी इमारतीच्या जिन्याखालच्या कोपऱ्यात राहतो.” त्याकाळी कामाठीपुऱ्यामध्ये मारवाड्याच्या दुकानात कपडेही गहाण ठेवता यायचे. ते कपडे अतिशय स्वस्तामध्ये सोडवून अशोक घालायचे. इतकेच काय, वडिलांच्या मित्रांना कामावर महानगरपालिकेकडून कपडे मिळायचे. ते कपडे शिवून शिवून अशोक घालायचे. या दिवसांचा उल्लेख यासाठी की, अशा दिवसांतही अशोक यांच्या मनातील संवेदनशीलता संपली नव्हती. देहविक्री करणाऱ्या स्त्रियांचा परिसर म्हणून कुप्रसिद्ध तिथे या महिलांच्या अगणित समस्या. एकंदर मानवी जगण्याचे अनेक पैलू अनुभवताना मनाचा कोंडमारा मोकळा करण्यासाठी अशोक कविता करू लागले. पुढे ते भारिपचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून काम करू लागले. तोपर्यंत त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. आर्थिक तंगीही होतीच.

 

नोकरी करणे गरजेचे होते. त्यावेळी भारिप चळवळीतील एक-दोन जण चांगल्या हुद्द्यावर कामाला होते. त्यांनी प्रयत्न केले असते, तर अशोक यांना चांगली नोकरी मिळू शकली असती. पण, याचा विचार कोणीही करत नव्हते. काही गल्ल्या सोडून भाजप पक्षाचे कार्यालय होते. तिथे समता परिषदेचे डी. एम. पवार यायचे. देहविक्री करणाऱ्या महिलेच्या मुलीला शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी जन्मदाखला हवा होता. तो मिळवण्यासाठी अशोक पवार यांच्याकडे गेले. तोपर्यंत त्यांना वाटे की, भारिप, भाजप आणि समता परिषद यांच्यात वैचारिक भिन्नता आहे. समता परिषदेचे पवार काम करतील का? पण, समता परिषदेमध्ये वेगळाच अनुभव आला. अशोक यांनी आणलेले काम तर झालेच, शिवाय समता परिषदेच्या भाई गिरकरांमुळे त्यांना जनकल्याण बँकेत नोकरीही मिळाली. इथूनच समता परिषदेची ओळख झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक, विधायक काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या माध्यमातूनच मग त्यांनी सफाई कामगार ते इतर शोषित-वंचित समाजासाठी काम करायला सुरुवात केली. मुख्यत: त्यांनी समाजामध्ये जागृती केली की, समन्वयातूनही समाजाचा विकास होऊ शकतो. विघातक आंदोलनामध्ये सक्रिय होण्याऐवजी तरुणांनी विवेकवादी दृष्टिकोनातून स्वत:चा विकास साधावा. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांना पाहून अनेक सुशिक्षित युवकांना प्रेरणा मिळाली. जातीपातीच्या चौकटीत न राहता, विकासात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, हे त्यांना समजले. त्यांच्या कामाची दखल समाजाने घेतलीही. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. ‘माय होम इंडिया,’ ‘एकता कल्चर अकॅडमी,’ ‘बौद्ध विकास महासंघ भूषण पुरस्कार,’ मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा कामगारविषयक पुरस्कार या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. हे सगळे करत असताना अशोक बँकेमध्येही अधिकारीपदापर्यंत पोहोचले. भारीप कार्यकर्ता ते समता परिषद कार्याध्यक्ष हा त्यांचा जीवनप्रवास हा वैचारिक बदलांसह सकारात्मक जाणिवा निर्माण करणारा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/