जब मिल बैठेंगे तीन यार...

    दिनांक  26-Nov-2018   
 
 

तीन...हा आकडाच मुळात आपण अशुभ मानतो. पण, जेएनयुमध्ये भारताचे तुकडे पाडण्याच्या घोषणा देणारा एक कन्हैय्या, पाटीदारांच्या नावाखाली गुजरातला धुमसत ठेवणारा हार्दिक आणि एल्गार परिषदेच्या नावाखाली शहरी नक्षलवादाची दंगल भडकविणारा जिग्नेश मेवानी यांना काय शुभ, काय अशुभ म्हणा. हे तीन डाव्या टाळक्यांचे स्वत:ला ‘युवा नेते’ वगैरे मानणारे ‘विचारजंत’ रविवारी मुंबईत एकत्र दिसले. निमित्त होते ते युनाटडेट युथ फ्रंटने आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीचे. आता या अशा प्रकारच्या रॅली काही नवीन नाहीत. कारण, या प्रत्येक रॅलीत भाजप-संघ कसे संविधानाला मारक आणि आम्हीच कसे संविधानाचे खरे तारक, असा आर्विभाव निर्माण करण्यात ही मंडळी एकदम पटाईत. जेमतेम ५०० लोकांसह ही रॅली दादरच्या हिंदू कॉलनीवरून निघाली आणि चैत्यभूमीला त्याची सांगताही झाली. यावेळी एकमेकांच्या अगदी गळ्यात गळे घालून या तीन अल्लड यारांनी मोदींवर तोंडसुख घेण्याच्या या नामी संधीचा पुरेपूर फायदा घेतला.

 

कन्हैय्याच्या मुजोरीची तर दादच द्यायला हवी. पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर टीका करणारा हा दिवट्याही राहुल गांधींची भाषा बोलू लागला आणि पातळी सोडून त्याने मोेदींवर टीका केली. “मोदी आपल्या आईला सांभाळत नाहीत, म्हणून ते नालायक आहेत,” असे सांगत कन्हैय्याने अकलेचे घोडे दामटवले. देशाच्या पंतप्रधानांवर ही असली खालच्या पातळीवरची टीका अगदी अशोभनीयच. पण, कन्हैय्यासारख्यांना त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. मोदी आणि त्यांच्या आईचे संबंध सर्व देश जाणून आहेच. मोदी जरी त्यांच्या आईंचा प्रत्यक्ष सांभाळ करत नसले तरी तेया भारतमातेच्या सेवेसाठी पूर्णत: कटिबद्ध आहेत. मोदींनी ‘मी...माझे’ असा कदापि विचार केला नाही आणि देशसेवार्थ स्वत:ला अहर्निश वाहून घेतले. पण, जेएनयुच्या चार भिंतींआड बसून चार तरुणांची माथी भडकविणार्‍या कन्हैय्याला त्याचे मोल कधी समजणार नाही. कारण, या डाव्यांची तेवढी बौद्धिक कुवत तर नाहीच, शिवाय सर्व भावनाही विळ्या-कोयत्याशीच सलगी असल्यामुळे अगदी बोथट झालेल्या. संविधानानेच दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या जोरावर अशाप्रकारे निर्लज्ज, बेधडक विधाने करण्याची कन्हैय्यासारख्यांची मग्रुरी हाणून पाडलीच पाहिजे. या राष्ट्रविरोधी त्रिकुटाचा हा पोरखेळ फार काळ चालणार नाही. कारण, जनता सगळं बघतेय, सगळं ऐकतेय...

 

संविधानाच्या नावाने...

 

आपले संविधान धोक्यात आहे. भाजप-संघाचा संविधान बदलण्याचा कुटील डाव आहे. घटनादुरुस्ती करण्याचे त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. मोदींचे सरकारी संस्थांवर एकहाती नियंत्रण आहे. म्हणजेच संविधान धोक्यात आहे...” हीच पोपटपंची करून डाव्यांच्या संविधान बचाव यात्रांच्या नावाखाली अस्तित्व प्रदर्शनाची धडपड सुरू असते. वरवर या यात्रांचे नाव ‘संविधान बचाव’ असले तरी नारे मात्र ‘मोदी हटाव’चेच दिले जातात. डाव्यांच्या या पोरखेळामध्ये मग काँग्रेस-राष्ट्रवादीही गंमत म्हणून सामील होतात. संविधानाला का, कसा धोका आहे, यावर मात्र ही मंडळी अगदी चिडीचूप. कारण, उंदरांच्या शर्यतीत सामील झालेले सगळे मेंदूच्या केवळ डाव्या बाजूनेच विचार करणारे. म्हणून त्यांना हे असले प्रश्न पडत नाही. कोणी प्रतिक्रिया विचारलीच, तर मोदी कसे सीबीआय, रिझर्व्ह बँकेला वेठीस धरतात वगैरे पोकळ दावे दाखवून कंठशोष केला जातो. पण, काँग्रेसच्या काळात कधी डाव्यांच्या अशा संविधान बचाव यात्रा निघाल्याचे ऐकीवात नाही.

 
आणीबाणी लादणार्‍या काँग्रेसचे लोकही मग याच चार टाळक्यांच्या अशा यात्रांना पाठिंबा देतात आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुद्दा हाच उपस्थित होतो की, ‘संविधान बचाव’च्या नावाने कावकाव करणारे हे डोमकावळे संविधानाचा आपल्या जीवनात असा कितीसा अवलंब करतात़? कन्हैय्या, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी यांनी छातीठोकपणे एकदा सांगावेच की, कधीही त्यांनी कायदा मोडलेला नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांच्यामुळे निर्माण झालेला नाही. भडकावू भाषणेही त्यांची नाहीच. या राष्ट्रघातकी त्रिकुटाला चुकूनही हे सगळे कबूल करणे शक्य नाही. कारण, त्यांच्या भूमिका, त्यांच्या कृती या नेहमीच संविधानविरोधी राहिल्या आहेत. तोंडातून संविधानाचा नामजप करायचा, मात्र त्याच संविधानातील कायदे मात्र पायदळी तुडवायचे, असा हा सगळा ढोंगीपणा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संविधानाला धोका वगैरे आहे, असे सर्वसामान्यांना अजिबात वाटत नाही. त्यामुळे अशा रॅली काढून ‘पब्लिक पॅनिक’ची असामाजिक अनीती अवलंबणे, हेच मुळी गैरसंविधानिक ठरावे. तेव्हा, संविधानाची जर एवढीच चिंता असेल, मनस्वी काळजी वाटत असेल तर याच मंडळींनी संविधानाच्या जनजागरणावर भर द्यावा. तीच खरी संविधानाप्रती दाखवलेली खरी निष्ठा ठरेल.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/