संविधान रक्षति रक्षितः।

    दिनांक  25-Nov-2018   संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. या कायद्यानुसार देश चालतो. हा कायदा समाजाला बांधून ठेवण्याचे काम करतो. त्याचवेळी ज्यांनी राज्य करायचे, त्यांनादेखील बांधून ठेवतो. राज्य करताना मन मानेल तसे कायदे करून राज्य करता येत नाही. संविधान त्याची अनुमती देत नाही.


२६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून पाळला जातो. संपूर्ण देशात विविध ठिकाणी कार्यक्रम करण्याची आता प्रथा सुरू झाली आहे. तसे आपण भारतीय लोक उत्सवप्रिय असतोच. त्यामुळे नवनवीन कार्यक्रम करताना खूप उत्साह असतो आणि उत्सव करतानाचा उत्साह तर बघायलाच नको. संविधान दिनाचा कार्यक्रम मात्र उत्सवी दिनांप्रमाणे होऊ नये, तर तो गांभिर्याने केला जावा. संविधान किंवा घटना हे शब्द सर्वसामान्य माणसांना माहीत असतात. परंतु, त्याचे नेमके अर्थ कोणते? याबाबतीत सर्वसामान्य माणसाला काही माहिती नसते. याबाबतीत त्याला दोष देण्याचे काही कारण नाही. कोणत्याही विषयाची माहिती घरबसल्या साक्षात्काराने होत नाही. विषयाची माहिती कोणीतरी सांगावी लागते. ज्ञान हे लोकांना द्यावे लागते. म्हणजे मग सामान्य माणसालादेखील विषय समजतो. आपल्या देशातील अशिक्षितातील अशिक्षित माणसालादेखील जसे करावे तसे भरावे, हा कर्मसिद्धांत माहीत असतो. विश्वाचा चालक ईश्वर आहे आणि कर्ता-करविता तोच आहे, आपण फक्त निमित्तमात्र आहोत, हेदेखील त्याला माहीत असतं. गहन-आध्यात्मिक तत्त्व त्याला कदाचित गहन भाषेत सांगता येणार नाही पण, ते जगायचे कसे हे त्याला समजते. याचे कारण की, हे आध्यात्मिक संस्कार त्याच्यावर पिढ्यान्पिढ्या होत गेलेले आहेत. साधु-संत, प्रवचनकार-कीर्तनकार, एवढेच काय पण साधुसंतांवरील चित्रपट यामुळे त्याला या सर्व विषयाची सर्व माहिती असते. दुर्दैवाने गेल्या ७० वर्षांत आपल्या संविधानाविषयी मात्र याप्रकारचे जनप्रबोधन झालेले नाही. सर्वसामान्य माणसाला जर विचारले की, हे संविधान तुला आपले वाटते का? तर त्याची दोन प्रकारची उत्तरे येतील. ज्याला आरक्षणाचा लाभ झाला आहे, तो संविधानाविषयी चांगले बोलेल आणि ज्याला आरक्षण मिळाले नाही, तो म्हणेल ‘या संविधानाने मला काही दिलेले नाही.’ या दोन्ही प्रतिक्रिया संविधानाविषयी विशेष ज्ञान आहे, हे दाखविणाऱ्या नाहीत. काही लोकांना आरक्षण देण्यासाठी या संविधानाची निर्मिती झालेली नाही, हे लोकांना नीट समजून सांगितल्याशिवाय समजत नाही. गेल्या ७० वर्षांत संविधानाविषयी राजकारण मात्र पराकोटीचे झालेले आहे. संविधानावर कसलेही संकट नसताना त्याच्या बचावाचे मोर्चे काढले जातात. काही लोकांना आणि काही संस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ‘संविधान बचाववाले’ आरोप ठोकून देतात की, यांना संविधान बदलायचे आहे. यातील सगळ्यात मोठा विरोधाभास असा की, जे आरोप करतात त्यांना संविधान म्हणजे काय, हे माहीत नसते आणि ज्यांच्यावर आरोप केला जातो, ते संविधानाविषयी अज्ञानी असतात.

 

संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. या कायद्यानुसार देश चालतो. हा कायदा समाजाला बांधून ठेवण्याचे काम करतो. त्याचवेळी ज्यांनी राज्य करायचे, त्यांनादेखील बांधून ठेवतो. राज्य करताना मन मानेल तसे कायदे करून राज्य करता येत नाही. संविधान त्याची अनुमती देत नाही. त्याचवेळी समाजाने रोजच्या व्यवहारात वाटेल त्या गोष्टी करण्यालाही संविधान अनुमती देत नाही. ज्यांनी राज्य करायचे आहे, ते कोणत्या नियमांनी म्हणजे कायद्याने करायचे, हे संविधान स्पष्ट करते. संवैधानिक कायदा मोडून जर कुणी राज्य करण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते आणि न्यायालय आवश्यक ती कृती करतात. आपला देश संविधानाप्रमाणे चालतो याचा हा अर्थ आहे. एका वाक्यात सांगायचे, तर देश संवैधानिक कायद्याप्रमाणे चालतो. हा विषय अधिक सोपा करून सांगायचा, तर आपल्या जीवनातील उदाहरण घेऊ. रोज कामधंद्यासाठी आपण बाहेर पडतो. रिक्षा, बस, रेल्वे अथवा टॅक्सीने प्रवास करावा लागतो. कामाच्या ठिकाणी आपण वेळेवर पोहोचतो. ठराविक तास काम करून पुन्हा तसाच प्रवास करून घरी येतो. रोजच्या जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, भाजीपाला वगैरे योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या भावात आपल्याला उपलब्ध होतो, हा प्रत्येकाचा अनुभव असतो. घरातून बाहेर गेलेल्या ‘तो’ किंवा ‘ती’ यांच्याविषयी घरच्यांना विशेष चिंता कधी वाटत नाही. त्याला किंवा तिला कुणी मारेल, लुटेल अशी चिंता नसते. का? याचे कारण आहे संविधान. संविधान कायद्याचे राज्य निर्माण करते. ते कुणालाही, कुठेही, कशाचीही लूट करण्याची अनुमती देत नाही. कुणाच्याही सुरक्षेवर घाला घालण्याची सवलत देत नाही आणि तसा कुणी प्रयत्न केल्यास, संविधानाची जबरदस्त लाठी डोक्यात पडते. म्हणजे पोलीस येतील, पकडून घेऊन जातील, कोठडीत बंद करतील, खटला भरतील आणि न्यायमूर्ती खडी फोडायला पाठवतील. या संविधानाने आम्हाला आपल्या जीवन रक्षणाची, आपल्या संपत्तीच्या रक्षणाची १०० टक्के हमी दिलेली आहे. राज्यघटनेचे २१ वे कलम आपण वाचले, तर ही हमी काय आहे हे लक्षात येईल. इंग्रजांच्या काळात आणि त्या अगोदरच्या मोगलाईत कुणालाही जीविताची शाश्वती नव्हती. आपल्याला विरोध करणाऱ्यांना इंग्रज पकडत असत आणि मन मानेल तशी शिक्षा करीत. मोगलाईत आणि सुलतानीत जीव कधी जाईल आणि संपत्ती कधी लुटली जाईल, याची शाश्वती नव्हती. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मुंबईतून उठून आपण सहजपणे खाली केरळ किंवा वर उत्तराखंड कुठेही आठ-दहा दिवसांच्या प्रवासासाठी जाऊ शकतो. आपल्या सुरक्षेची आपल्याला काही चिंता नसते. हे संवैधानिक सुरक्षेचे कवच आपल्याभोवती २४ तास आणि वर्षाचे ३ दिवस असते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपला स्वभाव संघटीत होण्याचा नाही, संघटीत होऊन राहण्याचा नाही, नियमाने बांधून घेऊन जगण्याचा नाही म्हणून भारतीय माणूस म्हणजे कलह, आपापसात भांडण, मी मोठा की तू मोठा, मी शहाणा की तू शहाणा, मी मोठा नट की तू, मी मोठा राजकीय नेता की तू, असल्या स्पर्धा आपल्याकडे विना स्पॉन्सरर सुरू असतात. अशाने देश उभा राहत नाही. मुस्लीम आक्रमकांनी भारत तुडवला. कारण, आम्ही अनेक छोट्या-छोट्या राज्यांत विभागलो. मी मोठा की तू मोठा म्हणून भांडत बसलो. ज्या घरात फूट असते ते घर टिकत नाही. इंग्रजांनी आपल्याच लोकांचे सैन्य उभे केले, आपल्याच लोकांच्या सैन्याच्या मदतीने मराठेशाही बुडवली, शिखांचे राज्य संपविले, राजपूतांचे राज्य संपवले.

 

आपले संविधान या फुटीवरचा एक जालीम उपाय आहे. आपले संविधान सांगते की, आम्ही भारत आहोत, आम्ही वेगवेगळ्या राज्यांचा संघ नाही, आमचे संघराज्य असले तरी, ते एकाच भारताचे प्रशासकीय भाग आहेत, भारत सोडून त्यांना अस्तित्व नाही. पूर्वी वेगवेगळ्या स्वतंत्र राज्यांत आपण राहिलो, तेव्हा आपले कायदे वेगळे, राज्यपद्धती वेगळी होती. या संविधानाने या सर्व गोष्टी मोडून काढल्या आणि भारताचे एकराज्य निर्माण केले. भारताची एक प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली. सर्व भारतीयांना लागू होईल, असा एक कायदा केला. सर्व भारतीयांच्या रक्षणासाठी एक सैन्यदल उभे केले. सर्व भारतासाठी एक चलन निर्माण केले. आम्ही प्रथम भारतीय, दुसऱ्यांदा भारतीय आणि तिसऱ्यांदाही भारतीय आहोत ही भावना निर्माण केली. गेल्या हजार वर्षांत तिचा अभाव होता. चीनने १९६२ साली भारतावर आक्रमण केले. या आक्रमणात हजारो भारतीय ठार झाले. तेव्हा मी दहावीत होतो. मला आठवते की, तेव्हा चीन विरुद्ध सगळा भारत एकवटून उभा राहिला होता. गल्लीबोळात, जिकडे तिकडे चीनला शिव्या घालण्याचे काम होते. तेव्हा हा गुजराती, हा मारवाडी, हा पंजाबी अशी भाषा कुणी बोलत नव्हते. सगळे भारतीय झाले होते. कवी प्रदीप यांनी एक गीत लिहिले, ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुये है, उनकी जरा याद करो कुर्बानी...’ या गीतातील एका ओळीचा भाव असा आहे, सरहद्दीवर मरणाऱ्यांमध्ये कुणी गुरखा, कुणी मद्रासी, कुणी मराठी, कुणी राजपूत होता. परंतु, मरणारा प्रत्येक वीर भारतीय होता. ही भारतीयत्वाची राजकीय ओळख कोणी निर्माण केली? उत्तर आहे, संविधानाने. १७६१ साली पानिपतला तिसरी लढाई झाली. एक लाख बांगड्या फुटल्या, असे म्हणतात. मरणारे मराठे देशासाठीच लढले. पण तेव्हा तसे बाकीच्यांना वाटले नाही. तेव्हा कुणी ‘प्रदीप’ उभी राहिला नाही की, जो म्हणून गेला असता, ‘पानिपतपर मरनेवाला हर वीर था भारतवासी!’

 

संविधानाने आमच्या डोळ्यांपुढे एका सशक्त राजकीय भारताचे चित्र उभे केले आहे. सांस्कृतिक भारत ही प्राचीन कल्पना आहे. युगानुयुगे तिचा प्रवाह चालू आहे. हे सांस्कृतिक ऐक्य आपल्याला बांधून ठेवते आणि राजकीय दुफळी आम्हाला दुर्बळ करते. आपले संविधान आपले सांस्कृतिक ऐक्य अबाधित ठेवून राजकीय दुफळीला मारून टाकते. यामुळे फुटीरतावादी खलिस्तानी चळवळ भारतात यशस्वी होत नाही. द्रविडीस्तानाच्या चळवळीला आता कुणी वाली राहिलेला नाही. पूर्वांचलातील फुटीरतावाद भारत आता सहन करीत नाही. उद्या नक्षलवाद्यांनासुद्धा हा भारत पायाखाली दाबून टाकेल. ते सामर्थ्य संविधानाने दिलेले आहे. हे सामर्थ्य कशात आहे? हे सामर्थ्य संविधानाने आपल्याला दिलेल्या सार्वभौमात आहे. राज्याची अफाट शक्ती म्हणजे सार्वभौमत्त्व. हे सार्वभौमत्त्व आपल्या राज्यघटनेने कुठल्या घराण्याला दिलेले नाही, लोकसभेला दिलेले नाही, सर्वोच्च न्यायालयाला दिलेले नाही, ते भारतीय जनतेला दिलेले आहे. आपली उद्देशिकाच म्हणते की, ‘आम्ही भारताचे लोक... हे संविधान अधिगृहित करून स्वत:प्रती अर्पण करीत आहोत.’ हे संविधान ‘आपले संविधान’ आहे. आपण कोण आहोत, तर सार्वभौम लोक आहोत. अफाट शक्ती आमच्याकडे आहे. ही शक्ती विभक्तपणात नाही, तर ही शक्ती देशभावनेने प्रेरित झालेल्या लोकांत असते. तिला संघटनशक्ती म्हणतात. आमचे संविधान आम्हाला सर्वांना सांगते की, ती शक्ती तुमच्यात निर्माण व्हायची असेल, तर कायद्याला तुम्ही आपणहून बांधून घ्या. कायद्याचे रक्षण आपणहून करायला शिका. असे केले म्हणजे मग तुमच्यात संघटनभाव निर्माण होईल. मी या देशाचा आहे, हे माझे संविधान आहे, या संविधानाने मला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, संविधानाने मला सार्वभौमत्त्व दिलेले आहे, याचे जर मी पालन केले तर व्यक्तिश: माझे कल्याण होईलच. परंतु, मी एक सामाजिक प्राणी आहे, मी समाजात जगतो, माझ्या समाजाचेदेखील कल्याण होईल. लिखित संविधानाची परंपरा अमेरिकेने सुरू केली. अमेरिकेचे राष्ट्रपिता जॉर्ज वॉश्गिंटन म्हणतात, “The Constitution is the guide which I never will abandon” संविधान गुरू असून या गुरूचा त्याग मी कधी करणार नाही. धर्माविषयी म्हटले जाते की, तुम्ही धर्माचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करील. संविधानाविषयी असेच म्हणता येईल की, तुम्ही संविधानाचे रक्षण करा, संविधान तुमचे रक्षण करील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/