पहाण येथे भरदिवसा घरफोडी

24 Nov 2018 11:50:40

अज्ञात चोरट्यांनी लांबविला 92 हजारांचा ऐवज


पाचोरा : 
 
गुरुवारी सकाळी 9:45 ते दुपारी 12:30 वाजेदरम्यान पाचोरा तालुक्यातील पहाण गावी फिर्यादी दिलीप दगडू पाटील (45) यांच्या राहते घराच्या ओसरीत ठेवलेली चाबी घेऊन अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला.
 
घरात असलेल्या कपाटातील 67 हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे तुकडे ज्यात एक तुकडा 15 ग्रॅमचा व दुसरा तुकडा 7 ग्रॅमचा, 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन बाह्याचे जोड, 5 हजार रुपये किमतीचे लहान मुलांचे बाळ्या असा एकूण 92 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
 
या घटनेबाबत दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी धाव घेऊन भेट दिली.
 
संबंधितांची विचारपूस केली. घटनास्थळी डॉग स्कॉट व फिंगर प्रिंट पथकाने भेट दिली तसेच पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, ए.एस.आय रामदास चौधरी, पोलीस कॉ. सचिन पाटील यांनीही भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
 
तसेच घटनास्थळावरून डॉगने दाखविलेल्या मार्गानुसार पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे तपास करीत आहे.
 
या घरफोडीमुळे पाचोरा पोलीस प्रशासनासमोर अज्ञात चोरट्यांना पकडणे मोठे आव्हान आहे.भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे पहाण गावातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Powered By Sangraha 9.0