शेंदुर्णीचा रथोत्सव : शांततापूर्ण एकात्मभाव आणि उत्साहाचे प्रतीक !

22 Nov 2018 11:45:01
 
 
‘प्रती पंढरपूर हे शेंदुर्णी गाव. रथ उत्सवातील आनंद - भाव.
संत कडोजी महाराजांच्या भक्ती भावातील
त्रिविक्रम भगवंतांचे नाव असे प्रती पंढरपूर शेंदुर्णी हे गाव’
 
 
प्रती पंढरपूर संबोधल्या जाणार्‍या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावातील हा 274 व्या वर्षातील रथोत्सव म्हणजे भाविक भक्तांची मांदियाळी. संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी 1744 रोजी सुरू केलेला हा विठ्ठल- रुक्मिणी रथोत्सव आणि पालखी सोहळा आजतागायत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
 
22 नोवेंबर 2018, गुरुवार रोजी शेंदुर्णी गावात विठू नामाचा गजर,टाळ-मृदंगाचे मंजुळ ध्वनी, संत कडोजी महाराजांच्या नामाचा जयघोष , भगवान त्रिविक्रमाच्या दर्शनाचा लाभ आणि भाविक भक्तांचा जल्लोष या उत्सवाच्या निमित्ताने शेंदुर्णीकरांना पुन्हा अनुभवता येणार आहे.
 
 
 
‘विविध जाती धर्माचे लोक करतात विविध सण साजरा
आम्हा शेंदुर्णीकरांसाठी मात्र रथोत्सवच दिवाळी दसरा’
 
 
 
श्रीक्षेत्र शेंदुर्णीचा रथ उत्सव म्हणजे शेंदुर्णी आणि परिसरातील भाविक भक्तांसाठी एक मोठा सण असतो.सासरी आलेल्या लेकी सुद्धा दिवाळीला माहेरी न येता रथोत्सवाला शेंदुर्णीत येण्यास प्राधान्य देतात. आणि ज्या मुली दिवाळीत माहेरी येतात त्यांची दिवाळी मात्र उत्सवानंतर नंतरच संपते अशी या रथोत्सवाची गोडी येथील माहेर वासियांना आहे.
 
 
संतश्रेष्ठ कडोजी महाराजांच्या वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे साधारणत: 1734 मध्ये भगवंतांनी दिलेल्या दृष्टांतानुसार महाविष्णू त्रिविक्रमाच्या मूर्तीला उकिरड्यातून बाहेर काढण्यात आले आणि महाविष्णू भगवान त्रिविक्रमाच्या दर्शनाचा योग सर्वांना आला, अशी आख्यायिका आहे .
 
तेव्हापासून या शेंदुर्णी नगरीस प्रती पंढरपूर हे म्हटले जाते आहे . संतश्रेष्ठ कडूजी महाराजांनी सुरू केलेल्या रथोत्सवास अधिक उत्कृष्ट करण्याचे कार्य त्यांच्या पुढील पिढीने केले.
 
 
सध्या ह. भ. प. शांताराम महाराज भगत, संत कडोजी महाराज संस्थान गादीवारस व वहिवाटदार हे आठवे कुटुंब प्रमुख म्हणून मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने या रथोत्सवाचे नेतृत्व करीत आहे.
 
देवाचा उत्सव म्हणजेच रथोत्सव या उत्सवात फोटो, तोरण, झुंबर, बॅनर ,सजावट चांगली केली म्हणजे झालं असं नव्हे , नगरप्रदक्षिणा, किर्तन,रोषणाई, सनई-चौघडे ,लाऊड स्पीकर चा आवाज,खूप गर्दी होणे म्हणजे उत्सव चांगला झाला असे नव्हे, तर समाजातील रंजल्या- गांजल्यांपर्यंत जागृती निर्माण करणे, त्यांना आपल्या कर्तृत्वाची व कर्तव्याची जाणीव करुन देणे, धर्माचे योग्य पालन करून सद्गुणांची जोपासना करणे, नियमितपणा वक्तशीरपणा, शिस्त या सर्वच गोष्टींची प्रचिती येणे म्हणजेच यशस्वी रथोत्सव होय .
 
 
असाच यशस्वी रथोत्सव या शेंदुर्णी गावात गादीवारस, ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी, वारकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, महिला भजनी मंडळी, सर्व जाती-धर्माची मंडळी एकत्रित येऊन निरंतर साजरा करीत आहेत.
 
 
एका पाठोपाठ एक 273 रथोत्सव यशस्वी करण्यासाठी येथे व्यवस्थापकीय कौशल्यांचा सातत्याने वापर केलेला दिसतो. नियोजन ,संघटन, समन्वय ,नियंत्रण , मार्गदर्शन आणि नेतृत्व म्हणजेच व्यवस्थापन होय, हीच व्यवस्थापकीय कायेर्र्सुद्धा या उत्सवात योग्य त्यावेळी उपयोगात आणलेली दिसून येतात.
 
 
शेंदुर्णीचा रथोत्सव पहिलातर साधारणता फक्त एकच दिवसाचा सोहळा आपल्यासमोर येतो. पण प्रत्यक्षात एकूण दहा दिवसांचा उत्सव असतो. त्याचे योग्य ते नियोजन आणि अंमलबजावणी करणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचे विद्यमान गादीवारस ह भ प शांताराम महाराज भगत सांगतात मात्र भगवान विष्णु भगवान त्रिविक्रम आणि संत कडोजी महाराजांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने हा रथ उत्सव माऊलींनी चालविलेल्या निर्जीव भिंतीसारखा आपोआपच पूर्णत्वास येतो आणि भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती जनसामान्यांना देऊन जातो, हे सांगण्यास ते विसरत नाहीत.
 
 
2011 च्या जनगणनेनुसार शेंदुर्णी गावाची लोकसंख्या जरी 22,553 असली तरी रथोत्सवाला प्रत्येक वर्षी एक लाखांच्या वर भाविक येतात आणि एवढी मोठी गर्दी असूनही कोणत्याही प्रकारची हिंसक - त्रासदायक घटना न होता हा सोहळा निरंतर चालविला जातो..., याच्यामागे भगवंतांचा आशीर्वाद, भाविकांची श्रद्धा आणि त्या ठिकाणचे व्यवस्थापन यांना श्रेय दिले जाते.
 
 
सोहळ्यासाठी निरनिराळ्या समाजातील लोकांची खूप मोठी मदत होते. संत कडोजी महाराज जरी तेली समाजाचे असले तरी सर्वधर्मसमभाव दिसून येतो.
 
 
भालदार, चोपदार, मशालवाले, अब्दारीवाले, उट टाकणारे, रथावर बसणारे, संरक्षक, टाळकरी माळकरी या सर्व लोकांच्या काम करण्यामुळे हा उत्सव अधिकच रंगत जातो . रथ पाण्याने धुऊन स्वच्छ करणे त्याची पूजा करणे, समाधीजवळ बसणे अशा अनेक कार्यासाठी अनेक वर्षांपासून वंशपरंपरागत हे सर्व लोक उत्साहाने काम करताना आपणास दिसतो.
 
 
कोणालाही स्वतःच्या कामाचे प्रत्येक वर्षी आठवण करून द्यावी लागत नाही. योग्य समन्वयातून हे कार्य सुकर होते . रथ सजवण्याचे काम भागवत मंडळ मोठ्या श्रद्धेने याठिकाणी करताना दिसते.
 
 
यामध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात. वेगवेगळ्या तज्ञांकडून आलेले मार्गदर्शन त्याचा स्वीकार करून रथोत्सव अधिकाधिक रंगतदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
 
 
भाविकांचे मनोरंजन आणि ग्रामीण परंपरा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने रथ उत्सवाच्या काळात साधारणत: एक महिनाभर शेंदुर्णी गावात जत्रा किंवा यात्रा भरते यामध्ये आबालवृद्धांपासून प्रत्येक जण आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करतात. प्रसाद म्हणून रेवडी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे या यात्रेत लागलेल्या चित्रपटगृहांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी लोक करतात सोनरे सोना नदीच्या काठी बसलेली ही जत्रा/ यात्रा लोकांना आकर्षित केल्याशिवाय राहात नाही.
 
 
या रथोत्सवात उच्चारला जाणारा अजून एक शब्द म्हणजे कानगी. कानगी चा अर्थ काहीही न ठरवता देवाला दिलेली देणगी असाही असू शकतो कारण जेव्हा भाविक भक्त रथाचे दर्शन घेतात तेव्हा दर्शन झाल्यानंतर एक गुरुदक्षिणा म्हणून ते रथावर कानगी स्वरूपात देणगी देतात यालाच याठिकाणी कानगी म्हणून संबोधले जाते.
 
 
या जमा झालेल्या कानगी चा वापर रथोत्सवाची तयारीसाठी केला जातो. मनातली इच्छा पूर्ण झाली, देवाला काही साकडे करायचे असेल तर त्या समोर ठेवून भाविक याठिकाणी कांनगी देतांना दिसतात. कानगीच्या मोबदल्यात त्यांना प्रसाद म्हणून नारळ दिले जाते. या नारळाला पण खूप मान या रथोत्सवात आहे.
 
 
 
रथोत्सवाचे नियोजन काही आगळेवेगळे विविध जाती धर्माचे लोक समन्वय करतात  सगळे,
नावलौकिक वाढते शेंदुर्णी गावाचे ,भगवान भक्तीतून फिटते डोळ्यांचे पारणे
 
 
 
अशा डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या व भगवंतांच्या दर्शनाचा साक्षात्कार देणार्‍या या रथोत्सवाच्या तयारीसाठी सर्वच शेंदुर्णीकर सज्ज झालेले आहेत यावर्षी सुद्धा सालाबादप्रमाणे यशस्वी रथोत्सव आयोजनासाठी अशाच वैविध्यपूर्ण व्यवस्थापकीय कौशल्यांचा स्वीकार या सोहळ्याला निश्चितच झालेला दिसेल.
 
 
-प्रा.डॉ.योगिता पांडुरंग चौधरी (भगत)
(अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी ,ता. जामनेर )
Powered By Sangraha 9.0