भुसावळात शिवसैनिकांची गांधीगिरी

22 Nov 2018 11:38:45

शिवसेनेचे अभिनव श्रमदान; राष्ट्रीय महामार्ग सहाचे खड्डे बुजविले


 
भुसावळ : 
 
शिवसैनिकांनी शहरात अभिनव श्रमदान करत सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांच्या नेतृत्वात जीवघेण्या राष्ट्रीय महामार्ग सहाची खड्डे बुजवित शिवसैनिकांनी गांधीगिरी केली.
 
शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून भुसावळ शिवसेनेने प्रत्यक्ष श्रमदान केले. बुधवार, 21 रोजी सकाळी नागपूर- मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेले. त्याचा अनुभव या महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांनीही अनुभवला.
 
महामार्ग चौपदरीकरणाचा आरंभ झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली असून खड्ड्यांचीही संख्या वाढली होती. परंतु, प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील, उपशहरप्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोज तडवी, शिक्षकसेना तालुकाप्रमुख अतुल शेटे, तालुका प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर, शरद जोहरे, निलेश हिवरे, ललित सैतवाल, विक्की चव्हाण यांनी रेल्वे पूल येथील जीवघेण्या रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले.
 
रेल्वे पूल धोकादायक आहे, वाहने सावकाश चालवा असा फलक येथे लावण्यात आलेला आहे. पुलाचे आयुष्य संपले असेल तरी त्यासाठी आतापर्यंत काहीच उपाययोजना होत नसल्याचे शहरप्रमुख बर्‍हाटे यांनी सांगितले.
खड्डेमुक्तीची घोषणा म्हणजे विनोद
 
राज्यातील 93 हजार किलोमीटरचे रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत, त्याची सर्व तयारी सुरू आहे, अशी माहिती 31 ऑक्टोबर 2017 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. हा खरंच एक विनोद होता, असे मत युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी मांडले.
Powered By Sangraha 9.0