भारताचा शौर्यवीर ‘कुलदीप’

    दिनांक  22-Nov-2018   


 


गेल्याच शनिवारी कुलदीप सिंग चांदपुरी यांचे निधन झाले आणि १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या. चांदपुरींचा पराक्रम आणि जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 

१९७१ साली पाकिस्तानी लष्कराने लोंगेवाला येथे हल्ला केला. पण, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्याला तोडीस-तोड उत्तर देत पाकचा संपूर्ण पराभव केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला निष्प्रभ करणारे पराक्रमी नेतृत्व होते ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी यांचे. २२ नोव्हेंबर, १९४० रोजी एका शीख कुटुंबात ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी यांचा जन्म झाला. कुलदीप सिंग यांच्या कुटुंबीयांचा संबंध अविभाजित भारताच्या पंजाबमधील मोंटागोमरीशी होता. कुलदीप यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंबीय बालाचौर येथील चांदपूर रुडकी येथे आले. १९६२ साली कुलदीप यांनी होशियारपूर येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. याचवेळी ते एनसीसी अर्थात नॅशनल कॅडेट कॉर्पसचेदेखील सक्रिय सदस्य होते. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एनसीसीच्या परिक्षेतदेखील यश मिळवले. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, मद्रास येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते १९६३ साली भारतीय लष्करात भरती झाले. विशेष म्हणजे भारतीय लष्कराची सेवा करणाऱ्या आपल्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे ते लष्करी अधिकारी होते.

 

१९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातदेखील कुलदीप सिंग यांनी सहभाग घेतला होता. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन दलात भरती होऊन त्यांनी एका वर्षापर्यंत गाझापट्टी-इजिप्त येथे सेवा दिली. दरम्यान, मध्य प्रदेशातील महू इन्फन्ट्री स्कूलमध्ये त्यांनी इन्स्ट्रक्टरच्या पदावरदेखील दोन वेळा काम केले. इथेच त्यांनी युद्धविषयक प्रशिक्षण दिले. ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचे विशेषत्वाने नाव घेतले जाते, ते १९७१ सालच्या लोंगेवाल युद्धातील शौर्यामुळे. १९७१ साली भारत-पाकिस्तानमधील युद्धाने कळस गाठला. याचवेळी ४ डिसेंबर रोजी तेव्हा लष्करातील मेजर पदावर असलेल्या कुलदीप सिंग चांदपुरी यांना पाकिस्तानी लष्कर मोठ्या संख्येने लोंगेवाल चौकीवर चालून येत असल्याची खबर मिळाली. लोंगेवाल इथल्या भारतीय लष्करी तुकडीचे नेतृत्त्व कुलदीप सिंग यांच्याकडे होते. त्यांच्याकडे ९० आणि गस्तीवरील ३० जवान असे जेमतेम १२० जवानांचे पथक होते. समोरून मात्र पाकिस्तानचे दोन हजारांपेक्षा अधिक जवान भारतद्वेषाच्या आगीत आगेकूच करत होते. मूठभर जवानांसह पाकिस्तानी लष्कराचा सामना करायचा की, माघारी फिरायचे, असा पेच कुलदीप सिंग यांच्यापुढे उभा होता. कारण भारतीय लष्कराकडून अधिकची कुमक मिळण्याची कोणतीही शाश्वती नव्हती.

 
आपल्यापैकी बहुतेकांनी हॉलिवूडचा ‘थ्री हंड्रेड’ हा स्पार्टन योद्ध्यांवरील युद्धपट पाहिला असेल. पण तसाच आणीबाणीचा प्रसंग इथे लोंगेवाला चौकीवरही येऊन ठेपला होता. पण जे होईल ते बेहत्तर, जिंकू किंवा मरू नव्हे तर ‘लढू आणि जिंकू’चाच पवित्रा घेत कुलदीप सिंग चांदपुरी यांनी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी लष्करातील जवान लोंगेवालाजवळ आले आणि त्यांनी रणगाड्यांतून दारूगोळ्यांचा मारा सुरू केला. प्रत्युत्तरासाठी तयारीत असलेल्या भारतीय जवानांनीही रायफल आणि मोर्टारच्या साह्याने गोळीबाराला सुरुवात केली. कुलदीप सिंग चांदपुरी आणि भारतीय जवानांचा मारा एवढा तिखट होता की, पाकच्या नापाक लष्कराला पाय उचलून पुढे येणेही अवघड झाले. लोंगेवालात मेजर कुलदीप सिंग आणि त्यांच्या १२० जणांच्या तुकडीने पाकच्या दोन हजार जवानांना आणि ४० रणगाड्यांना रोखून धरले. रात्र संपता संपता भारतीय लष्कराने चांदपुरींच्या नेतृत्वात पाकच्या ३४ रणगाड्यांना उद्ध्वस्त केले. दुसऱ्या महायुद्धानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रणगाडे उद्ध्वस्त होण्याचा हा एक विक्रमच होता. याशिवाय पाकिस्तानचे ५०० पेक्षा अधिक जवान जखमी झाले तर २०० जवानांना यमसदनी धाडण्यात यश मिळवले. अशाप्रकारे कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने पाकिस्तानाच्या कुटील कारस्थानाच्या चिंधड्या उडवल्या, त्याचबरोबर ८ किलोमीटरपर्यंत आत कूचदेखील केले. अर्थातच भारताच्या या विजयाचे शिल्पकार होते ते मेजर कुलदीप सिंग चांदपुरी. लोंगेवालातील अतुलनीय शौर्याचा सन्मान करत भारत सरकारने पुढे मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांना महावीरचक्र पदक देऊन गौरविले. नंतर त्यांना मेजर पदावरून ब्रिगेडियर म्हणून पदोन्नतीही मिळाली.
 

ब्रिगेडियर पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची चंदीगड नगरपालिकेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली. २००६ ते २०११ पर्यंत ते या पदावर राहिले. याच काळात त्यांनी नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्या म्हणून आणि खेळ-क्रीडा आदी मुद्द्यांवर आवाज उठवला. पण, कुलदीप सिंह चांदपुरी यांना आजही ओळखले जाते, ते त्यांच्या पाकिस्तानविरोधातील लोंगेवाला युद्धातील धडाकेबाज कामगिरीमुळे. जे. पी. दत्ता यांचा १९९७ सालचाबॉर्डरचित्रपट याच युद्धावर आधारित होता. भारतमातेच्या अशा बहादुर सुपुत्राचे गेल्या शनिवारी निधन झाले आणि देशाने एक सच्चा देशभक्त गमावला. ईश्वर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या आत्म्याला सद्गती देवो, ही प्रार्थना... 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/