शौर्याचे स्मरण-संवर्धन - दुर्गवीर प्रतिष्ठानचे उल्लेखनीय कार्य

    दिनांक  21-Nov-2018   
 
 

महाराष्ट्राच्या शूरवीर अस्मितेचे प्रतिक असलेले गडकिल्ले. या गडकिल्ल्यांची अवस्था दुर्दैवीच म्हणावी लागेल. कधीकाळी शौर्याने पवित्र झालेल्या किल्ल्यांना आता अतिक्रमण, अस्वच्छता, गुन्हेगारी यामुळे अतिशय भग्नावस्था प्राप्त झाली आहे. या गडांचे संवर्धन कोण करणार? या शौर्यशाली अस्मितेचे स्मरण कोण करणार? बाहेरून कोणी येणार नाही. हाच विचार करून दुर्गवीर संस्था गडकिल्ले संवर्धन आणि परिसरातील जनतेच्या विकासासाठी कार्य करत आहे.

 

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

 

या राजमुद्रेचा अर्थच खूप काही सांगून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा तयार करताना लोककल्याण, स्वराज्याचा विस्तार या गोष्टींचा विचार केला गेला. शिवरायांचा जन्म झाला तोच मुळी खितपत पडलेल्या मराठी मनात आत्मसन्मानाची, स्वराज्याची मशाल पेटविण्यासाठी. संपूर्ण जगाला राजा कसा असावा आणि स्वराज्य कसे असावे, याचा आदर्श घालून देणारे शिवराय... शिवरायांनी स्वराज्य घडविले, ते स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले मावळे आणि गडकोट यांच्या जोरावर. परंतु, आज हे गडकोट अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. आजवर शेकडो वर्ष ऊनपाऊस झेलत समर्थपणे उभे असलेले हे गडकोट आता आपल्याला साद देताहेत त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्रात अंदाजे ३५०-४०० किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचा एक वेगळा इतिहास आहे. महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या जडणघडणीत गडकिल्ल्यांना प्रथम स्थान दिले. परकीय आक्रमणांपासून वाचवून आपल्या स्वराज्याचे रक्षण करण्याच्या कार्यात शिवरायांना नेटाने साथ दिली ती त्यांचे अतूट मावळे आणि अभेद्य गडदुर्गांनी. आज हे गडदुर्ग अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत. जे गडकोटहर हर महादेवच्या गजरात इतिहास गाजवत होते, ते आज केविलवाणी आर्त हाक देत आहेत. या गडकोटांची आर्त हाक ऐकून त्यांच्या संवर्धनासाठी २००८ पासून दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, बीड, कोल्हापूर, बेळगाव येथील तरुण-तरुणी झटत आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक संतोष हासुरकर सांगत होते. मूळ गाव बेळगाव असलेले आणि आता मुंबईमधील सांताक्रुज येथे वास्तव्य असलेले संतोष हे दुर्ग, गडकिल्ल्यांच्या नगरीतले ओळखीचे नाव. 

 
 

पुढे संतोष यांच्याशी चर्चा केल्यानंतर माहिती मिळाली की, दर शनिवार-रविवारी इतर सुट्ट्यांच्या दिवशी हे दुर्गवीर एकत्र येतात. आठवडाभर काम/कॉलेजच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाला की, दुर्गवीर गडांच्या मोहिमेवर निघतात. दुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान मोहीम आणि दुर्गभ्रमंती मोहीमही असते. दुर्गवीर नुसते दुर्गांच्या संवर्धननाचेच काम करते असे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशील संस्कृतीचे स्मरण करण्यासाठी विविध उपक्रमही राबवते. शिवजयंती असो वा शिवराज्याभिषेक, गुढीपाडवा असो वा दसरा, दुर्गवीर तितक्याच उत्साहाने मराठमोळ्या पद्धतीने प्रत्येक सण दुर्गवीर साजरा करतात. शहरीकरणाच्या रेट्यात दुर्ग विस्मृतीत जावू नयेत म्हणून संस्थेने काही गडांच्या जवळच्या मार्गावर गडांची माहिती देणारे स्थान दर्शवणारे दिशादर्शक फलकही लावले आहेत. महाराष्ट्रातील मानगड, सुरगड, मृगगड- जिल्हा रायगड, साल्हेर, मुल्हेर- जिल्हा नाशिक, सामानगड- कोल्हापूर, कालानंदीगड, महिपालगड- बेळगाव, वल्लभगड- संकेश्वर या किल्ल्यांजवळ अशा प्रकारचे फलक लावले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक गडावर, त्या परिसरातील रस्त्यांवर असावेत, असा दुर्गवीरचा मानस आहे. शौर्याची प्रतिकं असलेल्या गडावर स्वच्छता करणे त्यासोबतच पाण्याच्या टाकीचीी सफाई करणे हे काम ही संस्था करते. सुरगड, मानगड, मृगगड, भिवगड, वल्लभगड, वर्धनगड, साल्हेर येथील पायवाटा, मुख्य दरवाजा, पाण्याची टाकी, इतर ऐतिहासिक वास्तू यांची साफसफाई संगोपन केले जाते. या गडांवर दरवर्षी दसरा, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन असे आणि विविध पारंपरिक सण साजरे करण्यात येतात.

 
 

गडांच्या संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून संस्था गडाशेजारील पंचक्रोशीमध्ये, शहरांमध्ये गडाच्या संदर्भातील चित्रफित दाखविणे, फोटो प्रदर्शन यांसारखे कार्यक्रम करते. दरवर्षी जून-जुलै महिन्यात वनवासी दुर्गम भागातील मुलांना स्कूल कीट इतर शालोपयोगी वस्तू वाटप करण्यात येते. तसेच दिवाळीला सोलर दिवे, पाणी शुद्धीकरण यंत्र, ताटांचा संच याचे वाटप दरवर्षी महाराष्ट्रातील विविध दुर्गम भागात करण्यात येते. दुर्गम भागात जिथे वनवासी बांधवांच्या किमान गरजाही भागल्या जात नाहीत. अशा परिसरात दुर्गवीर सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असते. शिक्षण आणि आरोग्य या परिसरातील या मुख्य समस्या. हे प्रश्न सोडवण्यासाठी दुर्गवीर प्रयत्नशील आहे. त्यासाठी सातत्याने आदिवासी बांधवाशी संपर्क करणे,संवाद साधणे आणि त्यांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन, मदत करणे हे सुरूच असते. यातून प्रत्येक बालकामध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करण्याचे मोलाचे कार्य दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते. गडावरील मंदिरे हा एक स्वतंत्र विषय आहे. गडावरील पुरातन मंदिरांची डागडुजी, मूळ स्वरूप कायम राखून बांधणी करण्यात येते. गडांवरील अशी भग्न मंदिरे उभारून त्यांचे जुने वैभव परत मिळवून देण्याचा दुर्गवीरचा संकल्प आहे.

 

दुर्गवीर सहकाऱ्यांबाबत सांगताना संतोष म्हणतात, ”दुर्गवीर या कार्यासाठी आपले शिक्षण, नोकरी सांभाळून आठवड्यातील दिवस या कार्यासाठी देतात. आजवर कित्येक तरुण-तरुणी या दुर्गवीरमध्ये सामील झाले आणि या शिवकार्यात त्यांनी मिळविले ते मानसिक समाधान. तुमच्या आयुष्यातील एक दिवस या संवर्धनाच्या कार्यात मोलाची भूमिका पार पाडू शकतो. तुम्हाला गडकिल्ल्यांची भटकंती करायची आहे, त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, तुमच्या परिसरातील एखाद्या गडाची माहिती द्यायची असेल तर आमच्यासोबत या संपूर्ण महाराष्ट्रातील गडांची भटकंती आणि संवर्धन करूया. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, शिवजयंती अशा आणि अनेक पारंपरिक सणांना हजेरी लावून आपली संस्कृती टिकवूया.”


 

संतोष यांना दुर्गवीर संस्था स्थापन का करावीशी वाटली? यावर ते म्हणाले की, गडकिल्ले आणि इतिहास यांच्याविषयीची आवड बालपणापासूनच होती. शालेय सहलींच्या दरम्यान गडकिल्ल्यांबाबत निर्माण झालेली आवड पुढे जात गडसंवर्धनाच्या कर्तव्यात बदलली.” संतोष यांना समाजसेवेचे बाळकडू वडील गुंडू संतू हसुरकर यांच्याकडून मिळाल्याने या कार्याबाबत आपोआप रुची निर्माण झाली. त्यांचे वडील बेळगाव सीमाभागातील समाजसेवक होते. गोरगरिबांना प्रत्येक गोष्टीत मदत करून त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करायचे. हाच समाजकार्याचा वारसा पुढे चालवावा संतोष हासुरकर करीत आहेत. यातूनच २००८ साली दुर्गवीर प्रतिष्ठान नावाच्या संस्थेची स्थापना केली. वैयक्तिक आवड म्हणून ते गडकिल्ले पाहायला जात. पुढे सोबती भेटत गेले. अजित राणे,नितीन पाटोळे यांच्यासह त्यांना समाजाच्या विविध स्तरारवरच्या तरूणाईंने गडकिल्ले संवर्धनाबाबत मनापासून आपणहून सहकार्य दिले. यातूनच मग संतोष यांचा वैयक्तिक स्तरावर गडकिल्ले पाहायचा संकल्प नंतर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या श्रमदान मोहिमांमध्ये बदलला. प्रत्येक रविवार किंवा सुट्टीचा दिवस उजाडला की, कुदळ फावड घेऊन सोबत येतील त्यांना घेऊन श्रमदान करायला त्यांना सुरुवात झाली. अर्थात ही आपली आवड असल्याने या दुर्ग सफाईला कोणतेही अनुदान नाही की आर्थिक मदत मिळाली नाही. सुरवातील या दुर्गवीरांनी स्वखर्चातून बेभान होऊन रायगड जिल्ह्यातील मानगडापासून प्रवास सुरू केला. यामध्ये अडचणी आल्याच. या गडाची स्वच्छता करण्याचे तुमचे प्रयोजन काय? यापासून ते तरूणांनी समाजबिमाजाचा ध्यास घेऊन इतिहास जपणे हे शक्य तरी आहे का असे अनेक प्रश्न दुर्गवीरांना विचारले गेले. पण दुर्गवीर थकले नाहीत. उलट प्रत्येक प्रश्नाला, समस्येला समन्वयाने उत्तर देत, सहकार्याची भावना ठेवत दुर्गवीर संस्थेने आपले कार्य कायम ठेवले. त्यामुळे आज महाराष्ट्रभर - गडावर दुर्गवीर संस्थेचे एकाच वेळी स्थानिकांच्या सहकार्याने गडसंवर्धन सुरू आहे.

 

 

दुर्गवीर प्रतिष्ठानला दुर्गसंवर्धन सामाजिक उपक्रमांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गौरविण्यात आले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांना गौरविण्यात आलेल्या पुरस्कारांची यादी :
 

· सह्याद्री मित्र स्नेहसंमेलनात दुर्गसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानचिन्ह, रोटरी क्लब पुणेतर्फे दुर्गसंवर्धन सामाजिक उपक्रमांबद्दल सन्मानचिन्ह

 

· स्नेहांकुर पुणेतर्फे शैक्षणिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मानचिन्ह

 

· गडसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिरीमित्र संमेलन शरद ओवळेकर विशेष सन्मान

 

· सामाजिक क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल नवक्षितीज प्रतिष्ठानतर्फे विशेष पुरस्कार

 

· राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळतर्फे शिवसंत पुरस्कार

 

· सामाजिक शैक्षणिक जनजागृतीसाठी मुकेश प्रतिष्ठानतर्फे विशेष सन्मान

 

· बेळगाव सीमाभागातील गडकिल्ले सामाजिक उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खानापूर तालुका रहिवाशी संघटनेतर्फे विशेष सन्मान

 

· शिवकार्य गडकोट मोहीम नाशिकतर्फे दुर्गसंवर्धन क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल सन्मान

 

· महाराष्ट्र संस्कृती संवर्धन करण्याच्या कामागिरीबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त विशेष सन्मान

 

· युवा सेनेतर्फे युवा गौरव पुरस्कार

 

· संस्कृति प्रतिष्ठानतर्फे विशेष सन्मान

 

· ध्येय स्फूर्ती प्रतिष्ठान शेलारगावतर्फे सन्मानचिन्ह

 

· विविध सामाजिक कार्याबद्दल श्री साई सेवा मंडळतर्फे विशेष सन्मान

 

· जागतिक कृषी महोत्सवात साई समर्थ सेवा प्रतिष्ठानतर्फे दुर्गसंवर्धन सामाजिक कार्यासाठी सन्मान

 

·

बघतोस काय मुजरा करया दुर्गसंवर्धन विषयावरील बहुचर्चित मराठी सिनेमात दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मोहिमांचा छायचित्रांद्वारे विशेष उल्लेख. खास सन्मानचिन्ह सत्कार या आणि अशा अगणित पुरस्कार सत्कारांच्या माध्यमातून तसेच विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांच्या विशेष मुलाखती बातम्यांमधून गौरव करण्यात आला. यावर संतोष म्हणतात, ”एक संस्थापक/अध्यक्ष म्हणून जरी माझा सन्मान होत असला तरी हा प्रत्येक पुरस्कार सन्मान हा दुर्गसंवर्धन सामाजिक उपक्रमात सोबत असलेल्या प्रत्येक हाताचा आणि प्रत्येक दुर्गवीर सभासदाचा आहे.”
 

(संपर्क - संतोष हासुरकर ९८३३४५८१५१)