देशात अपघातांची दुर्दैवी मालिका; १६ जणांचा मृत्यू

21 Nov 2018 13:51:33


 


मुंबई : देशभरात आज अपघातांची दुर्दैवी मालिका पाहायला मिळाली. विविध अपघातांमध्ये १६ पेक्षा अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश आहे तर हरियाणातील ५ जणांचा समावेश आहे. नाशिक येथील येवला-मनमाड महामार्गावर अनकाई बारी येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे सर्व अहमदनगर येथील रहिवासी होते. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

 

कर्नाटकातील अपघातात पुण्यातील ५ जण ठार

 

दुसऱ्या एका दुर्घटनेमध्ये पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील विजापूर (विजयपूर) जिल्ह्यात बोलेरो गाडी आणि ट्रक यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला. यात बोलेरोतील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातातील मृत हे पुण्यामधील असून ते महामार्गावरील कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

भरधाव कारने ५ जणांना चिरडले

 

हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यामध्ये आणखी एक भीषण अपघात घडला आहे. येथील जिंदाल पुलावर रात्रीच्या सुमारास फुटपाथवर झोपलेल्या मजूरांना एका भरधाव कारने चिरडले. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत पावलेले बहुतेक मजूर हे बिहारचे रहिवासी आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0