’अपू’ची विश्वभरारी...

    दिनांक  02-Nov-2018   


भारतीयांना आपली संस्कृती, इतिहास, भाषा या सगळ्याचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच अभिमान भारतीय सिनेमाचाही... दादासाहेब फाळकेंनी सुरू केलेली ही ‘सिनेमा’ नामक प्रथा आजही तेवढ्याच जोमात सुरू आहे. पण, मागे वळून पाहिल्यास आपल्या सहज ध्यानात येते की, सिनेमाची परिभाषा बदलली आहे.

 
 

याचा प्रत्यय तेव्हा येतो, जेव्हा ‘बीबीसी’ने इंग्रजी वगळता जगभरातील विदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांची यादी घोषित केली. ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी जगभरातील सर्व समीक्षकांकडून त्यांची मते मागविण्यात आली आणि प्रेक्षकांकडूनही कौल घेण्यात आला आणि भारतीयांच्या सिनेमाप्रेमाला काहीसा धक्का बसावा, असा निकाल जाहीर झाला. या १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये एकही हिंदी भाषिक सिनेमा नाही, याउलट ’श्वास’ हा मराठी सिनेमा काही अंशी या यादीच्या जवळ पोहोचला होता, पण १०० चित्रपटांमध्ये ‘श्वास’ला काही स्थान मिळाले नाही. सिनेमाविश्वात १०० कोटींचा व्यवसाय करणारे सध्या आठवड्याला किमान पाच सिनेमे आणि महिन्यात वीस एक सिनेमे तरी असतातच. तरी हे सिनेमे सर्वोत्कृष्ट आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा सिनेमा समीक्षकांना पडला. पण या सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे, या १०० चित्रपटांच्या यादीत ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांचा ’पाथेर पांचाली’ हा सिनेमा १५व्या स्थानी आहे. जगभरातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांमध्ये आजही सत्यजित रे यांचे नाव घेतले जाते. ’पाथेर पांचाली’ हा तर त्यांच्या पदार्पणाचा सिनेमा. १९५५ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही जागतिक स्तरावर गाजतोय. विभूतीभूषण बंडोपाध्येय यांच्या ’विलडंगसरोमन’ या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. आजही अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये सत्यजित रे यांच्या अनोख्या दिग्दर्शनशैलीचा अभ्यास केला जातो. बंगाली भाषेतला हा सिनेमा स्वातंत्र्यानंतरच्या भारतावर भाष्य करणारा आहे. ‘बीबीसी’च्या परीक्षकांच्या मते, भारतीय संस्कृती ही एवढी अफाट आहे की, तिला सिनेमाच्या स्वरूपात दाखवणे फक्त सत्यजित रे यांनाच जमले. ’पाथेर पांचाली’ हा सत्यजित रे यांचा स्वप्नपूर्ती करणारा हा सिनेमा ’अपू’ नावाच्या एका बंगाली मुलाच्या अगदी लहानमोठ्या गरजांवर भाष्य करणारा... म्हणजे देव देतं आणि कर्म नेतं असं काहीसं अपूचं आयुष्य रे यांनी या सिनेमात दाखवलंय. १९५५ साली या सिनेमाची निर्मिती करत असताना, रे यांनी हा सिनेमा अर्धाच बनवला आणि तो तसाच प्रदर्शित झाला. त्यानंतर रे यांनी हा सिनेमा पूर्ण केला आणि दोन भागांत प्रदर्शित केला, तीच आहे ‘अपू ट्रायोलॉजी.’

 
 

आज ४३ देशांमधून २०० हून अधिक नामांकन मिळालेल्या सिनेमांमध्ये ’पाथेर पांचाली’ हा सिनेमा १५व्या स्थानावर आहे. तब्बल १५ आठवडे हा सिनेमा हाऊसफुल चालला आणि केवळ कोलकाताच नाही तर, ‘कान्स’पर्यंत हा सिनेमा पोहोचला आणि ‘कान्स चित्रपट महोत्सवा’त दाखवला जाणारा ’पाथेर पांचाली’ हा पहिला भारतीय सिनेमा ठरला. या सगळ्या गोष्टी अगदी अभिमानास्पद असल्या तरी, भारतात तयार होणारे सिनेमे हे जगातील इतर भाषिक सिनेमांपेक्षा नेहमीच मागे राहिले आहेत. याचे कारण कदाचित सिनेमाचे सध्या झालेले बाजारीकरण असू शकते. म्हणजे ‘बीबीसी’ने जाहीर केलेल्या या १०० सिनेमांच्या यादीत २७ सिनेमे हे फ्रान्समधील आहेत, याचे प्रमुख कारण म्हणजे फ्रेंच लोक आपल्या भाषेतील सिनेमांशिवाय अन्य सिनेमे पाहणे टाळतात आणि दुसरं कारण म्हणजे, सिनेमांचा दर्जा. यात दुसरा क्रमांक लागतो तो जपानी सिनेमाचा. या १०० चित्रपटांत जपानी भाषेतला ’सेव्हन सॅमुराय’ हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. या तुलनेत भारतीय सिनेमे हे केवळ करमणुकीचेच साधन राहिले आहे की काय, अशी भीती वाटू लागते. त्यातच मग ’पाथेर पांचाली’ सारखे सहा दशकांआधीचे सिनेमे जागतिक पातळीवर आपली लाज राखत असले तरी, भारतीय दिग्दर्शकांना खरंतर सिनेमाच्या दर्जाकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे झाले आहे. तरी ’अपू’ची ही विश्वभरारी भारतीय सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवणारी...

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/