नक्षल्यांची नोटबदली

    दिनांक  02-Nov-2018   


क्रांतीचे, गोरगरीबांच्या हिताचे नाव घेऊन स्वतःच्या जीवनधारेला सत्तासधन कसे बनवावे, यामध्ये नंबर एक क्रमांकावर कोण असतील तर ते नक्षलवादी. हे लोक कामधंदे तर काही करत नाहीत. गाववाल्यांना शस्त्राच्या बळावर घाबरवून, त्यांच्याकडून बळजबरीने पैसे वसुलायचे, तिथल्या उद्योजकांना, व्यावसायिकांना इतकेच काय सरकारी विकासकाम करणार्‍या कंत्राटदारांकडूनही हप्ता बांधायचा, हे त्यांचे आर्थिक स्रोत. अर्थात, हप्ते गोळा करण्याची हद्द गावापुरतीच मर्यादित राहत नाही, ही गोष्ट अलहिदा. तर नक्षलवाद्यांचा हप्ता गोळा करण्याची आठवण झाली, कारण नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कारण, हप्ते गोळा करून संपत्ती जमवायचे, देशद्रोही कृत्यासाठी त्याचे विकेंद्रीकरण करायचे, हे त्यांचे उद्योग. पण, नोटाबंदी झाल्यामुळे या नक्षल्यांकडे जमा असलेली रक्कम एकहाती शून्य किमतीवर आली. हिंसा करून गुन्हेगारीचे गोरखधंदे करून मोठ्या प्रमाणात जमवलेल्या पैशांवरच तर त्यांची भिस्त होती, पण ते पैसे नोटाबंदीनंतर कागदाचे तुकडेच झाले. बरं, नोटाबंदीनंतर सरकारने या पैशांच्या बदलीचीही सुविधा दिली होती. तमाम भारतीय जनतेने त्यात रावरंक सारेच आले. या सार्‍यांनी रडतखडत का होईना, पण पैसे बदलून घेतले होते. हातावरच पोट असणार्‍यांचा तर प्रश्नच नव्हता, त्यांच्याकडे मोठ्या रकमेच्या नोटा असणे तसे शक्य नव्हते. प्रश्न होता तो धनदांडग्यांचा, त्यातही त्या धनदांडग्यांचा ज्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता होती, ज्यांनी काळ्या पद्धतीने तो पैसा जमवला होता त्यांचा. कालपर्यंत ही संपत्ती त्यांनी जिवापाड जपली, मात्र नोटाबंदीच्या एका फटक्यात या संपत्तीचे होत्याचे नव्हते झाले. हे पैसे ते उजळ माथ्याने वापरूही शकत नव्हते की, स्वतःजवळ नुसतेच कागदाचे ओझे म्हणून वागवूही शकत नव्हते. त्यामुळे या श्रेणीत येणार्‍या नक्षल्यांना काय करू आणि काय नको झाले.आजपर्यंत लोकांकडून जे पैसे लुबाडत होते, नोटाबंदीनंतर त्यांना लोकांना हे पैसे परत देऊन त्याबदली नवीन पैसे घेण्याची शक्कल लढवावी लागली. त्यातून नक्षल्यांच्या बेहिशोबी अवैध पैशांचे भांडे फुटत गेले. पैशाअभावी त्यांच्या नाड्या आवळल्या गेल्या. नोटाबंदीमुळे काय झाले, काय नाही यावर प्रबंधही तयार होईल. पण नोटाबंदीमुळे नक्षल्यांचे कंबरडे मोडले, हा विषय अग्रणी असेल हे नक्की!

 

त्यांचे भांडे फुटले...

 

एटापल्ली तालुक्यातील नरानूर येथील पोलीस पाटील मोड्डी गावडे यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. हत्या पण कशी तर त्यांची नेहमीची पद्धत. 30 ते 40 सशस्त्र नक्षली मोड्डी गावडेच्या घरी गेले. त्यांना घरातून बाहेर जंगलात नेले, तिथे त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. वर त्यांच्या निष्प्राण देहाजवळ चिठ्ठी खरडून ठेवली की, मोड्डी हे कित्येक वर्षे पोलिसांचे खबरी होते. त्यामुळे ही हत्या करण्यात आली. तसेच या हत्येला उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांना जबाबदार धरावे. वर वर पाहता, या चिठ्ठीमध्ये नक्षलवाद्यांची पारंपरिक कार्यपद्धती दिसते. पण, गावातल्या लोकांचे मात्र याबाबत वेगळेच मत आहे. बहुसंख्यांचे म्हणणे आहे की, या मोड्डी गावडेचे आणि स्थानिक नक्षली म्होरक्यांचे संबंध चांगलेच होते. नोटाबंदी झाल्यानंतर या म्होरक्यांसाठीही गुन्हेगारी पद्घतीने जमवलेला पैसा डोकेदुखीचा विषय होता. हा काळा पैसा मृतवत झाला होता. त्याला जिवंत करण्यासाठी हा पैसा बाजारात बदलणे गरजेचे होते. काही लोकांचे म्हणणे आहे की, या कामी मोड्डी गावडेने मदत केली. तालुक्यातल्या काही छोट्या मोठ्या उद्योगव्यावसायिकांना हाताशी घेऊन त्याने नोटबदलीचा गेम केला. अर्थात, यातही कमिशनचे तत्त्व होतेच. अमुक एक पैसे बदलून दिले की, अमुक एक टक्का कमिशन मिळेल. आपल्याला काय कमिशन मिळण्याशी मतलब म्हणून काहींनी हे कामही केले. पण याच दरम्यान सरकारने नक्षल्यांविरुद्घ प्रचंड कारवाई सुरू केली. कित्येक नक्षली म्होरक्यांचा पोलीस कारवाईमध्ये खात्मा झाला. यामध्ये नोटबदली करायला देणारेही होतेच. त्यामुळे नोटबदलीमध्ये मध्यस्थी करणार्‍यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यांनी बदललेले पैसे दुमजली घरे, वाहने यावर खर्च करून टाकले. इथपर्यंत कहाणी सरळ होती. पण, ज्या वाचलेल्या नक्षल्यांना मोड्डी, नोटबदली कनेक्शन माहिती होते, त्यांनी मोड्डीकडे बदललेल्या नोटांसाठी तगादा लावला. पण, नोटाबंदीनंतर बदलून मिळालेले पैसे तर संबंधित लोकांनी उडवलेले. त्यामुळे मोड्डी पैसे मिळवू शकले नाहीत. त्यामुळे पैशाअभावी कंबरडे मोडलेल्या नक्षल्यांनी मोड्डी गावडेची चिडून हत्या केली. यामध्ये त्यांनी कोणती क्रांती केली, ते त्यांनाच माहिती. पण, या घटनेने नक्षल्यांना नोटाबंदीने जायबंदी केले, हे जाणवतेच. ही घटना तर हिमनगाचे टोक आहे. पण यामुळे नक्षल्यांचे भांडे फुटले, हे नक्की..

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/