व्यसनांचे धोकादायक ‘पॅड’

    दिनांक  19-Nov-2018   जगभरात व्यसनांविरोधात काम करणारी अनेक माणसे व संस्था-संघटना कार्यरत आहेत. सरकारी पातळीवरही नेहमी व्यसनांविरोधात जनजागृती करण्यात येते. पण, आता तर नशेड्यांनी आपल्या कल्पनेच्याही पलीकडल्या गोष्टींचा वापर नशेसाठी केल्याचे दिसते.


आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यसनांच्या आहारी गेलेले लाखो नशेडी आपल्याला आजूबाजूला दिसतात. दिवसरात्र नशेच्या कैफात धुंदावलेल्या कितीतरी व्यसनबहाद्दरांना तर ना स्वतःची भ्रांत असते ना जगाची. जोपर्यंत नशेचा अंमल मन आणि मेंदूवर चालतो, तोपर्यंत सगळ्याच सुख-दुःखांपासून दूर कुठल्यातरी राज्यात ही मंडळी जगत असतात आणि अंमल सुटला की, पुन्हा नशा करण्यासाठी आसुसतात. आतापर्यंत चरस, गांजा, अफू, ब्राऊन शुगर, हेरॉईन, ड्रग्स, दारू, तंबाखू, गुटखा, मावा, हुक्का, सिगारेट, बिडीसारख्या घातक पदार्थांनी पिढ्याच्या पिढ्या बरबाद केल्या. दरम्यानच्या काळात भारतासह जगभरात स्नेक बाईट, व्हाईटनर, औषधांच्या गोळ्या, पातळ औषधांची नशा करण्याचेही फॅड आले. अजूनही या पदार्थांच्या नशेत चूर झालेल्यांची कमतरता नाही. स्वतःची आणि कुटुंबीयांची पर्वा न करता सर्वांनाच देशोधडीला लावणाऱ्या या व्यसनांच्या प्रकारात नेहमीच भर पडत जाते. नशेडी दरवेळेस नवनवीन पदार्थ नशेसाठी धुंडाळतात आणि सारे काही विसरून जाण्याचा प्रयत्न करतात. पण, आता इंडोनेशियात नशेचा एक वेगळाच आणि धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्यामुळे तिथल्या जनमानसात एकच कल्लोळ माजला आहे. कसली नशा आहे ही?

 

मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात वयाच्या एका टप्प्यानंतर सुरू होणारी अगदी शारीरिक प्रक्रिया. स्त्रियांनी आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीत मासिक पाळीमुळे निर्माण होणारी अस्वच्छता दूर करत कापडाच्या साध्या तुकड्यांपासून ते सॅनिटरी पॅड आणि आता तर टॅम्पून्सपर्यंत नवनवी साधने विकसित केली. पण, आता याच सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पून्सचा वापर इंडोनेशियातील नवी पिढी चक्क व्यसनांच्या नशेत बुडण्यासाठी करताना आढळली, जे अतिशय धोकादायक ठरू शकते. कारण, यात दुकानातून खरेदी केलेल्या नव्या आणि वापरलेल्या सॅनिटरी पॅड्स, टॅम्पून्सचादेखील वापर केलाच जातोय! विशेष म्हणजे, या दोन्ही घटकांची स्वस्त आणि कायदेशीर उपलब्धता असल्याने त्यावर कोणी प्रतिबंधही घालू शकत नाही. इंडोनेशियातील ‘जकार्ता पोस्ट,’ ‘जावा पोस,’ ‘पोस बेलिटुंगया स्थानिक वृत्तपत्रांत यासंदर्भातील रिपोर्ताज सातत्याने प्रकाशित होत आहेत. इंडोनेशियाच्या नॅशनल ड्रग्ज एजन्सीचे (बीएनएन) अध्यक्ष सीनियर कमांडर सुप्रिनार्टो याबाबत म्हणाले की, “तरुण वर्ग नशेसाठी ज्या गोष्टीचा वापर करत आहे, ती कायदेशीर आहे, पण तिला ज्या उद्देशाने तयार करण्यात आले, त्यासाठी वापरले जात नसून ड्रग्ससारखे वापरले जाते.” पुढे ते म्हणाले की, “सॅनिटरी पॅड्स मग तो नवा असो वा वापरलेला, त्याला नशेडी पाण्यात उकळतात व नंतर ते पाणी पितात. ज्यामुळे त्यांना नशेचा आणि बेधुंदीचा अनुभव येतो.”

 

अविश्वसनीय पण वास्तवात घडत असलेल्या या घटनांमुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात शिसारी आल्याशिवाय राहणार नाही. कडू स्वादाचे हे किळसवाणे व्यसन करण्यामागे कारणीभूत आहे ते यात असलेले क्लोरीन. २०१६ पासून इंडोनेशियात हा भयंकर ट्रेंड सुरू झाला, पण आता इथल्या सरकारने याविरोधात काम सुरू केले आहे. अशा प्रकारची नशा करणाऱ्या कितीतरी लोकांना अटक करण्यात आली. पण तरीही ‘असले’ रोखण्यासाठी इंडोनेशियात अजूनही कायदा केलेला नाही. दरम्यान, इथले सरकार सॅनिटरी पॅड्स व टॅम्पून्समध्ये नेमकी कोणती रसायने वापरली जातात, त्याची चौकशीही करण्यात येणार आहे. दुसरीकडे या व्यसनाच्या नशेत गुंग झालेली बहुतांश मुले वंचित समुदायातील आणि काही काही तर रस्त्यावर राहणारीदेखील आहेत. सोबतच चित्रविचित्र प्रकारच्या व्यसनांच्या शोधासाठी, निर्मितीसाठी इंटरनेटचाही हल्ली सर्रास वापर केला जातो. इंटरनेटवरूनच मुलांना वेगवेगळ्या व्यसनांची माहिती मिळते व ते त्याच्या आहारी जातात.

 

‘इंडोनेशियन कमिटी ऑन चाइल्ड प्रोटेक्शन’चे कमिशनर असलेल्या सिट्टी हिकमावट्टींनी याबाबत सांगितले की, “बहुतांश मुले स्मार्ट आहेत, इंटरनेटच्या मदतीने ते व्यसनांचे अनेकानेक प्रकार व मिश्रण शोधतात व त्यानुसार त्याचा वापरही करतात. इथूनच व्यसनांचा धोका वाढतो. कारण आपले, कुटुंबीयांचे वा शिक्षकांचे त्यावर प्रत्येकवेळी नियंत्रण वा लक्ष असेलच असे नाही.” जगभरात व्यसनांविरोधात काम करणारी अनेक माणसे व संस्था-संघटना कार्यरत आहेत. सरकारी पातळीवरही नेहमी व्यसनांविरोधात जनजागृती करण्यात येते. पण, आता तर नशेड्यांनी आपल्या कल्पनेच्याही पलीकडल्या गोष्टींचा वापर नशेसाठी केल्याचे दिसते. याला आळा घालणे हे सर्वांचेच कर्तव्य ठरते; अन्यथा नशेची ही वाळवी युवा पिढीला पोखरेल, हे निश्चित.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/