पुतना ममतामावशी

    दिनांक  18-Nov-2018   

 


 
 
 
ममता बॅनर्जींचे ‘मी, सत्ता, स्वार्थ’चे राजकारण सुरू असतानाच त्यांच्या नगरसेवकाने मात्र त्यांच्यावर ‘माँ’ नावाचा लघुपट बनवावा आणि कोलकात्यामध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तो लघुपट दाखवला जावा, हे काही नैसर्गिक नाही. यामध्ये किती आणि कसे व्यवहार, लागेबांधे, तडजोडी झाल्या असतील याच्या सुरस कहाण्या असतील. हे सगळे घडत असताना प्रसारमाध्यमांमध्ये ममतांच्या साहित्य-कलाक्षेत्रातल्या दबावशाहीबाबत, झुंडशाहीबाबत कुठे काही खुट्ट होताना जाणवले नाही. ममता नेहमी आपली प्रतिमा रंगवतात की, कोण्याही साध्या भारतीय स्त्रीप्रमाणे त्यांनाही प्रसिद्धीचा अजिबात सोस नाही. पण या ‘माँ’ लघुपटामुळे ममताचे पितळ उघडे पडले आहे. आपल्याच प्रतिमेत ममता इतक्या गुंतल्या गेल्या आहेत की, लघुपटातून त्यांनी स्वतःला ‘माँ’ म्हणवून घेतले आहे. प्रत्यक्षात पश्चिम बंगालमधले दारिद्र्य, हिंसाचार, वाढती गुन्हेगारी, बांगलादेशी घुसखोरांचे लांगूलचालन पाहिले की वाटते, ही माँ आहे की पुतना मावशी? लिहितानाही दुःख आणि शरम वाटते की, पश्चिम बंगालच्या मुलींची स्थिती जितकी वाईट असेल, तितकी ती भारतातल्या कोणत्याच राज्यात नसेल. मागे लिहिले होते की, मुंबईच्या देहविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वस्त्यांमध्ये ८० ते ८५ टक्के मुली पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. छे! स्वतःला माँ म्हणवून घेणाऱ्या या मुख्यमंत्र्याने या देहविक्री बाजारात स्वतःच्या शरीराचा, मेलेल्या मनाचा बाजार मांडलेल्या मुलींची दखल घेतली आहे का? नाहीच घेतली. आता म्हणे या ‘माँ’ला पश्चिम बंगालचे नामकरण ‘बांगला’ करून घ्यायचे आहे. यामध्येही ममतांचा फुटीरतावाद दिसतो. देशाचा शेजारी असलेला बांगलादेश हा आपला वरवरचा मित्रराष्ट्र. पण तरी त्याचे अंतरंग पाकिस्तानशी मिळतेजुळते. या बांगलादेशाच्या नावावरूनच ममतांना पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ करून हवे आहे. ममतांच्या मतानुसार पश्चिम बंगालचे नामकरण झाले तर? पश्चिम बंगाललाही बांगलाच म्हणावे लागेल. भारतीय सैनिकांच्या मृतदेहाला विद्रूप करणाऱ्या बांगलादेशाचे तर पश्चिम बंगालच्या ‘बांगला’ नामसाधर्म्यामुळे आयतेच फावेल. पण ममतांना या साऱ्यांशी काही घेणे-देणे नाही. कारण सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या नादात ‘माँ’चा मुखवटा धारण करणाऱ्या ममता या पुतना मावशीच आहेत.
 
 

मी-सत्ता-स्वार्थ-ममता

 

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चांगलाच रंगला आणि वादाच्या भोवऱ्यातही सापडला. महोत्सव कोण्या एका कलाकाराच्या सर्जनशीलतेने रंगला, असेही नाही बरं. तर तो रंगला किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकला तो वेगळ्या कारणामुळे. अर्थात पश्चिम बंगालमध्ये काहीही घडले (बहुधा काही तरी उलटेपालटे घडले) की, त्याला कारणीभूत कोण असेल हे न सांगताही सगळ्यांना माहिती असते. इथेही या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गोंधळात गोंधळ घालण्याचे कारण आहे ममता बॅनर्जी. या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरचा ‘माँ’ हा २५ मिनिटांचा लघुपट दाखविण्यात आला. हावडा महानगरपालिकेच्या तृणमूल काँगेसच्या नगरसेवकाने हा लघुपट बनवला आहे. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीमध्ये कन्याश्रा आणि शिक्षश्रा योजना कशी सर्वोत्तम राबवली गेली आणि अर्थोअर्थी ममता बॅनर्जी कशा सगळ्यांच्या ‘माँ’ आहेत हे या लघुपटात दाखवले गेले. आता चित्रपट महोत्सवात दर्जेदार, राजकीय स्वार्थविरहीत चित्रपटांची निवड व्हावी, हा किमान प्रेक्षकांना वाटणारा निकष आहे. त्यामुळे दर्जेदार चित्रपटांच्या पंक्तीत ममता बॅनर्जींच्या दोन सरकारी योजनेचा लघुपट पाहायला लावणे, हे तरी अतिच झाले. सगळ्यात पहिले तर तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता, तृणमूल काँग्रेसची प्रचारसभा नव्हती. दुसरे असे की, महोत्सवामध्ये कोणते चित्रपट निवडावेत याचेही काही नियम आहेत. ते सर्व नियम धाब्यावर बसवून हा लघुपट या महोत्सवामध्ये निवडलाच कसा गेला? यावेळी तिथल्या चित्रपट रसिकांनी प्रचंड टीका केली. दिग्दर्शक अनिक दत्ताचे विधान आहे की, चित्रपट महोत्सवात असे होणे खचितच चांगले नाही. मी याबाबत केलेल्या चौकशीत असे दिसून आले आहे की, जगात अन्य ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही चित्रपट महोत्सवात अशा गोष्टी होत नाहीत. अनिक दत्तांचे म्हणणे खरेच आहे. पण ते विसरतात, ममता बॅनर्जींच्या मते त्या म्हणजेच जग आहे. त्या म्हणतील तो कुठे नसला तरी पश्चिम बंगालमध्ये अंतिम शब्द असायला हवा. आज ममता बॅनर्जी राजकीय सत्तास्वार्थात स्वप्रतिमेत अंध झाल्या आहेत. ‘मा, माटी, मानुष’च्या ऐवजी ममतांचा नारा ‘मी, सत्ता, स्वार्थ’ हा झाला आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी ममता बॅनर्जी आणखी काय काय करतील?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/