खुशखबर! पीएफ धारकांना मिळणार स्वस्तात घरे

17 Nov 2018 12:42:05

 


 
 
 
नवी दिल्ली : पीएफ खातेधारकांसाठी एक खुशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच आपल्या खातेधारकांसाठी गृहयोजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत पीएफ खातेधारकांना स्वस्त घरे मिळणार आहेत. ईपीएफओने या योजनेचा प्रस्ताव तयार केला असून तो सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास गृहयोजनेचे काम सुरू करण्यात येईल.
 
लोकसभा निवडणुकीच्या आधी ही गृहयोजना सुरू करण्यात यील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीएफ खातेधारकांना स्वस्तात घरे मिळावीत हा या गृहयोजना सुरू करण्यामागील मूळ उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएफ खातेधारकांना काही अटी असणार आहेत. अशी माहिती ईपीएफओचे सदस्य विरजेश उपाध्याय यांनी दिली. ईपीएफओच्या प्रस्तावानुसार नॅशनल हाऊसिंग असोसिएशनची स्थापना करण्यात येईल. याद्वारे सर्व राज्यात भूसंपादनाचे काम करण्यात येणार आहे.
 
राज्यांकडून स्वस्तात जमिनीची खरेदी करण्यात येईल. त्यानंतर बांधकाम कंपन्यांशी त्या संदर्भात चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे घर खरेदी करण्यासाठी ईपीएफओ पीएफ खातेधारकांना कर्जदेखील उपलब्ध करून देणार आहे. प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चानुसार घरांच्या किंमती ठरविण्यात येतील. ज्या पीएफ खातेधारकांचे स्वत:चे घर नाही, अशा खातेधारकांना या गृहयोजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच त्यासाठी पीएफ खातेधारकाचे खाते हे किमान ३ वर्षे जुने असणे आवश्यक आहे. घर खरेदीसाठी पीएफ खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येणार आहे. तसेच कर्जासाठीचे ईएमआय हे पीएफ खात्यातूनच घेतले जाणार आहेत.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 


 
Powered By Sangraha 9.0