मुंबईच्या नद्यांची करुण कहाणी...

    दिनांक  16-Nov-2018


 

आज मुंबईत नद्या किती? असा जर प्रश्न कोणी विचारला तर किती जण त्याचे अचूक आणि नेमके उत्तर देतील, याची शंकाच वाटते. कारण, २६ जुलै २००५च्या महापुरानंतर मुंबईकरांनीही ‘मिठी’ नावाची एक नदीही या महानगरातून वाहते, याचा साक्षात्कार झाला. पण, या सात बेटांवर वसलेल्या मुंबईत एक नाही, तर तब्बल चार नद्या आजही प्रवाही आहेत. दहिसर, पोयसर, ओशिवरा, मिठी अशा या चार नद्या. पण, या जलप्रवाहांचे ‘नदी’ हे स्वरुप कधीच हरवले असून त्यांचे रुपांतर गटारगंगेत झालेले दिसते. त्यामुळे कोणे एकेकाळी हिंदी, मराठी चित्रपटांतील गाण्यांचे चित्रीकरण ज्या नदीकाठांवर झाले, त्याच नद्या जैवविविधतेच्या दृष्टीने मृतावस्थेत आहेत. तेव्हा, मुंबईतील या चार नद्यांच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...

 

असं म्हणतात की, नद्यांच्या किनारीच बहुतांश प्राचीन संस्कृती उदयास आल्या. स्थायी स्वरुपातील पाणीपुरवठा आणि सुपीक जमिनींमुळे मानवाने नदीकिनाऱ्यांना आपले आश्रयस्थळ बनविले. भरणपोषण करणाऱ्या नद्यांना मानवाने मातेचा दर्जा दिला. त्यांना देवीचे स्थान देऊन त्यांचे अव्याहतपणे पूजनही केले. नदीला पूर आल्यानंतर तिचा पुन्हा कोप होऊ नये म्हणून यज्ञयागही केले. कालांतराने अख्खी शहरंच्या शहरं या नदीकिनाऱ्यांवर बहरू लागली. त्यासोबतच या नद्या म्हणजे जैवविविधतेचेही कोठार ठरल्या. जलचर प्राण्यांचा हक्काचा हा निवारा. पण, कालांतराने औद्योगिकीकरणाची चक्र जसजशी वेग धरु लागली, त्याचा सर्वाधिक फटका हा शहरांलगत वाहणाऱ्या नद्यांनाच बसला. उद्योगधंद्यातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी या नद्यांमध्ये जाऊन मिसळले. स्वच्छ, नितळ नद्या प्रदूषित झाल्या आणि त्यासोबत शहराचे नैसर्गिक स्वास्थ्य्ही धोक्यात आले. ही परिस्थिती फक्त भारतात नाही, तर जगभरात कमी-अधिक प्रमाणात दिसू येते. पण, परदेशात नद्यांच्या ऱ्हासाचे परिणाम जाणवू लागल्यावर, त्यावरील उपाययोजना वेळीच राबविण्यात आल्या आणि नद्यांच्या संरक्षण-संवर्धनावर विशेषत्वाने लक्ष केंद्रीत केले गेले. परंतु, दुदैवाने आपल्या देशात नद्यांना कायमच देवीचा-मातेचा पारमार्थिक-भावनिक दर्जा मात्र मिळाला, पण तशी वागणूक काही नद्यांच्या नशिबी आली नाही. नद्यांच्या प्रदूषणात आपण भारतीयांनी कुठलीच कसर सोडली नाही आणि आज त्या नद्या मरणासन्न अवस्थेत आपणच फेकलेला कचरा, सांडपाणी घेऊन समुद्राकडे वाहत आहेत. त्यामुळे देशातील सात मुख्य नद्या आणि त्यांच्या शेकडो उपनद्या, ही इतकी मोठी, संपन्न जलसंपदा असूनही भारतात त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, यासारखे दुसरे दुर्देव ते काय. या नद्यांचा धरणांच्या, जलविद्युतप्रकल्पांच्या आशयाने विचार हा झालाच, पण त्यांचा प्रवाह हा स्वच्छ राहावा, याकडे कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे जर गंगा, यमुना, गोदावरी, ब्रह्मपुत्रा, कृष्णा यांसारख्या मुख्य नद्यांची जर ही अवस्था असेल तर गावातील-शहरातील इतर छोट्या-मोठ्या नद्यांच्या परिस्थितीबाबत वेगळे काय सांगावे... मुंबईनगरीही त्याला अपवाद नाहीच.

 

खरं तर मुंबईतही नद्या आहेत, असे मुंबईकरांनाही वाटत नसल्यामुळे इतरांकडून याची अपेक्षा करणे म्हणा तसे व्यर्थच. पण, आज त्या नद्या कोणत्याही अवस्थेत का असेना, त्या नद्या आहेत, हे पालिका प्रशासनासह मुंबईकरांनीही विसरुन परडवणारे नाहीच. दहिसर, पोयसर, ओशिवरा, मिठी अशा या चार नद्या. मुंबई उपनगरांतून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, ज्या पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. या चार नद्याच इतक्या प्रदूषित असल्यामुळे आपसुकच मुंबईच्या चौपाट्या, समुद्रकिनारेही गाळात-कचऱ्यात रुतलेले आणि प्रदूषणाची काळी झालर ओढलेले आपल्याला आज दिसतात. म्हणजे, नद्या आणि थेट समुद्रकिनाऱ्यांतील या जलप्रदुषणामुळे मुंबईच्या चौपाट्या या पूर्वीसारख्या पाय बुडवण्याच्याही लायकीच्या नाहीत, असेच खेदाने म्हणावे लागते. असो. तर या चार नद्यांचे उगमस्थान म्हणजे मुंबईचे हरितकवच संजय गांधी नॅशनल पार्क आणि या क्षेत्रातील तलाव. मुंबईतील २००५च्या महापुरामुळे या शहरात ‘मिठी’ नावाची नदीही वाहते, याचा एकाएकी सर्वांनाच साक्षात्कार झाला.त्यानंतरच भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून नद्यांच्या संवर्धनावर किमान चर्चा तरी झडू लागल्या. कारण, या नद्या ‘नदी’ या परिभाषेपलीकडे जाऊन पोहोचल्या आहेत. त्यांचे रुपांतर जणू एक मोठ्या नाल्यांतच झालेले दिसते. पण, नद्यांच्या या मरणासन्न अवस्थेला जबाबदार कोण, याचाही विचार करावा लागेल.

 

 
 

मुंबईतील याच नद्यांच्या किनारी ५० वर्षांपूर्वी कोळीबांधव मासेमारी करायचे. वन्यप्राणी पाणी प्यायला यायचे... नदीच्या किनाऱ्यावर उगवलेल्या हिरव्या गवतात जनावरे चरायला नेली जात असत. गावाप्रमाणेच मुंबईतील नद्यांवरही कोणे एकेकाळी कपडे धुण्याचेही सामूहिक कार्यक्रम चालायचे. या नद्यांवर हिंदी-मराठी चित्रपटांच्या गाण्यांचे चित्रीकरणाचे प्रसंगही चितारले गेले. ओशिवरा नदीकाठाजवळ तर ’बैजू बावरा’ (१९५२) या प्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरणही झाले आहे. इतके रम्य निसर्गसौंदर्य त्याकाळी मुंबईला लाभले होते. मात्र, औद्योगिकीकरण आणि कारखानदारीने १९८०च्या दशकानंतर वेग घेतला आणि ‘विकासा’च्या नावाखाली या नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले. १९९० पासून तर विकासाने निसर्गाच्या लुटीचे क्रौर्य गाठले. पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणावर नियोजनशून्य बांधकामांचा सुळसुळाट झाला. नदीपात्रात अनधिकृत बांधकामे आणि बकाल वस्त्या उभ्या राहिल्या. रम्य नदीचे मोकळे किनारे कालांतराने दिसेनासे झाले. या वस्त्यांमधील कचरा, मलमूत्र, लघु उद्योगातील दूषित पाणीही थेट नदीत मिश्रित झाले. परिणामी, नद्या प्रदूषित झाल्या. त्यांचे अस्तित्वच नाहीसे झाले आणि आज ते पुन्हा शोधण्याची दुर्देवी वेळ आपल्यावर ओढवली आली. २००५ साली मुंबईतील महापुराने एकाअर्थी प्रशासनासह मुंबईकरांनाही नद्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबईतील नद्यांच्या समस्यांवर सविस्तर प्रकाश टाकण्यापूर्वी या चार नद्यांची, तेथील सद्यस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊया.

 

. दहिसर नदी

 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलावातून दहिसर नदी उगम पावते. उत्तर-पश्चिम वाहणारी ही नदी दहिसर या उपनगरातून वाहते, म्हणून या नदीला ‘दहिसर नदी’ म्हणून ओळखले जाते. एकूण १२ किलोमीटर लांबीची ही नंदी श्रीकृष्ण नगर, कांदरपाडा, संजय नगर, दहिसर गावठाण, मनोरी खाडीमार्गे अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीत १९६० पर्यंत मगरींचेही वास्तव्य होते. पण, प्रक्रिया न केलेले औद्योगिक-रासायनिक पाणी, गटाराचे, झोपड्यांचे सांडपाणी सोडले जात असल्याने नदी पूर्णतः प्रदूषित झाली. तसेच याच नदीत आरे कॉलनीतली मृत जनावरे टाकली जात असल्यामुळे नदीच्या प्रदुषणात भर पडली. अनधिकृत बांधकामांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी नदीचा मूळ प्रवाह बदलण्याचे प्रकारही घडले आहेत. इथल्या लेप्रसी कॉलनीजवळ नदीपात्र अरुंद झाल्याचेही दिसून येते. अगदी आपण नॅशनल पार्कच्या जवळ पाहिले तरी या नदीत कचऱ्याचे ढीग तरंगताना दिसतात. एकीकडे कचऱ्याचा ढीग, तर दुसरीकडे नदीमध्ये सांडपाणी सोडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. नदी किनाऱ्यालगतच्या एका वस्तीत राहणाऱ्या तुषार रोगे यांना नदीविषयी विचारणा केली असता, ते म्हणतात की, “दहिसर नदीला पावसाळ्यात पूर येतो. येथील शांतीवन परिसरात लोकांच्या घरात पाणीही शिरते. तसेच संजय गांधी नॅशनल पार्क जवळच्या परिसरात नदीबद्दल माहिती असल्याने तेेथील रहिवासी नदीमध्ये कचरा टाकत नाहीत. परंतु, ज्यांना या संदर्भात माहीत नाही, ते नदीतच कचरा टाकतात.”

 

. पोयसर नदी

 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - कांदिवली - मालाड- मार्वे खाडीमार्गे पोयसर नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीची लांबी सात किलोमीटर. ओशिवरा नदीप्रमाणे ही नदीदेखील आकाराने लहान असली तरी इतर नद्यांप्रमाणे या नदीलाही प्रदूषणाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साचलेला खच आणि अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात या नदीचे पात्र शोधावे लागते. औद्योगिक सांडपाण्यामुळे पोयसर नदीतील शुद्ध पाण्याचा प्रवाह हरवून गेला आहे. या नदीतल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे ही नदी मृत होण्याच्या मार्गावर आहे. पोयसर नदीच्या जवळील मालाडच्या एका भागात राहणाऱ्या सुनीता सपकाळे यांना नदीविषयी विचारले असता त्या म्हणतात की, “आम्ही फार पूर्वी नदीकाठी कपडे धुवायचो, भांडी घासायचो. इथे विहीर आहे, तिचे पाणी प्यायल्याही वापरायचो. पण प्रदूषणाचा परिणाम विहिरीच्या पाण्यावरही झाला. विहिरीचे पाणीही काळे पडले. त्यामुळे विहिरीच्या पाण्याचा वापर करणे सोडले. आता या विहिरीचीदेखील कचराकुंडी झाली आहे.”

 

. ओशिवरा नदी

 

ओशिवरा नदीचा काही भाग हा ‘वालभट’ या नावाने ओळखला जातो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आरे मिल्क कॉलनीजवळून या नदीचा उगम होतो. या नदीची लांबी सात किलोमीटर. ही नदी आरे मिल्क कॉलनी, स्वामी विवेकानंद रोड, मालाडजवळील खाडीमार्गे जाऊन अरबी समुद्रात मिळते. गोरेगाव या उपनगराच्या काही भागातून प्रवास करत ही नदी मालाडच्या खाडीपर्यंत पोहोचते. ओशिवरा औद्योगिक क्षेत्राजवळून ही नदी वाहत असल्याने या क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडलं जातं. तसेच या भागातल्या झोपडपट्ट्यांमधूनदेखील सांडपाणी नदीत सोडल्याने नदीच्या प्रदूषण पातळीत भर पडते. तसेच या नदीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात डेब्रिज म्हणजेच बांधकामाचा कचरा टाकला जात असल्याने त्यावर झोपड्या वसल्यामुळे बकाल वस्तीही वाढली आहे. ओशिवराचे स्थानिक रहिवाशी बबन भालशंकर यांना नदीच्या दयनीय परिस्थितीबाबत विचारणा केली असता ते म्हणतात की, ‘’साधारणतः १९८७ पर्यंत ओशिवरा नदीही चांगल्या स्थितीत होती. नदीकडे पाहून प्रसन्न वाटायचे. परंतु, नंतर येथे कारखान्यांमधील प्रदूषित पाणी सोडले गेले आणि आज या नदीचे गटारात रुपांतर झाले आहे.”

 

. मिठी नदी

 

२००५ साली मुंबईतील महापुरानंतर इतके वर्षं ‘नाला’ म्हणून दृष्टिक्षेपात येणारा हा काळाकुट्ट जलप्रवाह प्रत्यक्षात ‘मिठी नदी’ असल्याचा एकाएकी साक्षात्कार झाला. मिठी ही खरं तर मुंबईतील सर्वात मोठी आणि तितकीच जास्त प्रदूषित नदी. या नदीची लांबी तब्बल २५ किमी असून ती विहार तलावात उगम पावते. विहार तलाव - साकी नाका - कुर्ला - कलिना - वाकोला - वांद्रे-कुर्ला संकुल - धारावी - माहीम खाडीमार्गे ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. मुंबईतल्या इतर तीन नद्यांपेक्षा ही नदी आकाराने आणि लांबीने सर्वांत मोठी. विहार आणि पवई तलावातील पाणी या नदीत प्रवेश करते. आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांमधील यंत्रांच्या साफसफाईनंतर तेच दूषित पाणी नदीत सोडले जाते. याच पाण्याने प्राण्यांना आंघोळही घातली जाते. तेलाच्या ड्रम्सची सफाई केली जाते. यामुळे ही नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. २००५च्या मुंबईतल्या पुरात या नदीने रौद्ररूप धारण केल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला होता. या नदीच्या लगत झोपडपट्ट्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे, त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील कचराही याच नदीपात्रात टाकला जातो. मिठी नदीच्या या करुण अवस्थेविषयी कलिनाचे स्थानिक रहिवासी संजय अवसारे यांना विचारले असता, ते सांगतात की, “२००५ पूर्वी मिठी नदीकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नव्हते. ही ‘नदी’ नसून ‘नाला’ आहे, असाच लोकांचा समज होता. या नदीमध्ये आजूबाजूच्या परिसरातील खूप कचरा टाकला जायचा. त्यामुळे दुर्गंधी निर्माण व्हायची. परंतु, २००५ नंतर लोकांना कळले की, ही नदी आहे. त्यानंतर पालिकेनेही सातत्याने या नदीक्षेत्रात साफसफाई केली आणि आज या नदीची अवस्था चांगली नसली तरी पूर्वीपेक्षा सुधारली आहे.”

 

या चारही नद्यांच्या आढाव्यांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, या नद्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता अधिक असून त्यामध्ये अतिक्रमण, सांडपाणी, कचराफेक यांचाच समावेश आहे. तेव्हा, मुंबईतील नद्यांना भेडसावणाऱ्या या समस्यांचा सविस्तर विचार करुया.

 

 
 

अतिक्रमण आणि डेब्रिडचे ढीग

 

हाताला काम अन् पोटाला भाकरी मिळेल, या उद्देशाने देशाच्या कानाकोपऱ्यातून बेरोजगारांचे लोंढेच्या लोंढे मुंबईवर आदळतात. इमारतींमध्ये, चाळींमध्येही भाडे न परवडल्यामुळे तसेच घरांच्या चढ्या किंमतींमुळे हक्काचे घरही विकत घेणे अशक्य होऊन जाते. मग झोपडपट्ट्यांमध्येच आसरा घेतला जातो. जिथे रिकाम्या जागा दिसतील तिथे मग या झोपड्या आणि अनधिकृत इमारती उभ्या राहतात. आधी म्हटल्याप्रमाणे, नद्यांच्या किनाऱ्यावरच्या या मोकळ्या जागा अशाच हळूहळू बळकावल्या गेल्या. मोकळी जागा न दिसल्यास समुद्रात, नदीनाल्यांमध्ये भराव टाकून टोलेजंग इमारतीही उभ्या राहिल्या. या इमारती उभारताना मोठ्या प्रमाणावर डेब्रिज निर्माण होतात. एकट्या मुंबईत सुमारे पाच हजार ट्रक डेब्रिज तयार होतात. खरं तर विकासकाने हे डेब्रिज शहराबाहेर टाकणे गरजेचे असते, परंतु विकासक असे करताना दिसत नाही. बांधकामापासून जवळच असलेल्या नदीनाल्यांमध्ये, रस्त्याच्या कडेला, तिवरांची जंगले, पडीक जमिनी इथे हे डेब्रिज सर्रास टाकले जातात. नदीनाल्यांमध्ये हे डेब्रिज टाकल्यानंतर त्या जागेवर पुढे झोपड्या उभ्या राहतात. लोकवस्ती वाढत जाते. मग या झोपड्यांचे सांडपाणीही नाल्यांमध्ये सोडले जाते. तसेच शौचासाठीही या नदीनाल्यांचा बिनबोभाटपणे उपयोग केला जातो. त्यामुळे या नद्यांच्या प्रदूषणात दुर्गंधीचीही भर पडते.

 

झोपडपट्ट्या आणि सांडपाणी

 

आज मुंबईतील जवळपास ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. काही ठिकाणी अजूनही रस्ते, पाणी, वीजपुरवठ्यासारख्या पायाभूत सुविधादेखील पोहोचलेल्या नाहीत. शौचालयांची संख्या अपुरी असल्याने अनेकांना आजही उघड्यावर जावे लागते, तर ज्या ठिकाणी शौचालय आहे, त्या ठिकाणचे सांडपाणी मुख्य मलनिस्सारण वाहिनीला न सोडता थेट गटारांमध्ये सोडले जाते. हेच गटाराचे पाणी नंतर नदीला येऊन मिळते. तसेच जनजागृतीअभावी कचराही नाल्यांमध्ये टाकला जातो. त्यामुळे अशा विविध कारणांमुळे मुंबईतील चारही नद्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

औद्योगिक सांडपाणी

 

उपनगरांतून मुंबई शहरात कामासाठी दररोज ७० लाख लोक सकाळी दाखल होतात आणि संध्याकाळी घराकडे वळतात. त्यामुळे लोकांची संख्या जसजशी वाढते, त्या प्रमाणात त्यांच्या गरजादेखील वाढत आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध उत्पादनांच्या, सेवांच्या कंपन्या सुरू होतात. त्यामुळे अनेक टाकाऊ रासायनिक घटकांची निर्मिती होते आणि बरेचदा या रासायनिक घटकांवर प्रक्रिया न करताच ते नदीनाल्यामध्ये सोडले जातात. खरेतर कंपनीतील रासायनिक घटकांवर योग्य ती प्रक्रिया करून ते नदीनाल्यात सोडले जातील, अशी अट घातली जाते. पण, या अटी फक्त कागदावरच राहून या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. त्यामुळे या रासायनिक घटकांचा नदीतील तसेच समुद्रातील माशांच्या विविध प्रजातींवर परिणाम झाला आहे. माशांच्या बऱ्याच प्रजाती नष्ट झाल्या आहेत. नद्यांमध्ये सध्या मासे तर नाहीतच, परंतु समुद्रातही मासेमारीसाठी दूरवर जावे लागते.

 

जनावरांचे मलमूत्र आणि अवशेष

 

मुंबई शहराला दूधपुरवठा व्हावा, यासाठी काही वर्षांपूर्वी उपनगरात तबेले बांधण्यात आले. त्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे, दूधपुरवठा करण्यासाठी कमीतकमी वेळ. तसेच ग्रामीण भागातून शहरांकडे येणाऱ्या रस्त्यांची दूरवस्था, अपुऱ्या सोयीसुविधा, वाहतुकीचा खर्चही कमी होईल, हा मुंबईला दुग्धस्वंयपूर्ण करण्याचा हेतू. पण, या तबेल्याच्या मालकांनी गाई-म्हशींच्या मलमूत्राची विल्हेवाट लावण्याऐवजी त्यांना थेट नदीनाल्यांमध्ये सोडले. या मलमूत्रापासून लेप्टोसारखे आजार पसरतात. त्यामुळे हे तबेले मुंंबईबाहेर हलविण्याच्या मागणीनेही मध्यंतरी जोर धरला. न्यायालयाने हे जलप्रदूषण करणारे तबेले मुंबईबाहेर हलविण्याचे आदेशही दिले. त्यामुळे काही तबेले स्थलांतरित केले असले तरी दहिसर, गोरेगाव, आरे आदी ठिकाणी हे तबेले अजूनही कार्यरत आहेत. या तबेल्यांमधील गाई-म्हशींची संख्याही जास्त आहे. या तबेल्यातील जनावरांचे मलमूत्र, कचरा नदीमध्ये टाकला जातोच, त्यासोबत एखादे जनावर मृत पावले तर त्याचे मृत शरीरही नदीमध्येच विसर्जित केले जाते. “पूर्वी गोमांस खाल्ले जायचे. त्यामुळे या तबेल्यातील गाई दूध काढण्यासाठी, तर बैल विकला जायचा. पण, सरकारने गोमांसवर बंदी घातल्यामुळे गाईला वासरू झाल्यानंतर ती जर गाय असेल तर ठेवले जाते अन् तो बैल असेल तर त्याला १५ ते २० दिवस उपाशी ठेवले जाते. त्यानंतर ते मृत पावल्यास त्याला नदीमध्ये फेकण्यात येते,” असा धक्कादायक प्रकार गोपाळ झवेरी यांनी या विषयासंबंधी चर्चा करताना सांगितला.

 

प्लास्टिकने बुडवले...

 

मुंबईत २६ जुलै २००५ रोजीच्या महापुराने तसेच २९ ऑगस्ट २०१७च्या अतिवृष्टीनेही काहीजणांचे बळी घेतले. जीवितहानीसोबतच वित्तहानीनेही मुंबईचे कंबरडे मोडले. कालांतराने २००५च्या मुंबई महापुरामागे प्लास्टिकने पाणी तुंबल्याचे स्पष्ट झाले. हॉटेलमधून जेवण पार्सल नेण्यापासून ते अगदी जेवणाच्या साहित्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत, सर्वत्र प्लास्टिकचा वापर होऊ लागला. प्लास्टिकच्या प्लेट्स, बाटल्या यांचे खचच्या खच नदीनाल्यांमध्ये फेकले गेले. त्यामुळेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा झाला नाही आणि शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले. मुंबईच्या याच चारही नद्यांना पूर आला आणि पुराच्या प्रवाहाने घरांमध्ये पाणी शिरून हजारो कोटींची वित्तहानी झाली. आज जरी राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी घातली असली तरी चोरीछुपेपणे प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. ज्या प्लास्टिकमुळे मुंबईला २६ जुलैचा महापूर आणि २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीचा सामना करावा लागला, त्या प्लास्टिकचा अट्टाहास म्हणून नागरिकांनी सोडायला हवा आणि पर्यावरणरक्षणासाठी प्लास्टिक सोडून इतर पर्यायी वस्तूंच्या वापराकडे वळले पाहिजे. तसेच गणेशोत्सवातही शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर जलप्रदूषणाला आटोक्यात आणू शकतो.

 

मुंबईतील नद्या पुनरुज्जीवित होतील का?

 

पर्यावरणाच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगतची, नदीलगतची तिवरे. ‘युनेस्को’नुसार तिवरांच्या एकूण १८ प्रजाती असून मुंबईत त्यापैकी तिवरांच्या ९ प्रजाती आढळतात. या तिवरांमध्ये प्राणीपक्ष्यांच्या काही दुर्मीळ प्रजातीदेखील वास्तव्यास आहेत. ही तिवरे समुद्राच्या लाटांपासून आपले संरक्षण करतात. तिवरांचे हे जंगल तयार होण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. पण, केवळ मानवी हव्यासापोटी ही तिवरे नष्ट केली जातात आणि मग महापुराच्या रूपाने त्याचे परिणामही भोगावे लागतात. त्यामुळे नद्यांचे संवर्धन करताना तिवरांचेदेखील संवर्धन होणे तितकेच गरजेचे आहे.

 

मुंबईतील ओशिवरा, दहिसर, मिठी व पोयसर नद्यांचे स्वरूप दिवसेंदिवस बकाल होत चालले आहे. त्यामुळे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागांद्वारे नद्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंतींचे बांधकाम करण्यात येते. तसेच नदी संवर्धनासाठी विभागामार्फत प्रयत्नही केले जातात, पण निश्चितच ते पुरेसे नाहीत. नद्यांमधील भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि नद्यांमध्ये जाणारे झोपडपट्टीतील सांडपाणी, नद्यांच्या बाजूला असणारे छोट्या कारखान्यातील रासायनिक पाणी, गाळे, तबेल्यातील सांडपाणी रोखून या नद्यांचे पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण करावे, यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो. त्यामुळे या नद्यांचे पुनरुज्जीवन तसेच सौंदर्यीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने नद्यांचे संवर्धन व सौंदर्यीकरणाचा अनुभव असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक केली आहे. एकूणच, मुंबईच्या नद्यांना पुनरुज्जीवित करणे, त्यांचा प्रवाह असाच खळाळता ठेवणे ही केवळ पालिकेची, राज्य सरकारची जबाबदारी नसून तुमची-आमची सगळ्यांचीच सामूहिक जबाबदारी आहे. केवळ तसे झाल्यास मुंबईतील नद्यांचे नैसर्गिक गतवैभव आपल्याला पुन्हा मिळू शकते. शिवाय, महानगरात राहूनही नदीचे स्वच्छ आणि रम्य किनारे अनुभवण्याची फक्त कल्पना करुन बघा... आपसुकच तुमच्या हातचा कचरा या जलप्रवाहात पडणार नाही. त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वी जैविकदृष्ट्या मृत घोषित केलेली लंडनची थेम्स नदी आज जगातील सर्वाधिक स्वच्छ नदी ठरु शकते, तर आपली मिठी नदीही खरंच ‘मिठी’ होऊन, जलवाहतुकीचे नवे मार्ग मुंबईकरांसाठी निश्चितच खुले होतील, यात शंका नाही.

 

मुंबईत ‘झिरो स्लम’ची गरज

 

मुंबईतील नद्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी ‘रिव्हर मार्च’ मोहीम राबविण्यात आली. परंतु, कालांतराने असे लक्षात आले की, ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ केल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही आणि नद्याही पुनरुज्जीवित होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाला मुंबईत हक्काचे घर मिळण्यासाठी सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गरज आहे. हा पैसा कसा उभारणार, तर मुंबई मनपाच्या ६३ हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्रित पैसे टाकले, तर हे शक्य होऊ शकते. शिवाय, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारदेखील उपलब्ध होईल. कराच्या रूपात सरकारलाही पैसे मिळतील. - गोपाळ झवेरी, संस्थापक सदस्य, रिव्हर मार्च मोहीम

 
 
- नितीन जगताप 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/