दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली पंजाबमध्ये 'हायअलर्ट'

16 Nov 2018 17:39:15


 

 

चंदीगड : पंजाबमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे. या पार्शवभूमीवर पंजाब व दिल्लीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आले आहेत. दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या महानिरीक्षकांनी याबाबत एक पत्र जारी केलं आहे. यानुसार फिरोजपूर परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून सहा ते सात दहशतवादी पंजाबमध्ये घुसण्याचा तयारीत आहेत.
 

जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झाकीर मूसा पंजाबमध्ये दिसल्याचेही काहींचे म्हणणे आहे. तर सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, जवळपास सात दहशतवादी पंजाबमध्ये घुसण्याचा तयारीत आहेत. हे दहशतवादी देशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याचे देखील सुरक्षा यंत्रांचे म्हणणे आहे.

 

महानिरीक्षकांनी जारी केलेल्या पात्रात विविध ठिकाणांवर, महामार्गावर तपासणी नाक्यांची संख्या वाढवून वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी नाकाबंदी करून कसून चौकशीला सुरुवात केली असून पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये झाकीर मूसाचे पोस्‍टर्स लावले आहेत.

 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पठाणकोटच्या माधोपूर भागात काही संशयितांनी एक कार पळवून नेल्याची घटना घडली होती. हे दहशतवादीच असल्याचा पोलिसांचा दाट संशय असल्याचे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पंजाब पोलिसांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0