लोकमान्य टिळक आणि महर्षी शिंदे - आदरयुक्त विरोधभावाचे नमुनेदार उदाहरण

    दिनांक  15-Nov-2018

 


 
 

समाजसुधारकांची विचारदृष्टी, कार्यपद्धती तसेच त्यांच्यातील भावसंबंधांचे त्या त्या काळाच्यासंदर्भात आकलन करणे गरजेचे ठरते. या परस्परसंबंधांतून त्यांच्या कार्यशैलीचा काळ आणि घडामोडींचा मागोवा, पुनरावलोकन समाजेतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. त्याच अनुषंगाने ‘भारतीय राष्ट्रवादाचे जनकलोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे कार्य करणाऱ्या महर्षी शिंदे या दोन परस्पर भिन्न महारथींच्या आदरयुक्त विरोधभावाचा आढावा घेणारा हा लेख...

 

महापुरुषांच्या विचारकार्याला त्या त्या काळाची संदर्भचौकटही असते. त्यामुळे काळ, परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पाहायला हवे. सध्याचा काळ अस्मितांचा वा व्यक्तींच्या अतिप्रेमापोटी अनाठायी भळभळण्याचा काळ आहे. समाजसुधारकांच्या कार्याचे आकलन हे एकांगी व अनैतिहासिक रीतीने करण्याच्या पद्धती रूढ होत आहेत. महापुरुषांत नसणाऱ्या विरोधभावाची चर्चा करण्यात बुद्धिमंतांनाही धन्यता वाटत आहे. गांधी विरुद्ध आंबेडकर, नेहरू विरुद्ध जीना, टिळक विरुद्ध शाहू, महर्षी शिंदे विरुद्ध आंबेडकर अशी विचारद्वंदे कल्पिण्यात आणि त्यात अनाठायी ऊर्जा घालविण्यात आधुनिक चर्चाविश्वाला रस आहे. कोण बरोबर कोण चुकीचे, याची अहमहमिकेने वा वितंडवादाने चर्चा घडवली जाते. बऱ्याच वेळा त्यात पक्षपातीपणा येतो. गत समाजेतिहासाला दूषितपणे आजच्या काळपरिमाणात जोखले जाते. प्रदेश, जात, विचार अस्मितांच्या आग्रहीपणामुळे विचारकलह निर्माण केला जातो. त्यामुळे या आग्रही अभिनिवेशी पक्षपातीपणाचा पडदा बाजूला सारून सम्यकपणे समाजेतिहास, व्यक्तिकार्य व त्यातल्या अंतःप्रवाहांकडे पाहायला हवे. विचारांमधल्या मतभेदाच्या दिशा नोंदवून, सामर्थ्यस्थाने तसेच मर्यादांचीही विवेकी भाषेत चर्चा होणे आवश्यक ठरते.

 

लोकमान्य टिळकांची (१८५६-१९२०) ‘भारतीय असंतोषाचे जनक’, ‘राष्ट्रीय विचारसरणीचे नेते’ म्हणून ओळख आहे. ‘गांधीपूर्व भारतीय लढ्याचे नेते’ म्हणूनही त्यांची ओळख आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळीला त्यांनी नवे वळण दिले. त्यांचा जन्म रत्नागिरीचा, तर आयुष्यभर कार्याचे जीवनक्षेत्र घडले ते पुणे येथे. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. निर्भय पत्रकार, प्रकांडपंडित, साक्षेपी गणितज्ज्ञ, वेदधर्माचे अभ्यासक, कायदेपंडित अशी त्यांची ओळख. राष्ट्रचळवळीत आपल्या कुशल नेतृत्वाने व सुघड संघटन कौशल्याने ते नेहमीच चर्चेत राहिले. राष्ट्रीय काँग्रेस व राजकारण प्रेरित अनेक चळवळींशी ते घनिष्ठ होते. टिळकांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाचा पसारा पाहिल्यानंतर थक्क व्हावे, असे त्यांचे लेखन आहे. त्यांना आधुनिक ज्ञानाबद्दल विशेष आस्था होती. आधुनिक प्रबोधनकाळाने दिलेल्या प्रकाशाचे महत्त्व त्यांना कळलेले होते. त्यामुळेच आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत संस्थात्मक उभारणी करणाऱ्या न्या. रानडे यांच्याविषयी त्यांना ममत्व होते. भारतविद्येबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. त्यामुळेच मॅक्समुलरचा उल्लेख ते ‘भट्ट मोक्षमुलर’ असा करायचे.

 

 
 

महर्षी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडीसारख्या एका कानडी मराठीमिश्रित छोट्या संस्थानी गावात झाला. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पुणे आणि ऑक्सफर्ड येथे झाले. ब्राह्मधर्माचे प्रसारक म्हणून त्यांनी भारतभर भ्रमंती केली. त्यासाठी आरंभी मुंबई हे कार्यक्षेत्र निवडले. नंतर शिंदे यांनी आपली कार्यभूमी पुणे निवडली. ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ सारखी संस्था स्थापून त्याचा भारतभर विस्तार केला. महर्षी शिंदे यांचे समाजकार्य हे मुख्यत्वे अस्पृश्योद्धाराचे होते. मानववादी मिशनरी वृत्तीने तळातील दडपलेल्या वंचित समाजासाठी त्यांनी समर्पित भावनेने काम केले. उन्नत धर्मजीवन ही त्यांच्या कार्याची आंतरिक प्रेरणा होती. याशिवाय शेती, राष्ट्रीय चळवळ, स्त्रीशिक्षण व अन्य निकडीच्या समाजकार्यात ते सहभागी झाले. वैचारिक, संशोधनात्मक व ललित स्वरूपाचे लेखन त्यांनी केले. समाजशास्त्र, इतिहास, भाषाशास्त्र, तौलनिक ज्ञानशाखा, पुराकथाविद्या हे त्यांच्या आवडीचे विषय होते. टिळक आणि शिंदे यांच्या परस्पर संबंधांबद्दलचा काहीएक विचार या लेखात मांडला आहे.

 

 
 

अशा या दोन वरकरणी परस्परभिन्न वाटणाऱ्या व्यक्तिकार्याबद्दल काही संवादी दुवे पाहता येऊ शकतात. दोघांच्या वयात अंतर होते. टिळकांपेक्षा महर्षी शिंदे १७ वर्षांनी लहान होते. मात्र, एकमेकांच्या कार्याबद्दल दोघांच्याही मनात आदर होता. कार्याच्या भूमिका व कार्यपद्धतीबद्दल प्रसंगी विसंवाद झाला, तरी ते एकमेकांना समजून घेतच. टिळक आणि महर्षी यांच्या चरित्रपटात काही योगायोगाचे समान दुवेही मिळू शकतात. अर्थात, ते बाह्य स्वरूपाचे आहेत. दोघांचेही फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण झाले. राष्ट्रीय चळवळ वा समाजजागृती हा टिळकांचा ध्यास होता, तर दलित, वंचितांचा उद्धार हे महर्षी शिंदे यांच्या आयुष्याचे जीवितकार्य होते. संस्थात्मक उभारणीत दोघांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, किंबहुना राष्ट्रीय कामासाठी संस्थात्मक संघटन उभे करणे दोघांनीही क्रमप्राप्त मानले. टिळकांनी ‘केसरी’, ‘मराठा’, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली, तर शिंदे यांनी ‘डिप्रेस्ड सोसायटी क्लासेस मिशन ऑफ इंडिया’ स्थापन केली.

 

 
 

पदवी शिक्षणाबद्दल दोघांच्याही ठाम अशा भूमिका होत्या. समर्पित भावनेने राष्ट्रकार्यात आयुष्य व्यतीत करण्याची दोघांचीही भूमिका होती. भावी आयुष्याबद्दल लो. टिळकांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “विशेष सुखाची हाव न धरता मी पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार,” या विचाराने टिळकांनी आपले जीवनकार्य केले. शिंदे यांनाही मॅट्रिक्युलेशनंतर जमखंडी संस्थाधिपतींनी बोलावले आणि विचारणा केली की, “मुंबईला व्हेटर्नरी शिक्षणासाठी संस्थानाची एक छोटी स्कॉलरशिप दिल्यास तुम्ही जाल का?” शिंदे यांनी तेथेच त्यांना नकार दिला व “मला कलाशाखेत शिक्षण घ्यावयाचे,” असे सांगितले. त्याची परिणती शिंदे हे संस्थानात दोन-तीन महिने शिक्षक म्हणून काम करत होते. नंतर त्यांना नोकरीला मुकावे लागले. टिळकांचे न. चिं. केळकर, ज. स. करंदीकर, दादासाहेब खापर्डे हे अनुयायी व इतरही अनेक मंडळी शिंदे यांच्या मित्रांपैकी होते.

 

 
 

टिळकांनी तुरुंगात असताना विद्याव्यासंग केला. पुस्तके लिहिली. “माझ्या मनात असलेली पुस्तके तुरुंगात लिहून पुरी करता येतील,” असे टिळकांनी म्हटले होते. शिंदे यांनीही १९३० साली येरवडा तुरुंगात ‘माझ्या आठवणी व अनुभव’ या आत्मचरित्र लेखनाचा खर्डा अपूर्ण केला. मॅक्स आणि स्पेन्सर या विचारवंतांविषयी टिळकांना कमालीचा आदर होता. टिळकांनी त्यांच्यावर लेख लिहिले. महर्षी शिंदे यांनादेखील त्यांच्या विद्यार्थीदशेत या विचारवंतांनी व त्यांच्या ग्रंथांनी झपाटून टाकले होते. संशोधन व अभ्यासाविषयीचे काही समान आस्थाविषय दोघांतही होते. प्राच्यविद्या, इतिहास, धर्मशास्त्र, शेतीप्रश्न, भगवद्गीता, गीतारहस्य या विषयांवर टिळकांनी लिहिले. वेदकाळ ते बुद्धकाळातील जीवनाविषयी लिहिले. पुराणकथांचा तौलनिक अभ्यास सांगणारे लेख दोघांनीही लिहिले. शिंदे यांनाही विविध ज्ञानशाखांमध्ये कमालीचा रस होता. ऑक्सफर्डला तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे ही दृष्टी त्यांच्यात आली होती. टिळकांनी ब्रह्मदेशाचा प्रवास केला व त्यावर लिहिले, तिथल्या सामाजिक जीवनाबद्दल लिहिले. विठ्ठल रामजी शिंदे यांनीही १९२७ साली ब्रह्मदेशाची यात्रा बौद्ध धर्माच्या पाहणीसाठी केली. त्यावेळी शिंदे आवर्जून मंडाले मुक्कामात टिळकांना ज्या राजकीय तुरुंगात ठेवले होते, ते पाहून आले. अखंड भारतभ्रमंती हा दोघांचाही ध्यास होता. टिळकांचा राजकीय जागृतीसाठी भारतभर प्रवास घडला, तर शिंदे दलितांच्या प्रश्नांसाठी व ब्राह्मधर्माच्या प्रसारासाठी भारतभर फिरले. देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक स्थितीचे विहंगावलोकन हा दोघांमधील समान दुवा होता. भाषणे, व्याख्याने, अधिवेशने, बैठका यासाठी दोघांचाही सक्रिय सहभाग होता. जीवनविषयक दृष्टिकोन, त्याची कार्यपद्धती व विचार याबाबतीत दोघांचेही निरनिराळे दृष्टिकोन होते. राजकारण हे टिळकांच्या आयुष्याचे प्रमुख ध्येय होते. त्यांच्या सर्व इतर कामांची सूत्रे व राष्ट्रीयता राजकारणाभोवती एकवटलेली होती.

 

 
 

शिंदे यांचे तरुणपण पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात होते. त्यावेळी टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या व कामाच्या नोंदी त्यांच्यापर्यंत येत असणे स्वभाविकदेखील आहे. शिंदे यांच्या विद्यार्थीदशेतच टिळक भारतीय राजकारणाच्या यशोशिखरावर होते. ‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून मान्यता पावले होते. तरुण विद्यार्थीदशेत शिंदे यांच्यावर ब्राह्मधर्माच्या विचारांचा प्रभाव पडला. ते पुण्यातील प्रार्थना समाजाच्या सभांना जाऊ लागले. १९०१ साली महर्षी शिंदे यांची तौलनिक धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे दोन वर्षांसाठी निवड झाली. त्यावेळी शिंदे यांचे वय २८ वर्षे होते. टिळकांना त्यावेळी प्रसिद्धी व लोकप्रियता लाभलेली होती. आपली निवड झाल्याचे टिळकांना सांगावे, त्यांचे दर्शन घ्यावे, असे विठ्ठल रामजींना मनोमन वाटले. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा, बहुश्रुत लोकप्रियतेचा शिंदे यांच्यावर काहीएक प्रभाव असावा. त्यामुळे स्वाभाविक त्यांच्याविषयीचे आकर्षणही असावे.

 

 
 

शिंदे धाडसाने टिळकांच्या भेटीला गेले. धर्मशिक्षणासाठी जात असल्यामुळे टिळक नकारार्थी बोलतील, असे शिंदे यांना वाटले. काहीशा साशंकतेनेच शिंदे त्यांच्याकडे गेले. मात्र, या भेटीचा शिंदे यांना वेगळा आणि चांगला अनुभव आला. या भेटीचे वर्णन शिंदे यांनी असे केले आहे, “जणू काही फार दिवसांचा लोभ आहे, अशा सलगीने त्यांनी मला ओढून अगदी आपल्याजवळ बसवून घेतले आणि सामान्यतः उदार धर्मासंबंधी व तुलनात्मक विवेचन पद्धतीसंबंधी अगदी मोकळ्या मनाने आणि तज्ज्ञपणे आपले प्रागतिक विचार मजपुढे बोलून दाखविले. इतकेच नव्हे, तर आमच्या प्रार्थना समाजासंबंधीदेखील काही बाबतीत त्यांनी आपली गुणग्राहकता प्रकट केली. आमच्या हिंदू तत्त्वज्ञानात द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत इत्यादी पुढे जे तट आणि उपासनेत शैव, वैष्णव, शाक्तादी पंथ माजले, त्यायोगे आपली दृष्टी विकृत होऊ न देता व त्यांचे ऐतिहासिक महत्त्वही कमी न करता उपनिषद काळात हिंदूंची जी निर्भय व स्वतंत्रदृष्टी होती, तीच राखून पौर्वात्त्य व पाश्चात्त्य आचार-विचारांची तुलना करण्यास शिका, असा त्यांनी प्रेमाचा इशारा दिला. मला सानंद आश्चर्य वाटले,” असे शिंदे यांनी या भेटीचे वर्णन केले आहे.


 
 

वेगवेगळ्या काळातील घडामोडींचा व सामाजिक जीवनाचा शिंदे विचार करीत होते व त्यासंबंधी आपली भूमिका स्वच्छपणे मांडतही होते. लोकमान्यांना अटक होऊन सहा वर्षांची शिक्षा झाल्याबद्दल महर्षी शिंदे यांना वाईट वाटले. “एवढ्या मोठ्या कारावासात या जनतेच्या पुढाऱ्याला आयुरारोग्य लाभो. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती मिळो,” अशी प्रार्थना साप्ताहिक उपासनेत शिंदे यांनी केली. प्रार्थना समाजीयांना शिंदे यांची ही गोष्ट रूचली नाही. तसेच शिंदे यांनी लो. टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीला दिलेला पाठिंबाही प्रार्थना समाजाला आवडला नाही. दोघांनाही एकमेकांच्या कार्याबद्दल आस्था आणि आदर होता. टिळकांचे कार्य विशेष करून राजकारणात असले तरीदेखील त्यांना सामाजिक कार्याबद्दल आस्था होती. शिंदे यांच्या ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या साहाय्यार्थ ते न मागता वर्गणी पाठवून देत असत. टिळकांनी मद्यपानविरोधी चळवळीत सहभाग घेतला. त्यासाठी जागृतीची एक मोठी कामगारांची सभा १९१७ मध्ये मुंबईत करी रोड स्टेशनजवळ झाली. या सभेच्या दुसऱ्या दिवशी टिळक परळ येथील ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ शाखेला भेट देणार होते. परंतु, त्या दरम्यान ब्रिटिश सरकारमार्फत त्यांच्यावर राजद्रोहाच्या कारवाई अंतर्गत शिक्षा झाल्यामुळे ते मिशन शाखेला भेट देऊ शकले नाहीत.

 

 
 

टिळक-शिंदे यांच्या कार्यपद्धतीला त्या काळातील ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाचीदेखील एक पार्श्वभूमी आहे. १९१६-१७ च्या काळात लखनौ काँग्रेसपासून ब्राह्मणेतर चळचळीला अधिक वेग आला. राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा देण्यासाठी बहुजन व अस्पृश्य समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना झाली. ८ नोव्हेंबर १९१७ रोजी सायंकाळी शनिवारवाड्यासमोर सर्व जातीधर्मातील लोकांची सभा भरली. राष्ट्रीय सभेने पास केलेल्या ‘स्वराज्य योजने’ स पाठिंबा देण्यासाठी या सभेला मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, सुतार, शिंपी, प्रभु, माळी, वंजारी, चांभार, कासार, कोष्टी, रामोशी, गवळी, परीट अशा १८ जातींचे दोन-दोन वक्ते मुख्य ठरावावर बोलले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे होते. त्यांनी ब्राह्मणांचे प्रतिनिधी या नात्याने लोकमान्यांनी बोलावे, अशी विनंती केली. ती टिळकांनी मान्य केली. त्या भाषणात टिळक म्हणाले, “आता आपल्याला पूर्वीचे स्वराज्य नको असून पाश्चात्त्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे आहे. आपल्या जातीभेदामुळेच येथे ब्रिटिश राज्य स्थापन झाले आहे व जातिभेद असाच पुढे राहणार असेल तर स्वराज्यातही आमची अशीच अधोगती होईल.” जरी राजकीय भूमिका केंद्रवर्ती असली तरी टिळक सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवत, त्यासंबंधी आपली भूमिकाही मांडत.

 

१९१७ साली राष्ट्रीय मराठ्यांची पहिली भारतीय परिषद महर्षी शिंदे यांच्या पुढाकाराने बेळगावला भरली. त्यावेळी शिंद्यांवर ‘टिळकांचे बगलबच्चे’, ‘ब्राह्मणाळलेले शिंदे’ अशी टीका झाली. त्याचवेळी काँग्रेसच्या जिल्हा अधिवेशनात टिळक आणि शिंदे दोघांचीही अथणीला भेट झाली. यावेळी असहकाराची मोठी चळवळ चालू होती. ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ने त्यात सहभागी व्हावे की न व्हावे, असा एक मतप्रवाह निर्माण झाला. याचे कारण ‘मिशन’ला सरकारी अनुदान मिळत होते. त्यासंदर्भात विचारणा शिंदे यांनी टिळकांकडे केली. त्यावेळी टिळकांनी ही बाब माहीत असल्यामुळे ‘मिशन’ने यात सहभाग घेऊ नये, असे सुचविले. त्यावेळी शिंदे यांनी लिहिले आहे- ‘’डिप्रेस्ड क्लासेस मिशन’वर ‘केसरीकार’ म्हणून नसला तरी ‘टिळक’ म्हणून त्यांचा विश्वास बसला होता.”

 

टिळकांच्या सामाजिक भूमिकेबाबत व अस्पृश्यांविषयक कार्यासंदर्भात काही घडामोडी या काळात घडल्या. त्याचा महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळी-कार्यावर मोठा प्रकाश पडतो. १९१८ च्या सुमारास मुंबईला पन्हाळा लॉजवर करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचा मुक्काम होता. डॉ. कुर्तकोटी हे शिंदे यांचे जवळचे स्नेही होते. त्यांनी त्यावेळी गप्पा मारायला महर्षी शिंदे यांना बोलावले होते. त्यावेळी शंकराचार्य शिंदे यांना म्हणाले की, “अस्पृश्यता निवारण कार्याचा भाग म्हणून आपण एक अस्पृश्यतानिवारक परिषद घ्यावी. या कामी लोकमत जागृतीसाठी शंकराचार्य या नात्याने मी स्वतः आज्ञापत्रे काढेन. तसेच शिंदे यांनी या कामी लो. टिळकांचेही साहाय्य घ्यावे,” अशी सूचनाही केली. परिषदेच्या नियोजनाची चर्चा करण्यासाठी शिंदे यांनी टिळकांनाही पन्हाळा लॉजवर बोलावले होते. शिंदे यांनी याकामी पुढाकार घेतला. दि. २३ व २४ मार्च १९१८ रोजी ‘मिशन’च्या वतीने मुंबईत फे्रेंच पुलाजवळील भव्य मंडपात अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन केले. या परिषदेला बहुतांश अस्पृश्यांचे पुढारी व विविध जातीधर्मातील मंडळी हजर होती. अधिवेशनाचे अध्यक्ष होते, महाराजा सयाजीराव गायकवाड, अधिवेशनाचे सेके्रटरी होते महर्षी शिंदे. या अधिवेशनाला म. गांधी, रवींद्रनाथ ठाकूर यांच्या आलेल्या शुभेच्छापत्रांचे वाचन शिंदे यांनी केले. टिळकांना त्या दरम्यान इंग्लंडला जायचे असल्यामुळे ते येण्यास कां-कू करू लागले. एवढ्याने माघार घेणारे शिंदे कसले...? त्यांनी लिहिले आहे,”...पण, मी देणेकऱ्यांप्रमाणे धरणेच घेतल्यामुळे बिचारे करतात काय? ‘लोकमान्य’ होणे हे सुखाचे नाही. तो काट्याचा मुकुट डोईस कसा खुपतो. विशेषतः पुढे हा मुकुट त्यांच्या कपाळावर कसा रूतला, हे माझ्या प्रत्यक्ष दृष्टीस आले. कारण ‘केसरीकर्ता’ म्हणून नव्हे, तर केवळ ‘टिळक’ म्हणूनच मी या परिषदेस येतो,” असे सांगायला टिळक विसरले नाहीत. शिंदे यांच्या या परखड म्हणण्यातून टिळकांच्या भूमिकेबद्दल वेगळा प्रकाश पडतो.

 

टिळक प्रत्यक्ष या सभेला दुसऱ्या दिवशी आले. सभेला सात हजारांहून अधिक गर्दी लोटली होती. टिळकांनी या सभेत जोरदार आणि आवेशपूर्ण भाषण केले. अस्पृश्यांसंबंधी आपली थेट अशी भूमिका मांडली. त्यांचे हे भाषण फार गाजले. टिळक भाषणात म्हणाले, “पेशव्यांच्या वेळीही अस्पृश्यांनी भरलेल्या पखालीतील पाणी ब्राह्मण प्याले. “If a God were to tolerate untouchability, I would not recognize him us god at all” अर्थात, “अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्यास देवच म्हणणार नाही. (हे उद्गार ऐकून जो गजर उडाला, त्यात मंडप कोसळून पडतासे वाटले,” शिंदे) मी येथे जरी आज शरीराने प्रथमच आलो आहे, तरी मनाने या चळवळीत नेहमीच आहे. जुन्या काळी ब्राह्मणांच्या जुलुमाने ही चाल पडली, हे मी नाकारीत नाही. पण, या रोगाचे आता निर्मूलन झालेच पाहिजे.”

 

शिंदे यांच्या या अधिवेशनाची जागरूककारांनी ‘रा. वि. रा. शिंद्यांची सर्कस’ म्हणून हेटाळणीच्या सुरात टिंगल केली. अधिवेशनाच्या निमित्ताने शिंदे यांनी या प्रश्नावर सर्व जातीच्या पुढाऱ्यांत सहमती व्हावी म्हणून एक जाहीरनामा काढला की, “तसेच आम्ही खाली सह्या करणारे असे जाहीर करतो की, आमच्या स्वतःच्या बाबतही प्रसंग येईल तेव्हा वरील ठराव अमलात आणणे, हे आमचे व्यक्तीविषयक कर्तव्य आहे.” शिंदे अधिवेशनानंतर सह्या घेऊ लागले. रा. गो. भांडारकर, न. चिं. केळकर, रवींद्रनाथ ठाकूर, काशीबाई कानिटकर, बिपीनचंद्र पाल, अॅनी बेझंट अशा ३०० मंडळींच्या सह्या शिंदे यांनी घेतल्या. जाहीरनाम्यावर शिंदे टिळकांकडे सही घेण्यासाठी गेले, त्यावेळी टिळक सही करेनात. त्यांची द्विधा अवस्था झाली. त्याप्रसंगी त्यांचे अनुयायी असणारे केळकर व दादासाहेब खापर्डे यांनी तत्काळ सही दिली. काकुळतीला येऊन शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवून आर्जवी स्वरात टिळक शिंदे यांना म्हणाले, “इंग्लंडहून येईपर्यंत तरी हा आग्रह सोडावा.” एका दालनात नेऊन त्यांच्या सुधारणेबद्दलच्या गोष्टी ते शिंदे यांना सांगू लागले. शेवटी त्यांनी सही केलीच नाही. शिंदे यांनी परत टिळकांना सहीबाबतचे पत्र पाठवले. त्याला टिळक यांनी २ ऑगस्ट रोजी उत्तर दिले आहे. ते असे- “तुमचे पत्र मिळाले. मॅनिफेस्टोच्या अखेरच्या परिच्छेदामध्ये माझ्यावर व्यक्तिगत जबाबदारी टाकण्यात येत आहे. म्हणून सध्याच्या माझ्या परिस्थितीत ती मी पार पाडू शकत नाही. याबद्दल क्षमा असावी.” या बाबतीत य. दि. फडके यांनी एक निरीक्षण असे नोंदवले आहे की, “राजकीय बाबतीत इंग्रज राज्यकर्त्यांना निर्भयपणे झेप घेऊन तुटून पडणारे लोकमान्य टिळक सामाजिक प्रश्नाबाबत आस्तेकदम बदल करण्याचे परंपरानिष्ठ धोरण स्वीकारीत असून आपल्या सनातनी अनुयायांच्या दडपणामुळे नमत असत. ही वस्तुस्थिती कोणास आवडो वा ना आवडो, मान्य करावीच लागते.” (‘शाहू छत्रपती आणि लोकमान्य’, य. दि. फडके, पृ.२४७) याशिवाय जातप्रश्नावर टिळक सांभाळून भूमिका घेताना दिसतात. लोणावळा येथे पुणे जिल्हा सभेत टिळक म्हणाले होते, “आमचे शिंदे म्हणतात अमुक अस्पृश्य. अस्पृश्य कोण या अधिकारवर्गाशी आम्ही सारेच अस्पृश्य झालो आहोत. ब्राह्मणसुद्धा अस्पृश्यच होत.” (य. दि. फडके,पृ.२४८)

 

लोकमान्य टिळक यांच्याबद्दल महर्षींना नितांत आदर असला तरी त्यांच्या परंपरानिष्ठ सामाजिक भूमिकेबद्दल स्पष्ट अशी भूमिका मांडायला ते कचरत नसत. लोकमान्य टिळक नोव्हेंबर १९१८ मध्ये इंग्लंडहून परत आले, त्यावेळी पुण्याच्या नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार व मानपत्र देण्याचे योजिले होते. या मानपत्रास विरोध म्हणून पुण्यात चांगलेच वातावरण तापले होते. सत्काराला विरोध म्हणून एक जाहीर सभा पुण्यात झाली. त्यामध्ये र. पु. परांजपे, वा. रा. कोठारी, महर्षी शिंदे, जेधे-जवळकरांचा समावेश होता. या विरोधात काढलेल्या पत्रकावर सही करताना शिंदे यांनी म्हटले आहे- “सामाजिक बाबतीत लो. टिळकांचे धोरण समतेच्या व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वास विघातक असल्याने त्यांना पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे मानपत्र देणे योग्य नाही.” (विजयी मराठा श्रीपतराव शिंदे, १९७३)

 

सामाजिक सुधारणेबाबत, त्यांच्या कार्यपद्धतीबाबत दोघांत मतभेद असले तरी दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता. सार्वजनिक समारंभास सामाजिक जबाबदारी म्हणून ते सहभागी होत. विचारविनिमय करत. टिळक इंग्लंडवरून परत आल्यानंतर पुण्यात सक्तीच्या शिक्षणावरून मोठी धामधूम चालू होती. पुण्यात याबाबत स्त्रियांची एक मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. ही सभा किर्लोस्कर थिएटरात आयोजित करण्यात आली होती. सभेला दोन्ही बाजूचे लोक हजर होते. टिळक त्यावेळी आजारी होते व सिंहगडावर होते. तरीही संयोजक टिळकांना सभेस घेऊन आले. सभास्थानी शिंदे टिळकांच्या शेजारी बसले होते. आजार व दगदगीमुळे टिळक यांनी यात पडू नये, असे शिंदे यांना वाटत होते. तसे त्यांनी टिळकांना बोलूनही दाखवले. तरी टिळक भाषणासाठी उभे राहिले. ते उभे राहताच एकच गोंधळ माजला. काही तरुणांचा तांडा त्यांच्या बाजूने आला. मारामारी सुरू झाली. खुर्च्या फेकल्या जाऊ लागल्या. अंडी आणि भज्यांचा मारा होऊ लागला. त्यावेळी गर्दीतून शिंदे व त्यांचा मुलगा प्रतापराव शिंदे यांनी टिळकांना बाहेर काढले.

 

लो. टिळक आणि शिंदे यांची शेवटची भेट सोलापुरास झाली. टिळक यांच्या सक्तीच्या शिक्षण विरोधाबद्दल शिंदेंनी ‘ज्ञानप्रकाशा’त लेख लिहून सडकून टीका केली होती. त्यावरून टिळक शिंद्यांवर नाराज झाले होते. त्यादरम्यान सोलापुरात सर्व जातींचे सहभोजन काही मंडळींनी आयोजित केले होते. त्यांनी शिंदे यांना विनंती केली की, या सहभोजनास टिळकांनाही आमंत्रित करण्यात यावे. शिंदे विचारणा करण्यासाठी गेले असता, आरंभी टिळक त्यांना रागावून बोलले. नंतर मात्र सोलापुरासच काय, प्रत्यक्ष पुण्यासही असे सहभोजन झाल्यास आनंदाने येण्याचे त्यांनी कबूल केले. त्यावेळी शिंदे यांनी लिहिले आहे- “लोकमान्य हे वरून कठोर, पण आतून कोमल होते. जुलमी सरकारलाही न भिणारे टिळक अंतःकरणाने मवाळ होते.” सोलापुरातील त्यांची ही भेट अखेरची ठरली असावी. त्याविषयी महर्षी शिंदे यांनी म्हटले आहे, “काळाने त्यांच्यावर लवकरच झडप घातल्याने सर्व ग्रंथ आटोपला. आता नुसत्या आठवणी उरल्या.” एकंदरीत लोकमान्य टिळक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यात स्नेहाचे, आदराचेसंबंध होते. आपल्या आपल्या कार्याचे अग्रक्रम त्यांनी ठरवले होते. राजकारण आणि राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा हा टिळकांचा मुख्य अजेंडा होता. आपली सारी शक्ती त्यांनी या बाजूला एकवटलेली होती. तसेच आग्रही विचारांचे पुरस्कर्ते म्हणून त्यांना मोठा अनुयायी वर्ग लाभला. लोकप्रिय नेता म्हणून जनमानसात त्यांना मोठे स्थान मिळाले. त्यासाठी त्यांनी ही लोकप्रियता जपली पाहिजे. त्यांना दुखावता कामा नये. अशी काहीशी टिळकांची भूमिका असावी. त्यामुळेच प्रत्यक्षात आधुनिकतेची चांगली जाण असूनही टिळक परंपरानिष्ठ भूमिका घेताना दिसतात. मग ती सामाजिक भूमिका असो वा कृती करण्याची वेळ असो. मात्र, दोघेही एकमेकांच्या कामाचे मोल जाणत होते. टिळकांच्या राष्ट्रीय कामाबद्दल शिंदे यांना आदर वाटत होता, तसेच त्यांच्याबद्दल स्नेहही वाटत होता. त्या काळातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील लोकांना उभय पक्षातील या ऋणानुबंधामुळे विविध कामात एकत्र सहभागी व्हावे, असे वाटत होते. टिळक आणि महर्षी शिंदे यांच्यातील संबंधाबद्दल डॉ. गो. मा. पवार यांनी ‘आदरपूर्ण विरोधभक्ती’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या मध्यस्थीने अनेकवार टिळक यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न झाला. शिंदे यांच्या समन्वयवादी भूमिकेमुळे हे घडू शकले. गतसमाजेतिहासाच्या चित्रपटावर दडलेल्या अशा अनेक गोष्टी सम्यक आणि संवादी विचाराने समजून घेणे कधीही क्रमप्राप्त ठरते. व्यक्तीस्वभाव, संवेदनस्वभाव, कार्यपद्धती, विचार आणि तत्कालीन काळासंदर्भात इतिहासातील घडामोडींचे आकलन समाजाच्या वाहतेपणाला नेहमीच पोषक ठरू ठरते.

 

(संदर्भ: सदरच्या लेखासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लिखित ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे आत्मचरित्र, सदाशिव विनायक बापट यांनी लिहिलेल्या ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका’, खंड-२, व डॉ. गो. मा. पवार लिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: जीवन व कार्य’ या ग्रंथाचा आधार घेतला आहे.) 

(महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची छायाचित्रे साभार - www. virashinde.com)

- रणधीर शिंदे 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/