ग्रँड ट्रंक रोडचा शेवट

    दिनांक  15-Nov-2018

 


 
 
 
प्राचीन संस्कृतींचा उदय-उगम जसा प्रामुख्याने नदीकिनारी झाला, तशीच व्यापार-उदिमाला चालना दिली ती व्यापारमार्गांनी. या हजारो किमीच्या मार्गांवरुन केवळ वस्तूंची देवाणघेवाण झाली नाही, तर एकापेक्षा अनेक भिन्न संस्कृतीचा मिलाफ साधला गेला. त्याचाच एक साक्षीदार म्हणजे कोलकातापासून ते काबूलपर्यंतचा ग्रँड ट्रंक रोड, ज्याचा आज अमृतसरलाच शेवट होतो.
 

गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली गयेला. एका पिंपळाच्या झाडाखाली. दुःख आहे, दुःखाचा समुदाय आहे, दुःखाचा निरोध करता येतो, आर्य अष्टांगिक मार्गाने दुःखाचा निरोध होतो, ही चार आर्यसत्यं त्याला गवसली. त्यानंतर तो चालत सारनाथला गेला. सुमारे अडीचशे किलोमीटर. एकटा. सारनाथला त्याने पहिला उपदेश केला. धर्मचक्रपरिवर्तन. बुद्ध ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्यावरून व्यापाऱ्यांचे तांडे जायचे, विविध प्रकारचा शेतमाल आणि वस्तू जनावरांच्या पाठीवर लादून. रथ, बैलगाड्या, हत्ती, घोडे, उंट या रस्त्यावरून ये-जा करत. ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात चाणक्य या रस्त्याला ‘उत्तरापथ’ म्हणतो. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिस भारतात आला होता. मगध साम्राज्य पेशावरपासून पाटण्यापर्यंत होतं. याच महामार्गावरून मेगॅस्थेनिस पाटण्याला पोहोचला होता. आपल्या ‘इंडिका’ या ग्रंथात तो नोंदवतो की, चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यकारभारात रस्ते विकास विभाग होता. दिवसभर प्रवास केला की, विश्रांतीसाठी खानावळी होत्या. रस्त्यावर दुतर्फा गर्द छायेचे वृक्ष लावण्यात आले होते. महामार्गाला मिळणाऱ्या वा छेदणाऱ्या रस्त्यांवर कोणतं शहर किती अंतरावर आहे, याच्या पाट्या लावलेल्या असायच्या. ठराविक अंतरावर विहिरी असतील याची खबरदारी घेण्यात आली होती. गौतम बुद्धानंतर काही शतकांनी या महामार्गाची उत्तम बडदास्त ठेवण्यात आली होती, असं मेगॅस्थेनिसच्या वृत्तांतावरून आपल्याला कळतं. मौर्य साम्राज्याच्या काळात हा महामार्ग पाटणा, गया ते तक्षशीला (आजच्या पाकिस्तानातील पेशावर) असा होता. पेशावर ते काबूल हा पुढचा टप्पा होता. तिथून मध्य आशियाला हा मार्ग जोडला होता.

 

 
 

मध्य आशियातले घोडे, गालिचे, लोकरीच्या शाली, मेंढीच्या कातडीच्या वस्तू, इराणमधील मसाल्याचे पदार्थ, उदाहरणार्थ केशर इत्यादी भारतात येत असे. भारतातील सुती व रेशमी कापडचोपड, धान्य, मसाल्याचे पदार्थ, औषधी वनस्पती, औषधं लादलेले व्यापारांचे तांडे मध्य आशिया, चीन, युरोपपर्यंत जात. गुलामांचा व्यापारही होत असे. याच मार्गाने हेरोडोटस पंजाबच्या सीमेपर्यंत पोहोचला होता. बाबरनाम्यामध्ये बाबर नोंद करतो की, दरवर्षी सात, आठ वा दहा हजार घोडे काबूलला येतात. साखर, कापड, मसाले आणि गुलाम घेऊन हिंदुस्थानातून दहा, बारा, पंधरा हजार काफिले काबूलला येतात. काबूलच्या व्यापाऱ्यांचा नफा ३००-४०० टक्के आहे. खुरासान, इराण, अनातोलिया आणि चीन येथूनही काबूलला माल येतो. इथून तो हिंदुस्थानात रवाना होतो. रस्त्यांवरून वस्तूंची वाहतूक होतेच, पण माणसं, जनावरं, माहिती, ज्ञान यांचीही देवाणघेवाण होते.

 

याच महामार्गाने बौद्ध धर्म मध्य आशियात, तिथून चीन, जपान ते पार कोरियापर्यंत पोहोचला. इसवी सनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकात भारतातील आयुर्वेदाचं ज्ञान आणि उपचारपद्धती चीनला पोहोचली होती. औषधी वनस्पती, मोफत इस्पितळं, दवाखाने याबद्दल फासियन (इसवी सन ३९९) आणि ह्युआन त्सांग (इसवी सन ६२६) यांच्या प्रवासवर्णनात माहिती आहे. व्यापारी मार्गावरील बौद्ध मठ व विहार व्यापारी तांड्यांना आरोग्य सेवाही पुरवत होते. बौद्ध धर्माच्या प्रसाराचं ते एक महत्त्वाचं कारण आहे. चीनमधील अॅक्युपंक्चर व नाडी परीक्षा याच मार्गाने भारतीय उपखंडात आली. दुःखाच्या निरासाबाबत बौद्ध कमालीचे संवेदनशील होते. विशेषतः शरीराला होणाऱ्या दुःखाचं वा वेदना, यातनांचं कारण रोग आहेत, त्यांचा निरास झाल्याशिवाय निर्वाणप्राप्ती होणार नाही, अशी बौद्ध भिक्षूंची धारणा होती. त्यामुळे त्यांनी वैद्यकशास्त्राचा अर्थात आयुर्वेदाचा विकास केला. गौतम बुद्धाचं वर्णन ‘सर्वोत्तम वैद्य’ असंही करण्यात आलं आहे. हे बौद्ध भिक्षू मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात विशेष वाकबगार होते. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग त्यांनी दुःखमुक्तीच्या संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केला. फासियन आणि ह्युआन त्सांग याच मार्गाने भारतात आले. फासियन व्यापाऱ्यांच्या तांड्यासोबत आला होता. तो चीनला परतला समुद्रमार्गे. ह्युआन त्सांग मात्र याच मार्गाने परतला. नालंदा विद्यापीठात ह्युआन त्सांग सहा वर्षं होता. त्यावेळी नालंदा विद्यापीठाचा परिसर म्हणजे बिहार, आजचा उत्तर प्रदेश ते पार पंजाब व काश्मीरपर्यंत सम्राट हर्षवर्धनाचं साम्राज्य होतं. त्याची राजधानी होती कनौज. ह्युआन त्सांगला आपल्या साम्राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची जबाबदारी हर्षवर्धनने घेतली होती. भारत-चीन राजनैतिक संबंधांची मुहूर्तमेढ ह्युआन त्सांगने रोवली.

 

 
 

काबूलहून खैबरखिंड उतरून बाबर सिंधू खोऱ्यात आला. तिथून तो दिल्लीवर चाल करून आला. पहिलं पानिपतचं युद्ध बाबर (तो स्वतःला तुर्क समजत असे) आणि इब्राहिम लोधी (अफगाण) यांच्यामध्ये झालं. या युद्धात बाबरने केलेला तोफखान्याचा वापर हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. राणा संगाने बाबरला निमंत्रित केलं होतं. त्याची कल्पना होती की, तैमूरलंगाप्रमाणे लुटालूट करून बाबर परत अफगाणिस्तानला परतेल. मात्र, हिंदुस्थानवर राज्य करण्याचा पक्का निर्धार बाबरने केला होता. त्यामुळे राणा संग त्याच्यावर चालून गेला. या युद्धातही तोफखान्यामुळे बाबरची सरशी झाली. ग्रँड ट्रंक रोडवरून प्रगत युद्धतंत्राने भारतात प्रवेश केला. बाबरच्या निधनानंतर बादशहा झालेल्या हुमायूँचा पराभव केला शेरशहा सुरीने. शेरशहा सुरी अफगाण असला तरीही त्याचा जन्म बिहारमधील सासारामचा. त्याने व्यापाराचं महत्त्व ओळखलं होतं. ‘उत्तरापथ’ या प्राचीन महामार्गाचा जीर्णोद्धार त्याने केला. दर कोसावर एक मनोरा वा मिनार बांधला. आजही शेकडो ‘कोस मिनार’ ग्रँड ट्रंक रोडवर दिसतात. व्यापारी व प्रवाशांसाठी सराया बांधल्या. या महामार्गावर लुटालूट होणार नाही, याचाही बंदोबस्त त्याने केला. महामार्गावर प्रवाशाची वा व्यापाऱ्याची हत्या झाली, माल लुटण्यात आला तर पंचक्रोशीतील गावांच्या मुखियांना जबाबदार धरण्यात येईल, असा हुकूम त्याने काढला होता. ‘सडक-ई-आझम’ असं या महामार्गाचं नामकरण त्याच्याच काळात झालं. पेशावर ते पाटलीपुत्र असणारा हा मार्ग शेरशहा सुरीने हावड्यापर्यंत म्हणजे आजच्या कोलकात्यापर्यंत वाढवला. पुढे तो आजच्या बांगलादेशातील चितगाँगपर्यंत वाढविण्यात आला. मध्य आशिया आणि दक्षिण आशिया यांना या महामार्गाने जोडलं. 

 

मुघलांच्या काळात या महामार्गावर चौक्या उभारण्याची जबाबदारी जमीनदारांवर सोपविण्यात आली होती. आपल्या हद्दीतील महामार्गावर चौक्या उभारण्यासाठी प्रत्येक जमीनदार नाममात्र कर व्यापारी तांड्यांकडून वसूल करत असे. अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत प्रत्येक राज्यकर्त्याने या व्यापारी मार्गावर शांतता-सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घेतली होती. खैबरखिंडीतून आक्रमक आले असं इतिहासाच्या पुस्तकात शिकवलं जातं. परंतु, एकाही आक्रमकाने व्यापारी तांड्यांवर हल्ले केले नाहीत. व्यापारी तांड्यांच्या लुटालुटीच्या घटना फारच कमी होत्या. या महामार्गावर शांतता नांदावी यासाठी उझबेकिस्तान, बुखारा या राज्यांशी मुघलांनी करार केले होते. या मार्गावर लुटालूट करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अकबराने खास मोहीम राबविली होती. निकोलाय मनुचि हा इटालियन प्रवासी औरंगजेब आणि मुघलांच्या सैन्यासोबत भारतीय उपखंडात अनेक ठिकाणी हिंडला. त्याने केलेली नोंद : चार झाडांपासून मिळणाऱ्या जिन्नसांची निर्यात मुघलांच्या राज्यातून (हिंदुस्थान) होत असे. एका झुडुपाला कापसाची बोंडं लागतात. त्यांच्यापासून जाडभरडं आणि मुलायम अशा दोन्ही कापडांचं उत्पादन घेतलं जातं. युरोप, पर्शिया, अरबस्तान आणि जगाच्या अन्य भागात हिंदुस्थानी वस्त्रांना भरपूर मागणी होती. दुसरं झाड निळीचं. तिसरी अफू, तिला जावा किनारपट्टीवरून खूप मागणी होती. चौथं तुतीचं झाड. त्यावर मलबेरी रेशमाचे किडे पोसले जातात. रेशीम झाडावर लागत असे. युरोपियन आणि अन्य व्यापाऱ्यांना या चार वस्तूंचा पुरवठा करून हिंदुस्थानला रुप्यामध्ये (चांदी) उत्पन्न मिळत असे.

 

 
 

या महामार्गावर सर्वाधिक संख्या हिंदू व्यापाऱ्यांची होती. कारण, मुसलमानांमध्ये व्याज घेण्यावर बंदी होती. खरीप आणि रब्बी हंगामापूर्वी हे व्यापारी शेतकऱ्यांना कर्ज देत. शेतमालाद्वारे शेतकरी कर्जाची परतफेड करत. त्याशिवाय हे व्यापारी शेतकऱ्याकडील अतिरिक्त मालही विकत घेत. कारागीरांना कर्जपुरवठा करून पक्क्या मालाच्या पुरवठ्याची व्यवस्था करत. मध्य आशियात हा माल ते विकत. कोणत्या मालाला, कुठे, किती मागणी आहे याची अचूक माहिती त्यांना असे. समरकंद, बुखारा व मध्य आशियातील अनेक राज्यांमध्ये या व्यापाऱ्यांच्या पेढ्या होत्या. त्यांची व्यवस्था सरायांमध्ये केली जात असे. त्याला ‘हिंद सराय’ म्हणत. शेतीसाठी कर्ज देणं, शेतमाल विकत घेणं, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कर्ज देणं, शेतमाल व पक्क्या मालाची विक्री करणं, ठेवी स्वीकारणं, व्याजाने कर्ज देणं, विविध प्रकारच्या ‘हुंड्या’ म्हणजे आधुनिक भाषेत फायनान्शियल इन्स्ट्रूमेंट्स होती, चेक, ओव्हरड्राफ्ट इत्यादी प्रकारची. प्रत्येक राज्यात वेगळं चलन होतं. त्यामुळे विदेशी चलनाचा व्यापारही ते करत. या व्यापाऱ्यांमुळे ग्रामीण भागात लिक्विडिटी वा पैसा लोकांच्या हाती खेळता राही. त्यातून सरकारला कर व अन्य उत्पन्न मिळे. दिल्लीचे सुलतान असोत वा मुघल बादशहा, यांच्याशी या व्यापाऱ्यांचे संबंध म्हणूनच सलोख्याचे होते. मुलतान हे आर्थिक घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र होतं. मुलतानच्या अनेक व्यापाऱ्यांनी शीख धर्माचा स्वीकार केला. त्यांना वाट पुसत मारवाडी या व्यापारात शिरले. मुघलांच्या सैन्यात राजपूत मोठ्या प्रमाणावर होते. राजपूत सरदार ज्या प्रदेशात गेले तिथे मारवाड्यांनी आपल्या पेढ्या स्थापन केल्या. मुघल सत्तेमुळे मारवाड्यांनी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार सिंधू, गंगा, यमुना खोऱ्यात आणि नंतर दख्खनमध्येही केला. पूर्व अफगाणिस्तानातील प्रत्येक गावात एक हिंदुस्थानी बनिया आहे, अशी नोंद एलफिन्स्टनने केली आहे. सम्राट अशोक आणि मुघलांच्या एकछत्री अमलाचा काळ वगळता काबूलपासून गंगाखोऱ्यापर्यंत एका राजाची सत्ता कधीही नव्हती. किंबहुना, विविध केंद्री राज्यव्यवस्था हेच हिंदुस्थानचं वैशिष्ट्य ठरलं आहे.

 

मुघल सत्ता खिळखिळी होऊ लागल्यावर ब्रिटिशांनी गंगा-यमुना खोऱ्यात शिरकाव केला. परंतु, पंजाब, सिंध, बलुचिस्तान, जम्मू-काश्मीर आणि काबूलवर राजा रणजित सिंगाची सत्ता होती. या काळातील ग्रँड ट्रंक रोडच्या स्थितीबाबत एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेल्या नोंदी उद्बोधक आहेत. फिरोझपूर ते अमृतसर आणि लाहोर ते दिल्ली (रणजित सिंगाचं राज्य वा पंजाब) अतिशय वाईट आहे. रस्ते नसलेल्या प्रदेशात हालचाली करण्याचं तंत्र हिंदुस्थानातील लष्कराने आत्मसात केलं आहे, रसदही याच प्रकारे पुरवली जाते. त्यामुळे रस्त्यांची निगराणी राखण्याची गरज राज्यकर्त्यांना वाटत नसावी. रणजित सिंगाने तर महामार्गावर अनेक कर लावलेले असल्याने आयात-निर्यात व्यापारावर विपरीत परिणाम झाला आहे. अतिशय धनवान राज्यकर्त्यांच्या राज्यात रस्त्यांची स्थिती शोचनीय आहेव्यापाराला गती देऊन सरकारी महसुलात वाढ करण्याला ब्रिटिश ईस्ट कंपनीने प्राधान्य दिलं. १८५४ साली कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली आणि रस्तेबांधणीला अग्रक्रम दिला. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने हिंदुस्थानात शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. जबलपूर ते मिर्झापूर, कोलकाता ते दिल्ली, आग्रा ते मुंबई या रस्त्यांची बांधणी केली. १८३९ ते १८४९ या एका दशकात ग्रँड ट्रंक रोडवर ४९ लाख रुपये खर्च करण्यात आले. अतिरिक्त ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. रस्त्यांची बांधणी आणि व्यापार-उदीमाला गती मिळाल्याने व्यापारीवर्गाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सर्वतोपरी सहकार्य देऊ केलं. बंगालचा नवाब, सिराज उद्दौलाची हकालपट्टी करण्याच्या कटात मारवाडी व्यापाऱ्यांनी, विशेषतः मुर्शिदाबादचा जगत सेठ याने महत्त्वाची भूमिका निभावली. पंजाब ताब्यात घेतल्यावर ब्रिटिशांनी कोलकाता ते पेशावर हा प्राचीन मार्ग नव्याने बांधून काढला. त्यालाच म्हणतात ‘ग्रँड ट्रंक रोड.’ सम्राट अशोक आणि मुघल साम्राज्याचा वारसा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आला होता.

 

 
 

ग्रँड ट्रंक रोडवरील ढाबे वा खानावळी आजही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इराणी, तुर्की, अफगाणी, बंगाली, उत्तर भारतीय, बिहारी अशा विविध खाद्यसंस्कृतीतले पदार्थ या मार्गावर पूर्वीपासून मिळतात. अमृतसर ही पंजाबची खाद्य राजधानी. तिथली तंदुरी रोटी इराणमधून आली. त्याशिवाय तिथे गेलेल्या बंगाली खानसाम्यांनी समोशांचे वेगळे प्रकार लोकप्रिय केले आहेत. सातपदरी समोसा बहुधा केवळ अमृतसरमध्येच मिळतो. तंदुरी चिकनचा शोध पेशावरचा. फाळणीनंतर दिल्लीत आलेल्या निर्वासितांनी तंदुरी मुर्गी वा चिकन टिक्का कबाब लोकप्रिय केले. त्यांचा प्रसार संपूर्ण भारतात झाला आहे. मुघलाई खाद्यसंस्कृती म्हणजे इराणी आणि भारतीय पाककलेचा संगम आहे. मुसलमानांना डुक्कर निषिद्ध आहे तर हिंदूंना गाय. त्यामुळे मुघलाई पदार्थांमध्ये कोंबडी आणि बकऱ्याच्या मांसाचे विविध पदार्थ आहेत. बिर्याणी, मुघलाई पराठा, मुर्ग मुसल्लम कबाब, मलाई कोफ्ता, खिचडा हे मुघलाई पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत. त्यातील मुघलाई पराठ्याला कोलकात्यात पहिली पसंती दिली जाते. मुघलाई पराठ्याच्या सारणात खिमा, अंडे, कांदा आणि मिरी यांचं महत्त्व मोठं आहे. कोलकात्यात मासे वगळता सर्वाधिक लोकप्रिय मांसाहारी पदार्थ मुघलाई आहेत. कबाब इराणमधूनच आले. खिमा वा मांसाचे तुकडे भाजणे यामध्ये कबाबांची गंमत आहे. मुघलाई पाककलेत या मांसाला विविध भारतीय मसाल्यांच्या स्वादात बुडवलेलं असतं. त्यामुळे मांस तोंडामध्ये सहज विरघळतं आणि मसाल्यांच्या स्वादाने मन खुश होतं. इराणी कबाब अगदीच मिळमिळीत असतात. केवळ मीठ शिंपडून खायचे. ‘रोगन जोश’ या काश्मिरी पदार्थाचं मूळ मध्य आशियात आहे. त्यामध्ये भारतीय मसाल्यांचा स्वाद आल्यावर ते काश्मिरी झाले. हे भारतीय मसाले ग्रँड ट्रंक रोडनेच काश्मीरपर्यंत पोहोचले. फालुदा म्हणजे गव्हाच्या शेवया. त्या इराणातून आपल्याकडे आल्या. गव्हाचा चीक नाशिक, नगरकडे खूप लोकप्रिय आहे. गव्हाच्या चिकापासूनच बदामी हलवा करतात. गहू भिजत घालून, कांडून त्याची सालं वेगळी करण्याची पद्धतच इराणकडची आहे. त्यामुळे मैद्याचे म्हणजे मऊसूत पदार्थ तयार होतात, उदा. रुमाली रोटी. जिलबी, गुलाबजाम ग्रँड ट्रंक रोडवरून भारतात आले. आज ते भारतातल्या प्रत्येक शहरात पोहोचले आहेत.

 

मध्य आशियातली फळं-सफरचंद, कलिंगड, द्राक्षं, बदाम, अक्रोड, जर्दाळू, ग्रँड ट्रंक रोडनेच भारतात आली. सम्राट अशोकानंतर फळांच्या बागा बहुधा मुघल सम्राटांनीच लावल्या. लखनौजवळ मलिहाबाद आहे. तिथला दशहरी आंबा सुप्रसिद्ध आहे. दशहरी आंब्याची जात पठाणांनी तयार केली. मलिहाबादमध्ये पठाणांची संख्या सर्वाधिक आहे. आंब्याच्या बागा, आंब्याची निर्यात हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. सातशे वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातले पठाण मलिहाबादला स्थायिक झाले. पेशव्यांच्या फौजेतले गारदी म्हणजे पठाण; खैबरखिंड पार करून ग्रँड ट्रंक रोडनेच हिंदुस्थानात आलेव्यापार-नवीन वस्तू, सेवा, माणसं, भांडवल, कल्पना, विचार, सुरक्षितता व सैन्य यांची देवाणघेवाण व विनिमय असतो. भांडवल, वस्तू व सेवा यांचा अनिर्बंध संचार म्हणजे जागतिकीकरण. नवीन तंत्रज्ञानामुळे व्यापाराच्या पारंपरिक मार्गांची-महामार्ग आणि समुद्रमार्ग, कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढली आहे. हवाई मार्ग आणि आंतरजाल हे नवे मार्ग वेगाने आगेकूच करत आहेत. बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्हहा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला आहे. दीड ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे. ६५ देश या प्रकल्पामध्ये नव्या व्यापारी मार्गांनी जोडले जाणार आहेत. त्याशिवाय ऊर्जा प्रकल्प, बंदर विकास अशा हजारो छोट्यामोठ्या प्रकल्पांमध्ये चीन गुंतवणूक करणार आहे. पाकिस्तानातील ग्वादार बंदरातून चीनला जोडणारा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हळूहळू आकार घेतो आहे. हिंदुकुश आणि काराकोरम या हिमालयाच्या उत्तुंग रांगांवरून हा रस्ता जाणार आहे. त्याशिवाय इंधनाच्या पाईपलाईन्स आणि ऑप्टिकल फायबर. या प्रकल्पामुळे पाकिस्तानात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ग्रँड ट्रंक रोड पूर्व पश्चिम होता, तर चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर दक्षिण-उत्तर आहे. पाकिस्तानचा चेहरामोहरा त्यामुळे बदलणार आहे.

 

 
 

चीनच्या या प्रकल्पाला प्रतिसाद म्हणून भारताने ‘लुक ईस्ट’ धोरणाचं रुपांतर ‘अॅक्ट ईस्ट’ कार्यक्रमात केलं आहे. म्यानमार, थायलंड या पूर्व आशियायी देशांना जोडण्याचा हा प्रकल्प आहे. आज ईशान्य भारताशी असलेला आपला संबंध सिलीगुडी या बारक्याशा पट्ट्याद्वारे आहे. ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणानुसार कोलकाता-म्यानमार हा सागरी मार्ग आणि तिथून मिझोराममार्गे ईशान्य भारत असा वेगळा मार्ग खुला होणार आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे. ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचं रुपांतर आशिया-आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरमध्ये करण्याची चाचपणी सुरू आहे. ‘बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ आणि आशिया-आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरमुळे भारतीय उपखंडाचं भूराजकीय अर्थकारण आमूलाग्र बदलणार आहे. भारताच्या भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अर्थ-राजकारणात मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीन महानगरांना महत्त्व येणार आहे. काबूल ते कोलकाता या प्राचीन ग्रँड ट्रंक रोडच्या मध्यभागी दिल्ली आहे. मात्र, बदललेल्या परिस्थितीत भारताच्या अर्थ-राजकारणाला गती देण्याची शक्ती ग्रँड ट्रंक रोड गमावून बसला आहे. अमृतसर ते कोलकाता एवढाच उरला आहे. १९८४ साली कोलकात्याला गेलो होतो, तेव्हा मी एकाला विचारलं, “ग्रँड ट्रंक रोड नेमका संपतो कुठे?” “खत्म कैसे होगी? यहाँ से शुरू होती हैं बादशाही सडक,” असं उत्तर मला मिळालं होतं. आज हा प्रश्न विचारला तर उत्तर वेगळं मिळेल. कारण ग्रँड ट्रंक रोडचे दिवस आता संपल्यातच जमा आहेत.

 

- सुनील तांबे

 

संदर्भः

. कॅरॅवान्स इंडियन मर्चंट्स ऑन द सिल्क रोड, स्कॉट सी. लेवी, पेंग्विन इंडिया

. बाबरची स्मृतिचित्रे, अनुवादक- डॉ. ह. रा. दिवेकर, साहित्य अकादमी

. ग्रँड ट्रंक रोड इन पंजाब : १८४९-१८८६, के. एम. सरकार

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/