उपेक्षित शेजाऱ्याच्या अपेक्षा...

    दिनांक  15-Nov-2018   

 


 
 
निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात, पण शेजारी उपेक्षित असेल तर आपल्या घरात सोडून त्याचे लक्ष दुसऱ्याच्या घरातच जास्त असते. त्यामुळे स्वत:चं घर तर त्यांना कधी सांभाळता येतच नाही. अशीच सध्या गत आहे ती उपेक्षितस्तान म्हणजे अर्थातच पाकिस्तानची.
 

स्वत:चा असा इतिहास, संस्कृती काही नसताना केवळ शेजाऱ्यांवर अवलंबून असणारा हा देश, त्यातच भिकेचे डोहाळे लागले असताना, माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांनी चीनकडून आर्थिक मदत घेतली. निवडून येण्यासाठी हातभर लांब आश्वासन दिल्यानंतर आता आपले अपयश लपवायचे कसे, यासाठी इमरान खान यांची सगळी धडपड. त्यातच काही दिवसांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय संस्थेने पाकिस्तानची एकूणच परिस्थिती अगदीच वाईट असल्याचे नमुने साऱ्या जगासमोर मांडले. मानवी हक्कासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या मते पाकिस्तानच्या या सर्व परिस्थितीचे कारण आहे अशिक्षित जनता. या संस्थेच्या अहवालानुसार पाकिस्तानात सध्या दोन कोटी मुले अशी आहेत, जी शाळेत जाऊ शकली नाही आणि यात अर्थातच मुलींची संख्या सर्वात जास्त आहे. याचे कारण पाकिस्तानातील वाढती गरिबी. ‘ह्यूमन राईट वॉच’ या संस्थेने ‘मुलांना खायला घालू की शिक्षण देऊ’ याच धर्तीवर एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार इमरान खान यांनी पंतप्रधानांनी आपल्या घोषणापत्रात देशातील मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र आता खुर्चीची हवा लागल्यावर खान यांना या गोष्टीचा विसर पडल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले. अद्याप ३२ टक्के मुली शिक्षणापासून वंचित आहेत तर, शालाबाह्य मुलांची टक्केवारी आहे २५. याचे मूळ कारण म्हणजे पाक सध्या भिकेला लागला आहे, कारण देशातील ५८ टक्के कुटुंबीयांकडे मुलांच्या प्राथमिक शिक्षणाकरिताही पैसे नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यातच खालावलेली आर्थिक स्थिती. यातही पाकिस्तान मुसंडी मारेल आणि आम्ही सगळ्यांचे हिशेब चुकते करू, अशी दिवास्वप्नं सध्या इमरान खान पाहत आहेत.

 

उल्लेखनीय म्हणजे हा काही इमरान खान यांच्यामुळे उपस्थित झालेला प्रश्न नाही, मुळातच स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर, पाकिस्तानने शिक्षणाकडे उपेक्षेच्या दृष्टीनेच पाहिल्याचे चित्र दिसते, त्यामुळे या गोष्टीचे सोयरसुतक पाकिस्तानातील नेतेमंडळींना नाही. २०१७ च्या सरकारी शैक्षणिक अहवालानुसार तर पाक सरकारने आपल्या घरेलू उत्पादनाच्या केवळ २.८ टक्के रकमेचा खर्च मुलांच्या शिक्षणावर केला, ही आकडेवारी पाकिस्तानची शिक्षणाकडे पाहण्याची मध्ययुगीन मागास वृत्ती अगदी लख्खपणे दर्शविते. त्यामुळे स्वत:चं घर सांभाळता येत नसलं तरी, चालेल, आम्ही दुसऱ्याच्या घरात नाक खुपसणार या वृत्तीमुळेच, तो देश नेहमीच अयशस्वी ठरला. पाकिस्तानच्या याच अपयशावरुन शाहिद आफ्रिदीने घरचा आहेर दिला. यापुढे काश्मीर आमचेच, असे गळे काढणाऱ्या पाकिस्तानला, “आधी आपलं घर सांभाळा मग काश्मीर मागा,” अशा शब्दांत क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने सुनावले. एका पत्रकार परिषदेत त्याने सरकारलाच जाब विचारला आणि पाकिस्तानमधील जनतेला सांभाळताना पाकिस्तानी सरकारच्या नाकी नऊ येत आहे. तिथे हे काश्मीरला काय सांभाळणार? असा थेट सवालही त्याने केला. पण त्यातही आपले अकलेचे तारे तोडायला आफ्रिदी विसरला नाही आणि काश्मीर भारतालाही न देता त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली. ही अशी गरळ ओकण्याची आफ्रिदीची काही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारतीय लष्कराने खात्मा केलेल्या १३ दहशतवाद्यांबाबत आफ्रिदीने सहानुभूती व्यक्त केली होती. यावरूनच पाकिस्तानात शिक्षण का हवे, याची जाणीव होते. त्यामुळे देशातील राजकीय आणि आर्थिक अस्थिरता पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत आहे, त्यामुळे याचा थेट परिणाम येथील लोकांच्या राहणीमानावर होत आहे, या अहवालानुसार खरंतर हा देश येत्या काही वर्षांत राहण्यासाठी अयोग्य असलेल्या देशांच्या यादीतही येऊ शकतो. त्यामुळे हा अपयशी शेजारी कधीतरी प्रगती करेल, अशी चिन्हे काही दिसत नाहीत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/