यंत्रमानवाच्या जगात...

    दिनांक  15-Nov-2018सांगाल ती कामं करणारे रोबो आणि जणू दैवी चमत्काराप्रमाणे कार्यान्वयन करणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रणाली आजच्या माहिती-तंत्रज्ञानयुगात नवीकोरी नाहीच. पण, यंत्रमानवाच्या या जगात प्रवेश करताना या क्षेत्राचा रोजगाराच्या संधींवर, अर्थव्यवस्थेवर आणि एकूणच समाजावर होणारा परिणाम दुर्लक्षित करुन चालणार नाही. तेव्हा, रोबोटिक्स आणि कालपरत्वे झालेले, होऊ घातलेल्या बदलांचा घेतलेला हा आढावा...

 

जानेवारीमध्ये अमेरिकेच्या सिऍटल शहरात अॅमेझॉन कंपनीने ‘अॅमेझॉन गो’ नावाचं किराणा मालाचं दुकान उघडलं. खरंतर ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ या ऑनलाईन बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अॅमेझॉन’ने आपली ऑनलाईन असलेली कर्मभूमी सोडून दुकान का काढावं? असा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर मात्र लक्षात येईल की, हे साधंसुधं किराणामालाचं दुकान नसून एक संपूर्णपणे स्वयंचलित दुकान आहे. या दुकानात बिल काऊंटर किंवा त्या काऊंटरवर काम करणारे कर्मचारी नाहीत. दुकानात शिरताना गिऱ्हाईकांना आपल्या स्मार्ट फोनवर ‘अॅमेझॉन गो’ या अॅपद्वारे एक कोड मिळतो. दुकानातले कॅमेरे आणि अन्य सेन्सर गिऱ्हाईकांचा माग काढत त्यांनी कोणत्या वस्तू उचलल्या याचा हिशोब ठेवतात. दुकानातून बाहेर पडलं की, आपोआप त्यांच्या क्रेडिट कार्डावर बिल पाठवलं जातं. यांत्रिकीकरण आणि रोबोटिक्स हे आता स्वयंचलित दुकानांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ‘टेस्ला’ आणि ‘गुगल’सारख्या कंपन्यांचं स्वयंचलित गाड्यांमधील संशोधन आता फळ देऊ लागलं आहे. ‘टेस्ला’च्या सध्याच्या वापरातल्या गाड्याही काही अंशी स्वयंचलितच आहेत. दुबईमध्ये शहरातल्या शहरात प्रवासासाठी ड्रोन टॅक्सींच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. ड्रोन टॅक्सी म्हणजे खरंतर स्वयंचलित, चालकविरहित विमानं. आत्ता-आत्तापर्यंत टेहळणी आणि दहशतवादविरोधी कारवायांकरिता वापरली जाणारी ही विमानं विकसित देशात आता सामानाच्या वितरणासाठी, म्हणजे अगदी पिझ्झा डिलिव्हरीसाठीदेखील सर्रास वापरली जातात. ही स्वयंचलित दुकानं, गाड्या आणि विमानं पाहिली की एकेकाळी फक्त इंग्रजी सिनेमात आणि कादंबऱ्यांत सापडणारे, अतिशयोक्तीपूर्ण वाटावे असे यंत्रमानव (रोबोट्स) आता खरोखर अस्तित्वात येऊ घातलेत, याची हळूहळू खात्री पटायला लागलीय. पण, वरकरणी मानवी जीवन सुखकर करणाऱ्या रोबोट्सचा रोजगाराच्या संधींवर आणि एकूणच अर्थव्यवस्था आणि समाजावर काय परिणाम होईल, याचे आडाखे बांधणं आता अपरिहार्य झालंय.


 
 

इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की, यांत्रिकीकरणामुळे येणारी बेरोजगारी आणि त्याचे सामाजिक परिणाम मानवी समाजाकरिता नवे नाहीत. अठराव्या शतकात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये घाऊक उत्पादनातून वस्तू स्वस्त झाल्या आणि बहुतांश कारागीर विस्थापित झाले. कालांतराने औद्योगिक क्षेत्रात नव्या प्रकारचं कामही मिळू लागलं. कदाचित याच पार्श्वभूमीवर ‘रोबोटिक्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यांना संयुक्तरित्या नवीन औद्योगिक क्रांतीचा दर्जा दिला जातो आहे. परंतु, या नवीन औद्योगिक क्रांतीचा परिणाम सरसकट सगळ्याच देशांत, सर्व क्षेत्रांवर आणि पातळींवर समान असेल, असे नक्कीच म्हणता येणार नाही. गेल्या काही काळात प्रामुख्याने वित्तविषयक आणि त्या अनुषंगाने सामाजिक विषयांवर संशोधन करणाऱ्या मॅकिंझी (चरलघळपीशू), एशियन डेव्हलपमेंट बँक आणि एमआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोजगारावर काय परिणाम होईल, याबद्दल बरीच भाकितं वर्तवली. या भाकितांमध्ये बराच विरोधाभास जाणवतो. मॅकिंझीच्या श्वेतपत्रिकेत अंदाजे ८० कोटी कामगार बेरोजगार होऊ शकतील, असा अंदाज वर्तवला गेला आहे, तर एमआयटीच्या संशोधनात हा आकडा १०० कोटींवर पोहोचलेला दिसून येतो. ७४४ कोटींची जागतिक लोकसंख्या लक्षात घेता, मॅकिंझी आणि एमआयटीचे हे आकडे एक अत्यंत भयावह चित्र रंगवताना दिसून येतात. इतर संस्थांनी मात्र नोकऱ्या गेल्या तरी नवीन कौशल्य लागणाऱ्या नोकऱ्या निर्माण होत राहतील, अशी शक्यता वर्तवली आहे. आकड्यांमधला हा विरोधाभास समजून घ्यायचा असेल तर रोबोट नेमके कोणत्या प्रकारच्या कामांकरिता वापरले जाऊ शकतात, हे समजून घेणं गरजेचं आहे.

 

जागतिकीकरणाच्या या अपयशातून बरेच काही शिकता येते. एका अर्थाने रोबोटिक्समुळे येऊ घातलेल्या यांत्रिकीकरणाचे परिणाम जागतिकीकरणापेक्षा खूप वेगळे नाहीत. म्हणूनच रोबोटिक्सच्या बरोबरीने शिक्षण, पुनर्प्रशिक्षण आणि सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक मदतीचं धोरण राबवणं अत्यावश्यक ठरेल.

 

आत्तापर्यंत रोबोट प्रामुख्याने २ प्रकारच्या कामांसाठी तैनात केले गेले आहेत. यापैकी पहिल्या वर्गात मोडणारे यंत्रमानव माणसांची जागा न घेता कामं अधिक सुलभ आणि सुरक्षितपणे पार पाडण्यास हातभार लावतात. ज्या कामांत माणसांची अचूकता, वस्तुनिष्ठता अपुरी पडते अशा कामांमध्ये यंत्रमानवांचं सहकार्य अधिक परिणामकारक ठरू शकतं. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रिया आणि रोगनिदान या कामांमध्ये यंत्रमानवांचा शिरकाव व्हायला सुरुवात झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे ज्या कामात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या माहितीचं जलद विश्लेषण करून अत्यंत चपळतेने निर्णय घेणं गरजेचं असतं, अशा ठिकाणीही रोबोट अधिक प्रभावी ठरू लागले आहेत. धोकादायक किंवा अपायकारक वातावरणात पार पाडल्या जाणाऱ्या कामांमध्येही जीवितहानी टाळण्यासाठी यंत्रमानव वापरले जातात. भारतात गेल्या १० वर्षांत अणुशक्तीवर आधारित बरीच वीजनिर्मिती केंद्रे उघडली गेली आहेत. याव्यतिरिक्त रासायनिक उत्पादन करणारे शेकडो कारखाने देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. अशा ठिकाणी होणाऱ्या अपघातांमध्ये तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अन्य परिस्थितीत माणसांऐवजी यंत्रमानवाचा वापर सहजपणे केला जाऊ शकतो. युद्धात वापरले जाणारे सुरुंग शोधून काढण्याचं काम, त्याचप्रमाणे दहशतवादी कारवायांमध्ये टेहळणी करण्यासाठीही यंत्रमानव तैनात केले जाऊ शकतात. बेरोजगार आणि विस्थापनास कारणीभूत ठरणारे यंत्रमानव प्रामुख्याने दुसऱ्या वर्गात मोडतात. विशेष प्रशिक्षण किंवा कौशल्य न मिळवता करता येतील अशी कामं किंवा वारंवार आणि नियमितपणे करावी लागतील, अशी रटाळ कामं करण्यासाठी यंत्रमानव तैनात होऊ लागले आहेत खरे, पण हा बदल विकसित देशांत अधिक प्रकर्षाने दिसून येतो. लेखाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे अमेरिका, युरोप आणि अन्य विकसित देशांत दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहनचालक, हॉटेल्समधील वेटर यांची जागा आता यंत्रमानव घेऊ लागले आहेत. हा बदल भारतासारख्या विकसनशील देशात कितपत आणि कधीपर्यंत येऊ शकेल याचा आढावा घेणं गरजेचं आहे.

 

 
 

विकसित देश आणि भारत यांमधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे लोकसंख्या आणि लोकसंख्येतील विविध घटकांचे समीकरण. कामगारांची उपलब्धता ही एकूण लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येतील विविध घटकांच्या वयोमानावर अवलंबून असते. हे निकष लक्षात घेता भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या जवळजवळ चौपट असल्याचं दिसून येतं. अधिक खोलात गेलं तर लक्षात येतं की, अमेरिकेमध्ये केवळ ३० टक्के जनता पंचविशीच्या खाली आहे, तर भारतामध्ये हा आकडा ५० टक्क्यांवर पोहोचतो. या आकड्यांची शिक्षण आणि कौशल्यनिर्मितीशी सांगड घातली की, दिसून येतं की, उच्च शिक्षण आणि विशिष्ट कौशल्यावर अवलंबून नसलेली कामं स्वस्तात पार पाडणाऱ्या कामगारांचा भारतात तुटवडा नाही. अमेरिकेसारख्या देशांमध्ये मात्र या कामासाठी कैकपटीने जास्त पैसे मोजावे लागतात. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या वर्गात मोडणारी कामं विकसित देशांमध्ये रोबोट्सच्या वाट्याला येऊ लागली आहेत. भारत आणि इतर देशांमध्ये केलेली ही तुलना केवळ लोकसंख्येवर सीमित नाही. यांत्रिकीकरणामुळे उद्भवणारी बेकारी ही प्रामुख्याने औद्योगिक उत्पादनात दिसून येते. परंतु, या औद्योगिक उत्पादनाचा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार यांमधील वाटा अगदी मर्यादित म्हणजे साधारण २५ टक्के आहे. चीनमध्ये मात्र औद्योगिक उत्पादनाचा राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारात सिंहाचा वाटा आहे. याचाच अर्थ असा की, यांत्रिकीकरणामुळे येणारी बेकारी चीनमध्ये सामाजिक अस्वस्थता आणू शकेल, पण भारतात मात्र यांत्रिकीकरणाचे परिणाम मर्यादितच राहतील. लोकसंख्या आणि औद्योगिक उत्पादनाचे अर्थव्यवस्थेतले योगदान बाजूला ठेवले तर इतरही काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात. भारताच्या कामगार कायद्यात अजूनही बऱ्याच कमतरता आहेत. एकप्रकारे जाचक कामगार कायदेच औद्योगिक उत्पादनाच्या मर्यादित योगदानाला कारणीभूत ठरले आहेत. यांत्रिकीकरण आणि यंत्रमानवांच्या मार्गाने उद्योजकांची या कायद्यांतून सुटका झाल्यास मात्र रोजगारावर नक्कीच परिणाम होऊ शकेल.


 
 

यांत्रिकीकरण आणि अनुषंगाने येणारी बेकारी आणि इतर सामाजिक समस्या या विषयांवर जागतिकीकरणाच्या निमित्ताने बराच ऊहापोह झालेला आहे. जागतिक व्यापार, नोकरीच्या निमित्ताने होणारी स्थलांतरं आणि भौगोलिक सीमा वेगाने पार करणारं भांडवल यांचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम जगजाहीर असूनही जागतिकीकरणाचं धोरण व्यापकपणे अंगिकारलं गेलं, त्या सुमारास सोबत येणाऱ्या बेकारी आणि गरिबीवर उपाय म्हणून शिक्षण, पुनर्प्रशिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजनांचाही तत्त्वत: स्वीकार केला गेला. परंतु, प्रत्यक्षात मात्र पुनर्प्रशिक्षण झालंच नाही. शिक्षणावर योजिलेले खर्चही मर्यादितच राहिले आणि सामाजिक सुरक्षेच्या योजनाही अपुऱ्याच पडल्या. जागतिकीकरणामुळे आलेल्या बेकारीतून आणि गरिबीतून बरीच कुटुंबं बाहेर पडू शकली नाहीत. ज्या जहाल राष्ट्रवादाने अमेरिकेत ट्रम्पना राष्ट्रपतीपदी निवडून आणलं, त्याचा उगमही यांत्रिकीकरणाच्या दुष्परिणामांमध्येच सापडतो. जागतिकीकरणाच्या या अपयशातून बरेच काही शिकता येते. एका अर्थाने रोबोटिक्समुळे येऊ घातलेल्या यांत्रिकीकरणाचे परिणाम जागतिकीकरणापेक्षा खूप वेगळे नाहीत. म्हणूनच रोबोटिक्सच्या बरोबरीने शिक्षण, पुनर्प्रशिक्षण आणि सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक मदतीचं धोरण राबवणं अत्यावश्यक ठरेल. रोबोटिक्स आणि बरोबरीने येणारं यांत्रिकीकरण हे विज्ञानाने पाचारण केलेले बदल आहेत. ही वस्तुस्थिती नाकारून किंवा तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने ते थांबणार नाहीत. किंबहुना, विकसित देशांकरिता ऐरणीवर आलेला हा प्रश्न सोडवायला भारताकडे तुलनेने अधिक कालावधी उपलब्ध आहे. तेव्हा रोबोटिक्स आणि बरोबरीने येणारे बदल स्वीकारून योग्य नियोजन आणि आर्थिक साहाय्य यांची सांगड घातल्यास हे बदल अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था सुदृढ करण्यात निर्णायक ठरू शकतील.

 - वसुद तोरसेकर
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/