कोण संपत्ती? कोण आपत्ती?

    दिनांक  14-Nov-2018   


 


निद्रानाश, भूक न लागणे, बेचैनी, चिडचिडेपणा ही केवळ रक्तक्षयाची वा अशक्तपणाचीच लक्षणे नव्हेत, तर मोदीफोबियाचीसुद्धा असू शकतात!!! सध्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून धोबीपछाड मिळण्याच्या भयाने देशभरातल्या मरतुकड्या पक्षांनी आघाडीबळ उभे करण्याचे अभियान चालवल्याचे दिसते. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचे तहहयात अध्यक्ष असलेल्या खा. शरद पवारांनी भाजपला रोखण्याच्या उद्देशाने खिचडी शिजवण्यासाठी काडी शिलगावून पाहिली. सोमवारी मुंबईत आयोजित केलेल्या सरावाच्या डावात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, माकप आणि किसान सभेच्या नेतोजीरावांसमोर राष्ट्रवादीच्या जाणत्यांनी सत्तेच्या सुखापासून पारखे झाल्याने पोटातली मळमळ अन् जळजळ एकदमच बाहेर काढली. “भाजपला राष्ट्रीय आपत्ती समजून हद्दपार करा,” असे आवाहन शरद पवारांनी यावेळी केले. शरद पवारांचे हे आवाहन म्हणजे ज्यांना देशभरातल्या जनतेने २०१४ पासून धु धु धुतले आणि थेट राजसंन्यासाच्या दोरीवर वाळत टाकले, त्या जीर्णशीर्ण झालेल्यांचे केविलवाणे बोलच म्हटले पाहिजे. कारण, याच भुरट्यांच्या भ्रष्टाचारी आणि कुशासनी राजवटीला कंटाळून देशातल्या कोट्यवधी नागरिकांनी त्यांना सत्तेबाहेर फेकले होते. म्हणजे खरी राष्ट्रीय आणि राज्यीय आपत्ती याच लोकांची सत्ता होती, जिला मतदारांनी एका बटणासरशी होत्याचे नव्हते केले. जो माणूस आणि पक्ष सुशासनाचे, विकासाचे पर्व देशात आणू शकेल, त्यालाच इथल्या लोकांनी सत्तासिंहासनावर बसवले. ‘नॅचरली करप्ट पार्टी’ आणि तिच्या जिथे-तिथे उगवलेल्या सरंजामदारांना वाऱ्यावर सोडून जनतेने प्रगतिपथाचा रस्ता निवडला. शरद पवारांसारख्या मुरब्बी आणि राजकारणातील अर्धशतकी अनुभव गाठीशी असलेल्या नेत्याला हे कळत नसेल का? कळत असणारच, पण काय करणार? सवयीने मजबूर असल्याने त्यांना मोदी आणि भाजपविरोधाची टेप वाजवल्याशिवाय चैन कसे पडणार, म्हणा? दुसरीकडे भाजपला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणणाऱ्या शरद पवारांनी एका प्रश्नाचे उत्तर नक्कीच द्यावे. भाजप जर राष्ट्रीय आपत्ती असेल तर खुद्द शरद पवार आणि ते ज्यांच्या गळ्यात गळे घालून इच्छितात ते राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, देवेगौडा वा चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, सीताराम येच्युरी ही मंडळी वा त्यांचे पक्ष काय ‘राष्ट्रीय संपत्ती’ आहेत? आणि तसे काही त्यांना वाटत असले तरी इथल्या जनतेला तसे वाटत नाही! इथली जनता आजही या लोकांना राष्ट्रीय आणि राजकीय आपत्तीच मानतो आणि याची खूणगाठ पवारांसह भाजपच्या पराभवासाठी आतुरलेल्या सर्वच हवशा-नवशांनी बांधलेली बरी. कारण या पक्ष आणि त्यांच्या मालकांना पुन्हा एकदा अडगळीत टाकण्याची जोरदार तयारी इथल्या जनतेने पुन्हा एकदा सुरू केलीच आहे.

 

वारसाचौर्याचे क्रौर्य

 

ज्या देशाला आणि देशातल्या नागरिकांना आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा, अस्मितादर्शक स्थळांचा अभिमान वाटत नाही, त्या लोकांची ओळख आणि पुढे अस्तित्व पुसायलाही वेळ लागत नाही. बहुसंख्य भारतीय तर इथल्या इतिहासावर, संस्कृतीवर, अस्मितादर्शक स्थळांवर निरतिशय प्रेम करत असताना, त्याचा अभिमान बाळगत असताना वरील वाक्य लिहिण्याची गरज काय, असेही कोणाला वाटू शकेल. नुकतेच सिंगापूरमधील भारतीय शिपिंग अधिकारी विजय कुमार यांच्या द आयडॉल थिफ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी विजय कुमार यांनी दिलेली माहिती निश्चितच धक्कादायक आणि एक भारतीय म्हणून खेदजनक, लाजिरवाणीच म्हटली पाहिजे. भारतातून दरवर्षी सुमारे १ हजार प्राचीन आणि मौल्यवान मूर्ती चोरल्या जातात आणि त्यांची तस्करी केली जाते, अशी माहिती विजय कुमार यांनी दिली. चोरलेल्या मूर्तींना आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो, कोट्यवधींच्या किमतींना विकले जाते व नंतर त्यांचा उपयोग बागकामासाठी, फर्निचर म्हणून केला जातो! म्हणजे ज्या कारागीरांनी, शिल्पकारांनी आपल्या छिन्नी-हातोड्याने-पहारीने पाषाणातून इथे एखाद्या कलाकृतीची निर्मिती केली, तिचे मूल्य आणि महत्त्व आपल्याला कळले नाही, असेच नाही. ही आपल्या इतिहासाबद्दल, कलाकृतीबद्दल, संस्कृतीबद्दलची दरिद्री भावनाच नव्हे काय? असो. कधीकाळी शेकडो, हजारो, वर्षांपूर्वी भारतीय शिल्पकारांनी घडवलेल्या कोरीव, घडीव, सुंदरशा मूर्तींची चोरी होताना आणि परदेशी जाताना पाहून कोणालाही वाईट वाटेल. पण, केवळ वाईट वाटून चालणार नाही. काही लोकांकडून मूर्तींची चोरी अन् तस्करी करणार्‍यांना शिव्याही घातल्या जातील, पण ज्यांच्यावर या मूर्तींची पालनाची, संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांचे याप्रति काही उत्तरदायित्व आहे की नाही? इथे केवळ पुरातत्व विभाग वा सरकारला दोष देऊन चालणार नाही. कारण चोरल्या जाणाऱ्या मौल्यवान मूर्तींबाबत पुरातत्व खाते जरी काही कारवाई करण्यासाठी अनुत्सुक असले तरी नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. मूर्तींच्या तस्करीबाबतचे आणखी एक तथ्य म्हणजे, मूळ मूर्तींच्या जागी ठेवलेल्या बनावट प्रतिकृती! म्हणजेच मूळ मूर्तींची चोरी करायची आणि त्या जागी हुबेहूब नक्कल केलेली मूर्ती बसवायची, असा हा कारभार. परिणामी खरी मूर्ती आणि प्रतिकृती यात फरकच करता येत नाही, अशी अवस्था. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी सरकारसह नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे, हे नक्कीच. पण, या मूर्तीमध्ये, शिल्पांमध्ये देशाचा, राष्ट्राचा इतिहास आहे, इथल्या मातीची नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे, हे जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोरले जाणार नाही, तोपर्यंत हे थांबवताही येणार नाही. त्यासाठी आक्रमकांचा इतिहास शिकवण्याऐवजी आपल्या इतिहासाची, संस्कृतीची रुजवण शिक्षणातून करावी लागेल, हे सर्वांनीच लक्षात घ्यावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/