स्टॅन ली आणि ‘व्हाईट मॅन्स बर्डन’

14 Nov 2018 18:58:26


 


जेव्हा प्रचंड स्थिरता येते, तेव्हा भोवतालच्या परिस्थितीविषयी अज्ञान आणि त्याबद्दलची एक सुप्त भीतीदेखील नकळत जन्म घेत असते. त्यामुळे मग व्यवस्था चालवत असताना कोणीतरी एक शत्रू समोर असावा लागतो. नसेल तर काल्पनिक शत्रू उभा करावा लागतो. याच गरजेतून मग अमेरिकन भांडवलवादी व्यवस्थेने सुपरहिरो जन्माला घातले आणि ‘अच्छाई वि. बुराई’ चा खेळ सुरू केला.

 

जेव्हा साऱ्या मानवजातीपुढे अंधःकार पसरतो, दुष्ट शक्ती फोफावू लागतात आणि चांगुलपणाचा गळा घोटू लागतात, तेव्हा एक सर्वशक्तिमान, अलौकिक ‘हिरो’ जन्म घेतो आणि साऱ्या दुष्टांचं निर्दालन करतो. या हिरोंकडे अशा शक्ती असतात, ज्या सर्वसामान्य माणसांकडे नसतात, त्यामुळे मग ते ‘सुपरहिरो’ ठरतात. हे सुपरहिरो जगातील वाईट शक्तींना संपवून सज्जन, सकारात्मक शक्तीला बळ देतात. गीतेतील ‘यदा यदाही धर्मस्य’शी साधर्म्य साधणाऱ्या या सुपरहिरोच्या कल्पनेला आमूलाग्र बदलणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींमध्ये स्टॅन ली यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. स्पायडरमॅन, आयर्नमॅन, हल्क, फॅन्टॅस्टिक फोर, ब्लॅक पँथरसारख्या अनेक सुपरहिरोंना मार्व्हल कॉमिक्समध्ये जन्म देऊन मनोरंजन विश्वावर तर स्टॅन ली यांनी अधिराज्य गाजवलंच; परंतु अमेरिकेसारख्या शुद्ध भांडवलशाही देशाच्या आणि पर्यायाने सबंध जगाच्या राजकारण-समाजकारण आणि अर्थकारणाला एक छोटासा का होईना, परंतु नवा आयाम दिला. स्टॅन ली यांची कारकीर्द आणि विसाव्या शतकात अमेरिकेची झालेली वाटचाल यामध्ये कमालीचं साधर्म्य आढळतं. १९३९ मध्ये कॉमिक बुक्स क्षेत्रात ली यांनी पाऊल ठेवलं, तेव्हा दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली होती. मनोरंजन विश्वात जेव्हा ली यांची व्यक्तिचित्रं धुमाकूळ घालत होती, तेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्थाही यशाच्या एकेक पायऱ्या चढत होती. शीतयुद्धोत्तर काळात जेव्हा अमेरिका हीच एकमेव सर्वशक्तिमान अशी महासत्ता बनली, त्यावेळेस ली आणि इतर लेखकांचे एकेक सुपरहिरो कॉमिक बुक्सच्या बाहेर येऊन चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर झळकू लागले होते. त्यांचे एकेक सिक्वेल्स पुढे येत गेले आणि अमेरिका नामक महासत्तेच्या बऱ्यावाईट कृत्यांचेही सिक्वेल्स साऱ्या जगाने अनुभवले. राष्ट्र-राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडे जाऊन अमेरिका हे एक तत्त्व आहे. ली किंवा अन्य लेखकांचे हे सुपरहिरो म्हणजे या तत्त्वाचंच प्रतिबिंब म्हणावं लागेल.

 

सुपरहिरो रंगवणाऱ्या लेखक-दिग्दर्शकांमध्ये ली यांचं वेगळेपण हे की, सुपरहिरो म्हणजे सर्वगुणसंपन्न, अगदी ‘परफेक्ट’ या समजुतीला त्यांनी तडा दिला. ली यांनी जाणीवपूर्वक अशी व्यक्तिचित्रं रेखाटली, जी मुळात तुमच्या-आमच्यासारखी सर्व गुणदोषयुक्त माणसंच आहेत. समाजातील अपप्रवृत्तींसोबत त्यांचा स्वतःमधील अपप्रवृत्तीशीही लढा सुरू आहे. स्पायडरमॅनने गत आयुष्यात असंख्य चुका केल्या होत्या, त्याचं कौटुंबिक आयुष्य बिघडलेलं होतं. हल्कला त्याची स्वतःची ताकदच अनेकदा ताब्यात ठेवता आली नाही. त्यामुळे ‘जमलं तर सूत नाहीतर भूत’ यानुसार सारं व्यवस्थित जुळून आलं तर हल्क हा नायक अन्यथा खलनायक व्हायला त्याला वेळ लागत नसे. ली यांचे खलनायकही वेगळे असत. तेही आपल्याला काहीतरी शिकवून जात. १०० टक्के चांगलं आणि १०० टक्के वाईट असं या जगात काहीच नसतं. जे काही असतं, ते ‘ग्रे’ शेडमध्येच असतं, हे ली यांनी उत्तमरित्या मांडलं. आता हे सारे सुपरहिरो अमेरिकेतच का जन्मले? इतके प्रसिद्ध का झाले आणि उर्वरित जगालाही त्यांनी एवढं वेड का लावलं? दुसरीकडे अमेरिका वगळता अन्य ठिकाणी असे जगप्रसिद्ध सुपरहिरो का निर्माण झाले नाहीत? याचं उत्तर वर उल्लेखल्याप्रमाणे अमेरिकेच्या तत्कालीन राजकीय-आर्थिक-सामाजिक वाटचालीत दडलेलं आहे.

 

 
 

व्हाईट मॅन्स बर्डननावाची एक संज्ञा जागतिक राजकारणाच्या संदर्भात वापरली जाते. या जगात आम्हीच काय ते ‘सिव्हिलाईज्ड’ आहोत, सर्वगुणसंपन्न आहोत. आमच्यासमोर आफ्रिका किंवा आशिया म्हणजे अगदीच सामान्य, मागास. त्यामुळे या जगाचं जे काही भलं करायचं आहे, ते केवळ आम्हीच करू शकतो, मार्ग आम्हीच दाखवू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आम्ही कुणालाही न विचारता, हक्काने ढवळाढवळ करणार. हेच ते ‘व्हाईट मॅन्स बर्डन’! आधी युरोप आणि दुसऱ्या महायुद्धात युरोप खिळखिळा झाल्यावर मग अमेरिका. अगदी अलीकडे इराक किंवा मध्य-पूर्वेत अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपात किंवा जागतिक राजकारण-अर्थकारणातील अमेरिकेच्या वागणुकीत या ‘बर्डन’च्या छटा स्पष्ट दिसतात. अमेरिकन सुपरहिरो हेदेखील असेच होते. सुपरहिरोंची ही फौज जेव्हा मनोरंजन विश्वाचा ताबा घेत होती, तेव्हा अमेरिकेचा महासत्ता म्हणून जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर उदय झालेला होता. गरिबी, बेरोजगारी, वसाहतवादातून सुटका करून स्वतःच्या पायावर उभं राहणं आदी प्रश्न तिच्यापुढे नव्हते. भांडवलप्रधान अर्थव्यवस्थाही तेजीत होती. सारं छानछान सुरू होतं. जेव्हा अशी प्रचंड स्थिरता येते, तेव्हा भोवतालच्या परिस्थितीविषयी अज्ञान आणि त्याबद्दलची एक सुप्त भीतीदेखील नकळत जन्म घेत असते. त्यामुळे मग व्यवस्था चालवत असताना कोणीतरी एक शत्रू समोर असावा लागतो. नसेल तर काल्पनिक शत्रू उभा करावा लागतो.

 
याच गरजेतून मग अमेरिकन भांडवलवादी व्यवस्थेने सुपरहिरो जन्माला घातले आणि ‘अच्छाई वि. बुराई’ चा खेळ सुरू केला. मनोरंजन विश्वातील या खेळाने अमेरिकेच्याच नाही तर साऱ्या जगातील जनमानसावर राज्य केलं. प्रतिकांच्या या खेळात काल्पनिक विश्वातील सुपरहिरोंना वास्तवातील मानवी भावभावनांशी जोडून स्टॅन ली यांनी या व्यक्तिचित्रांना एक वेगळा आयाम दिला, म्हणून त्यांचं वेगळेपण उठून दिसतं.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0