‘मिरॅकल’ घडविणारे बाबुजी!

    दिनांक  11-Nov-2018   

 


 
 
 
व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागल्याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. परंतु, अशा व्यसनाधीनांना व्यसनमुक्त करून त्यांना माणसात आणणारे देवमाणूस म्हणजे ‘बाबुजी!’
 

समाजातील वाढती व्यसनाधीनता हा भारतासह जगभरातील चिंतेचा एक विषय. आपल्या आसपासही अनेक तरुण-तरुणी व्यसनाधीन झालेले पाहायला मिळतात. नशेच्या आहारी गेल्याने त्यांचे अख्खे आयुष्यच उद्ध्वस्त होते. व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागल्याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. परंतु, अशा व्यसनाधीनांना व्यसनमुक्त करून त्यांना माणसात आणणारे देवमाणूस म्हणजे ‘बाबुजी!’ सुभाषचंद्र मनराई हे त्यांचे संपूर्ण नाव. लोक त्यांना प्रेमाने ‘बाबुजी’ म्हणतात. त्यांचे समाजकार्य पाहून लोकांनी त्यांना ‘बाबुजी’ ही पदवीच बहाल केली. दहा वर्षांपूर्वी बाबुजींनी वसई येथे ‘मिरॅकल फाऊंडेशन’ची स्थापना केली. या फाऊंडेशनद्वारे दरवर्षी ६० ते ७० लोक व्यसनमुक्त होऊन बाहेर पडतात. ‘मिरॅकल फाऊंडेशन’मध्ये येणाऱ्या व्यसनाधीनांचे समुपदेशन केले जाते. इथे केवळ समुपदेशनातून व्यसनमुक्तीचा हा चमत्कार घडविला जातो. त्यामुळे ‘मिरॅकल’ हे नाव या फाऊंडेशनला अगदी साजेसे वाटते.

 

सुभाषचंद्र मनराई उर्फ बाबुजी हे स्वत: आधी व्यसनाधीन होते. पण, आज १९ वर्षे झाली, त्यांनी नशेकडे वळूनदेखील पाहिले नाही. व्यसन हे एका माणसाला असले तरी, त्याचे सामाजिक, मानसिक, आर्थिक परिणाम हे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. याचा स्वत:ला प्रत्यय आल्यावर त्यांनी समाजाला व्यसनमुक्त करण्याचा वसा हाती घेतला. आज ‘मिरॅकल फाऊंडेशन’च्या मदतीने अनेक संसार देशोधडीला लागण्यापासून वाचले आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून बचावली आहेत. एकेकाळी व्यसनाधीन झालेले आता व्यसनमुक्त होऊन सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. नव्याने आयुष्य जगत आहेत. ‘मिरॅकल फाऊंडेशन’ने त्यांना दिलेला हा जणू काही पुनर्जन्मच आहे. यासाठी आज अनेकजण बाबुजींचे आभार मानताना दिसतात. मिरॅकल फाऊंडेशन’मध्ये व्यसनमुक्तीसाठी उपचार घ्यायचे म्हटले की, त्यासाठीचे शुल्क काहींच्या खिशाला न परवडणारे असते. पण उपचार घेण्यासाठी एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसेल, परंतु, त्या कुटुंबातील व्यसनाधीन व्यक्तीमध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता असेल, तर बाबुजी त्यांना या उपचार शुल्कामध्ये सवलतदेखील देतात. इतकेच नाही तर बाबुजींनी मोफतही उपचार केले आहेत.

 

सुरुवातीच्या काळात बाबुजींनी अगदी रस्त्यावर राहणाऱ्या, घरदार नसणाऱ्या लोकांना आपल्या मदतीला घेऊन या फाऊंडेशनची स्थापना केली. किशोर हे त्यातीलच एक उदाहरण आहे. किशोर हे ‘मिरॅकल फाऊंडेशन’मध्ये आज प्रमुख म्हणून काम करतात. काही वर्षांपूर्वी बाबुजींनी त्यांना आपल्या या सेवाव्रतात मदतनीस म्हणून घेतले होते. आज किशोर यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असून त्यांचे कुटुंब त्यांच्याकडे परतले आहेजगभरात व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या पिंटो आणि लुशियन या दोघांना मी प्रेरणास्थानी ठेवून हे कार्य करत आहे. हे दोन्ही दिग्गज आता या जगात नाहीत. परंतु, त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून मी हे कार्य करत आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्याचे हे चांगले काम माझ्याकडून घडत आहे. परंतु, मी केवळ निमित्त आहे. जर मी हे करत नसतो, तर आज माझ्याजागी दुसरे कोणीतरी हे काम करताना तुम्हाला दिसले असते. दुसऱ्या कोणालातरी ईश्वराने ही सद्बुद्धी दिली असती. कारण, चांगले काम हे कोणावाचून अडणारे नसते. देवाने या कार्यासाठी आज मला निवडले आहे असे मी म्हणेन,” स्वत:कडे कोणताही मोठेपणा न घेता आपल्या कार्याबद्दल विस्ताराने सांगताना बाबुजींनी मांडलेले विचार मनाला अगदी स्पर्श करुन जातात.

 

आज अनेक तरुण-तरुणी निरनिराळ्या प्रकारचे नशायुक्त अमलीपदार्थांचे सेवन करतात. हे पाहून बाबुजींनी आपली हळहळ बोलून व्यक्त केली. आजच्या युवापिढीविषयी बाबुजी सांगतात की, “पूर्वीच्या काळी नशा करण्याचे काही मर्यादित प्रकार होते. दारू, सिगारेट, चरस, गांजा, हिरोईन, कोकेन यांसारखे अमलीपदार्थ अस्तित्वात होते. आजही या पदार्थांच्या नशेचा पगडा समाजावर असल्याचे दिसून येते. परंतु, आजकाल गोळ्यांच्या स्वरूपात तसेच पॅकच्या स्वरूपात, द्रवरुपातही अमलीपदार्थ तरुणाईला सहज उपलब्ध होतात. येणाऱ्या काळात नशा करण्याचे आणखी नवनवीन प्रकारही येतील. परंतु, या सगळ्याला कुठेच अंत होताना दिसत नाही. अंत हा नशा करणाऱ्याच्या मृत्यूनेच होतो आणि असे मरण हे केवळ त्या व्यसनाधीनाचे मरण नसते, तर त्याच्या किंवा तिच्या संपूर्ण कुटुंबाचे ते मरण असते. त्यामुळे आपल्या नशेपायी आपण फक्त आपले आयुष्यच संपवत नाही, तर आपल्या कुटुंबाला, आपल्या प्रियजनांनादेखील या विळख्यात ओढतोय. हे आजच्या युवापिढीने लक्षात ठेवावे. व्यसनांपासून दूर राहावे. कारण, अशा व्यसनांमुळे ऐन तारुण्यात येणारे मरण हे त्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या जन्मदात्यांना कदापी न पचणारे असते.” बाबुजींचे व्यसनमुक्तीचे विचार हे आजच्या तरुणपिढीसाठी अत्यंत मार्गदर्शक असले तरी उतारवयात हे काम सक्रियपणे काम करणाऱ्या बाबुजींच्या या सामाजिक कार्याला दै. ‘मुंबई तरूण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा!

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/