वृक्षपूजा: भाग ७ आपटा, औदुंबर, कडुनिंब, करंज, केळं, चंदन, पारिजात, मंदार, रुई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018   
Total Views |गेले सात आठवडे सुरू असलेल्या ‘वृक्षपूजा’ या लेखमालेचा हा शेवटचा भाग. या शेवटच्या भागात जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून पूज्य ठरलेल्या आपटा, औदुंबर, कडुनिंब, करंज, केळ, चंदन, पारिजात, मंदार आणि रुई या वृक्षांबद्दल...


आपटा

 

आपट्याच्या झाडाला संस्कृतमध्ये ‘अश्मन्तक’ म्हणतात. याला कांचनासारखी वाटोळी दुहेरी पानं असतात. विजयादशमीच्या दिवशी शमी उपलब्ध नसेल, तर अश्मन्तक वृक्षाची पूजा करावी, असं ‘निर्णयसिंधू’त सांगितलं आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनानंतर आपट्याची पानं आप्तेष्टांना सोनं म्हणून वाटतात. सीमोल्लंघनाच्या दिवशी आपट्याची पानं तोडण्यापूर्वी त्या वृक्षाची पूजा करतात. त्यावेळी पुढील मंत्र म्हणतात:

 

अश्मन्तक महावृक्ष

महादोषनिवारण ।

इष्टनां दर्शनं देहि

कुरू शत्रुविनाशनं ॥

 

अर्थ - हे अश्मन्तक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला, माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हा श्लोक म्हणून नंतर आपट्याच्या मुळाशी तांदूळ, सोन्याचे वा तांब्याचे नाणे ठेवतात आणि वृक्षाला प्रदक्षिणा घालतात व बुंध्याशी थोडी माती घालतात.

 

औदुंबर

 

औदुंबरालाच ‘उदुंबर’ किंवा ‘उंबर’ अशीही नावं आहेत. याचा उल्लेख अथर्ववेदात आहे. ‘औदुंबर वृक्ष पवित्र असून त्याची पूजा करावी,’ असं ‘धर्मशास्त्रा’त सांगितलं आहे,

 

उदुम्बरे वसेन्नित्यं

भवानी सर्वदेवता ।

तत: सा प्रत्यहं पूज्या गंधपुष्पाक्षतादिभि: ॥

 

अर्थ - उदुंबर वृक्षात नेहमी सर्व देवातांमध्ये श्रेष्ठ अशा भवानीचा वास असतो. तिची प्रतिदिन सकाळी गंध, फूल, अक्षता इ. द्रव्यांनी पूजा करावी. औदुंबर हा दत्ताचा आवडता वृक्ष आहे. औदुंबराच्या तळाशी दत्तात्रेयाचा निवास असतो, असं समजतात. दत्ताच्या देवळापाशी औदुंबराचं झाडं असतंच असतं. औदुंबराच्या खाली मलमूत्रविसर्जन करीत नाहीत. जिथे औदुंबराचं झाड असेल तिथे विहिरीला पाणी लागतेच, अशी समजूत आहे. औदुंबराचं धार्मिक महत्त्व खूप आहे. यज्ञाचा यूप, लाकडी पळी, ताईत, इत्यादी वस्तू औदुंबराच्याच लाकडाच्या करीत. राज्याभिषेक समारंभात राजाचे सिंहासनही औदुंबराचे करीत. ग्राहयज्ञात गुरूसाठी औदुंबराच्या समिधा देतात.

 

कडुनिंब

 

असंख्य औषधी गुण असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला संस्कृतमध्ये ‘पारिभद्र’ असं नाव आहे. याची उत्पत्ती अमृतातून झाली असल्याचं मानलं जातं. या वृक्षाला काही लोक ब्रह्मदेवाचं, तर काही लोक जगन्नाथाचं प्रतीक समजतात. कालि किंवा दुर्गा यांचा हा प्रिय वृक्ष असल्याची समजूत आहे. दक्षिणेकडील बहुतेक सर्व देवीमंदिरांच्या आवारात कडुनिंबाचं झाड असतं. हे झाड तोडणं एखाद्या तरुण मुलीची हत्या करण्याइतकं अशुभ समजतात. कडुनिंबाची पानं, फळं, फुलं, साल व मुळे सर्वच औषधी असल्याने आयुर्वेदात याला फार महत्त्व आहे. घरबांधणीत एखाद्या दाराची वा खिडकीची चौकट कडुलिंबाच्या झाडाची बसवल्यास त्या घराला भूतबाधा होत नाही अशी समजूत आहे. कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालणं सर्वरोगहारक मानलं आहे.

 

करंज

 

आधुनिक काळात बायोडिझेलनिर्मितीमुळे प्रसिद्ध पावलेला करंज वृक्ष भारतात प्राचीन काळापासून ज्ञात आहे. रामायण, महाभारत, भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख येतो. अमरकोशात करंज वृक्षाचे चिरबिल्व, नक्तमाल, करंज व करंजक असे चार प्रकार सांगितले आहेत. या वृक्षावर क्षुद्र देवतेचा निवास असतो आणि पुत्रार्थी लोक या देवतेला नमस्कार करतात, असं महाभारतात म्हटलं आहे. तसंच या वृक्षाखाली एक वर्ष दिवा लावला, तर संतती प्राप्त होते, असंही त्यात म्हटलं आहे. करंजाच्या झाडावर अथवा झाडाखाली जी देवता असते तिला ‘करंजेश्वरी’ म्हणतात. करंजेश्वरीचं एक ठाणं महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आहे.

 

केळं

 

केळीच्या बहुविध उपयोगांमुळे मांगलिक कार्यात केळीला महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. केळीच्या पानात दिवसाची वस्ती असल्याचंही मानतात. दक्षिणेतला तिरुमल हा देव वाहत्या जलात केळीच्या पानावर निजत असल्याची दंतकथा आहे. ध्यानधारणा आणि समाधी यांच्यासाठी केळीची सावली फलप्रद मानतात. महाराष्ट्रात केळीला पतिव्रता मानलं आहे. केळीला संस्कृतात ‘रंभा’ असं नाव आहे. माघमंडळ नावाचं एक स्त्रीव्रत आहे. यात केळीचं झाडं तळ्यात लावून त्याची पूजा व जोपासना करण्यास सांगितली आहे. आशिया खंडाच्या उष्णकटिबंधातील सर्व भागांमध्ये पुरातन काळापासून केळीची लागवड झालेली दिसून येते.

 

चंदन

 

चंदनाच्या झाडाला ‘गंधासार’ व ‘मलयज’ अशीही अन्य नावं आहेत. मलयगिरीवरचं चंदन विशेष प्रसिद्ध मानलेलं आहे. पुराणांत व संस्कृत काव्यांत याचे उल्लेख ठायीठायी आढळतात. तांबड्या चंदनाला ‘रक्तचंदन’ म्हणतात. शरीराला शीतलता यावी म्हणून कपाळी चंदनाचा तिलक लावतात व मस्तकी त्याचा लेप लावतात. चंदनाच्या सुगंधाचा व शीतलतेचा उपभोग घेण्यासाठी सर्प त्याच्याभोवती वेटोळं करून बसतात, अशी जनश्रुती आहे. चंदनाची प्रशंसा करणारी अनेक सुभाषितं संस्कृतात आढळतात.

 

अयि मलयज महिमाअयं कस्य गिरामस्तु विषयस्ते ।

उद्गिरतो यद गरलं फणिन:

पुष्णासि परिमल उद्गारै: ॥

 

अर्थ - हे चंदनवृक्षा, हा तुझा महिमा वर्णन करायला कोणाची वाणी समर्थ ठरेल? कारण तू गरळ ओकणाऱ्या सर्पांनाही परिमलाच्या उद्गारांनी परिपुष्ट करतोस.

 

पारिजात

 

पारिजात वृक्ष (प्राजक्त) हा पाच स्वर्गीय वृक्षांपैकी एक मानला जातो. तो संध्याकाळी फुलतो, रात्रभर दरवळतो आणि सकाळी जमिनीवर फुलांचा सडा घालतो. या वृक्षाचा बहर असतो पावसाळ्यात. समुद्रमंथनात जी चौदा रत्नं निर्माण झाली, त्यांपैकी तिसरं रत्न म्हणजे पारिजात वृक्ष. स्वर्गातला हा देववृक्ष सत्यभामेचा हट्ट पुरवण्यासाठी कृष्णाने द्वारकेत आणला आणि तिच्या महालापुढे लावला, अशी कथा आहे. पारिजातकाची पाने व फुले निरनिराळ्या देवतांच्या पूजेत आवश्यक सांगितली आहेत. उत्तर प्रदेशातील किंतूर या गावात असलेल्या मंदिरात कुंतेश्वर नावाचा देव असून शेजारी पारिजाता देवीची मूर्ती आहे. पारिजाता म्हणजे कुंती. हे गाव कुंतीने वसवले अशी दंतकथा आहे. या मंदिरापासून एका मैलाच्या अंतरावर पारिजातक वृक्ष आहे. हा वृक्ष अर्जुनाने कुंतीला आणून दिला आणि कुंतीने तो त्या ठिकाणी लावला अशी आख्यायिका आहे. स्थानिक लोक या पारिजातकाला नवस बोलतात. नवदाम्पत्य याच्या प्रथमदर्शनाला येतात.

 

मंदार

 

मंदार हा वृक्षही स्वर्गातल्या पाच देववृक्षांपैकी एक मानला गेला आहे. हा भारतात उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळतो. मंदाराचं फूल गणपतीला प्रिय आहे. मेघदूतात मंदारचा उल्लेख पुढीलप्रमाणे आहे:

 

तत्रागारं धनपतिगृहानुत्तरेणास्मदीयं

दूराल्लक्ष्यं सुरपतिधनुश्चारुणा तोरणेन ।

यस्योपान्ते कृतकतनय:

कान्तया वर्धितो मे

हस्तप्राप्यस्तबकन मितो बालमंदारवृक्ष: ॥

 

अर्थ - धनापती कुबेराच्या प्रसादाच्या उत्तरेस आमचे निवासस्थान आहे. दूर अंतरावरूनही इंद्रधनुष्याप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या कमानदार प्रवेशद्वारामुळे ते सहज ओळखता येते. त्या द्वाराजवळ सहज गवसता येतील अशा फुलांनी बहरलेला कोवळा मंदार वृक्ष आहे. माझ्या प्रियेने याच वृक्षावर अपत्यवत प्रेम केले.

 

रुई

 

रुई हा कोणी मोठा वृक्ष नसून ती एक लहान वनस्पती आहे. रुईला ‘सूर्यकन्या’ असं म्हणतात. ग्राहयज्ञात सूर्याच्या हवनासाठी रुईच्या समिधा वापरतात. देवपूजेच्या पत्रीत हिचा समावेश आहे. प्रत्येक शनिवारी मारुतीला रुईच्या ११ पानांची माळ वाहतात. एखाद्या विधवेचं प्रथम वराशी लग्न व्हायचं असेल, तर त्याला आधी रुईशी विवाह करावा लागतो. अनेक आदिवासी समाजात एखादा अविवाहित पुरुष मेला, तर त्याचं प्रथम रुईशी लग्न लावून मग त्याचं दफन करतात. रुईच्या झाडाला ‘अर्क’ असंही नाव आहे. रुईच्या झाडाशी एखाद्या पुरुषाने विवाह करणं याला ‘अर्कविवाह’ म्हणतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@