मुंबईकरांनी साजरी केली कमी प्रदूषणवाली दिवाळी

10 Nov 2018 16:28:24



मुंबई: गेल्या २ वर्षाच्या तुलनेत यंदा दिवाळीत मुंबईमध्ये हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. 'सफर' या प्रदूषणमापन प्रणालीतर्फे हवेच्या दर्जाची चाचणी करण्यात आली, त्यात ही माहिती समोर आली आहे. फटाके वाजवण्यावर घातलेल्या बंदीचे मुंबईकरांनी स्वागत केले आहे. प्रदूषणाबाबत केलेल्या जनजागृतीमुळे मुंबईकरांनी फटाक्यांकडे पाठ फिरवली होती. शहरातील काही भाग वगळले तर इतर सर्व ठिकाणी न्यायालयाने दिलेल्या रात्री ८ ते १० च्या वेळेचे पालन केल्याचे दिसून आले.

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. व्ही. एम. मोटघरे यांनीही, जनजागृतीमुळे फटाके वाजवण्याचे प्रमाण आणि परिणामी प्रदूषण कमी झाल्याची माहिती दिली. मुंबईकरांना तुलनेने दिवाळीत बरी हवा अनुभवता आली. गेल्या दोन्ही वर्षांपेक्षा यंदा हवेचा दर्जा चांगला होता, असे 'सफर'चे प्रकल्प संचालक गुफरान बेग यांनी सांगितले. तर दुसरीकडे पुण्यात फटाक्यांच्या विक्रीवर झालेला परिणाम आणि त्यामुळे पहिल्या दिवशी फटाक्यांचा आवाज 'बंद' झाल्याने फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाल्याचे दिसून येत असतानाच, लक्ष्मीपूजनादिवशी मात्र जोरदार फटाकेबाजी झाल्याने प्रदूषणाचे गेल्यावर्षीचे रेकॉर्डही मोडीत निघाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0